Thursday, July 30, 2026

Devendra Fadnavis : नागपूरमध्ये उभारण्यात येणारे जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर

Devendra Fadnavis : नागपूरमध्ये उभारण्यात येणारे जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर
२०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे

मुंबई(Mumbai): नागपूर येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील परिषद, प्रदर्शन व व्यावसायिक कार्यक्रमांचे केंद्र विकसित करण्यासाठी जागतिक दर्जाचे बहुउद्देशीय कन्व्हेन्शन व एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प नागपूरच्या आर्थिक विकासाला, पर्यटनाला, उद्योगांना आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना देणारा ठरणार असून २०२९ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.(Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे नागपूर कन्व्हेंन्शन सेंटरसंदर्भात सादरीकरण बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी,(Dr. Shrikar Pardeshi) नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर, दूरदृश्य प्रणालीद्वारे फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो उपस्थित होते.(Nagpur)

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर विमानतळ परिसरातील नागरी विकासाच्या नियोजनाशी सुसंगत असा हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. विमानतळ, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीचा विचार करून याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नागपूरमध्ये मोठ्या क्षमतेच्या कन्व्हेन्शन सेंटरची आवश्यकता असून, या केंद्रामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद, प्रदर्शन, कॉर्पोरेट कार्यक्रम आणि व्यावसायिक उपक्रम आयोजित करता येणार आहेत.

कन्व्हेन्शन सेंटर केवळ परिषद, प्रदर्शन आणि व्यावसायिक कार्यक्रमांचे केंद्र न राहता ते नागपूरच्या ओळखीचे सांस्कृतिक केंद्र ठरावे. यासाठी वास्तुरचना अत्यंत आकर्षक, आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि पर्यावरणपूरक असावी. आधुनिक वास्तुशैलीसोबतच ऊर्जा बचत, हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनांचा वापर करावा अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

या प्रकल्पाच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, पर्यटन तसेच संबंधित सेवा क्षेत्रांसाठी कुशल मनुष्यबळ घडविणारे केंद्र म्हणून विकसित करण्यात यावे. नागपूरला जागतिक दर्जाचे परिषद, प्रदर्शन, पर्यटन आणि उद्योग केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रक्रिया, निविदा, जमीन हस्तांतरण, बांधकाम आणि इतर आवश्यक कामे कालमर्यादेत पूर्ण करून प्रकल्प नियोजित वेळेत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवावे व त्यानुसार नियोजन करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >