सोलापूर : जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला असला, तरी उजनी धरणाने यंदा विक्रमी वेगाने भरतीकडे वाटचाल केली आहे. सोमवारी (२७ जुलै) रात्री ९ वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९८.५७ टक्क्यांवर पोहोचला. पूरस्थिती टाळण्यासाठी धरण प्रशासनाने रात्री १०.३० वाजता धरणाचे १६ दरवाजे उघडत भीमा नदीपात्रात ४० हजार क्युसेक (cusec)पाण्याचा विसर्ग सुरू केला.(Solapur Ujani Dam)
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांवर काळे ढग दाटून आले आहेत. मंगळवारी (२८ जुलै) राज्यात पावसाचा जोर आणखी ...
यंदा उजनीच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र, पुणे जिल्हा आणि धरणाच्या वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली. ८ जुलैपासून धरण 'प्लस'मध्ये गेले असून, त्यानंतर सातत्याने वाढणाऱ्या आवकेमुळे उजनी गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १३ दिवस आधी पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
धरणात भरपूर पाणीसाठा झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी जलतज्ज्ञांनी नियोजनाबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. गतवर्षीही धरण पूर्ण भरले होते; मात्र पाण्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने उन्हाळ्यात उपयुक्त पाणीसाठा उणे २८ टक्क्यांपर्यंत घसरला होता. त्यामुळे यंदाही पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीच्या पात्रात किंवा काठावर जाणे टाळावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे. नदीपात्रातील जनावरे, शेतीची अवजारे आणि इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे कार्यकारी अभियंता सु.उ.डुंबरे यांनी सांगितले.
दरम्यान, स्थानिक पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुढील काही तासांत किंवा दिवसांत आवक वाढल्यास भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता धरण प्रशासनाने वर्तवली आहे.






