Nashik : दीक्षांत समारंभ ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या वचनबद्धतेचा सोहळा - राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २५ व्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा नाशिकमध्ये उपथित होते. या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १२ हजार २६३ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच २० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच. डी), तर विविध विद्याशाखेतील ९९ विद्यार्थ्यांना १४६ सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.



विद्यार्थ्यांनी घेतलेले ज्ञान सामाजिक जबाबदारी


राज्यपाल जिष्णू देव वर्मा कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी घेतलेले ज्ञान ही एक सामाजिक जबाबदारी आहे. तुमच्या सेवाकार्यामुळे रुग्णाचे दुःख कमी होऊन गरजू लोकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होईल. आरोग्य क्षेत्र व्यावसायिक झाल्याने समाज तुमच्याकडे विश्वास आणि आशेने पाहणार आहे. तुम्ही दिलेली औषधे रुग्ण कदाचित विसरेल. मात्र, तुमची करुणा, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा तो कधीही विसरणार नाही.



आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्त्वाची


विकसित भारत २०४७ ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य व्यावसायिक केवळ वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे पुरेसे नाही. त्यासाठी तंत्रज्ञानाचे ज्ञान, संशोधनाची दृष्टी, नैतिक बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारीही असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या मूलभूत बाबींना बळकटी देत आहे ही समाधानाची बाब आहे. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकीकरण, शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा, संशोधनाला प्रोत्साहन आणि विद्यापीठ प्रशासन अधिक पारदर्शक व विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब कुलगुरूंच्या अहवालात दिसून येते. पेपरलेस प्रशासन, डिजिटल प्रमाणपत्रे, ॲकेडॅमिक बँक ऑफ क्रेडीटस (Academic Bank of Credits) आणि तंत्रज्ञानाधारित सेवा यांसारख्या उपक्रमांमधून विद्यापीठाची सुशासन आणि कार्यक्षम सार्वजनिक सेवा देण्याची बांधिलकी दिसून येते, असेही ते म्हणाले.



नैतिकतेची सर्वोच्च मूल्ये जपावीत


संशोधन आणि नवोपक्रमावर दिला जाणारा भर कौतुकास्पद आहे. संशोधन प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य, शिक्षक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्राची स्थापना यामुळे विद्यापीठाची जागतिक स्तरावरील ओळख अधिक मजबूत होईल. संशोधनातून ज्ञानाची वाढ होते आणि हेच संशोधन आरोग्यसेवेमध्ये परिवर्तन घडवून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवते. आरोग्य शिक्षणातील गुणवत्ता ही थेट समाजातील आरोग्यसेवेच्या गुणवत्तेशी संबंधित आहे. त्यामुळे अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. नैतिकतेची सर्वोच्च मूल्ये जपावीत. नैतिक आचरणाशिवाय केवळ व्यावसायिक कौशल्य समाजाचा विश्वास संपादन करू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल नवकल्पना ही प्रभावी साधने आहेत; मात्र उपचाराची सुरुवात सहानुभूतीतून होते, असेही राज्यपाल वर्मा यांनी सांगितले.



डॉ. सदानंद सरदेशमुख यांना डी. लिट.


विद्यापीठातर्फे डॉ. सदानंद सरदेशमुख यांना त्यांच्या सेवेबद्दल डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. सरदेशमुख यांनी आयुर्वेद विद्याशाखेतील शिक्षण, सेवा आणि मानव कल्याणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पुणे विद्यापीठातून आयुर्वेदातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळविणारे ते पहिले पदवीधारक आहेत. त्यांनी १९९४ मध्ये एकात्मिक कर्करोग संशोधन प्रकल्प सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून १६ हजारांहून अधिक कर्करोगाच्या रुग्णांना लाभ झाला आहे. याबरोबरच एचआयव्ही एड्स, संधीवात, महिला व बालकल्याण, हाडांच्या उपचारावर त्यांनी भरीव संशोधन केले आहे. आरोग्य सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डी. लिट. पदवी प्रदान करीत सन्मानित केले आहे.



१२ हजार २६३ विद्यार्थ्यांना पदवी


या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १२ हजार २६३ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच २० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच. डी), तर विविध विद्याशाखेतील ९९ विद्यार्थ्यांना १४६ सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


दीक्षांत समारंभात वैद्यकीय विद्याशाखा पदवीचे ६६२१, दंत विद्याशाखा पदवीचे २१९२, आयुर्वेद व युनानी विद्याशाखा पदवीचे १३३, होमिओपॅथी विद्याशाखा पदवीचे ४०५, नर्सिंग विद्याशाखा पदवीचे ७३२, फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी पदवीचे ३६९, पदव्युत्त वैद्यकीय शाखेचे २०७, दंत, बी. एससी. पॅरामेडिकलचे ३१५, आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथीचे १२७२, अलाईडच्या १७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, उपस्थित होते.

Comments
Add Comment

Illegal Mining : अवैध गौण खनिज उत्खननासाठी दहापट दंड

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे समभाग भांडवल ५०० कोटींवर मुंबई : राज्यातील वाळू आणि

Suneel Anand Passed Away : अभिनेते देव आनंद यांच्या मुलाचे निधन; ज्या रुग्णालयात वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, तिथेच लेकाचाही मृत्यू

लंडन : हिंदी चित्रपटसृष्टीचे सदाबहार अभिनेते दिवंगत देव आनंद (Dev Anand) यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला

ओडिशाच्या सामान्यातल्या सामान्य घरातील लेकीची कमाल! इंटरनेट आणि गुगलच्या जोरावर जिंकला ‘मिस टीन युनिव्हर्स इंडिया २०२६’ किताब

आजच्या डिजिटल युगात सुविधांची कमतरता नसली, तरी त्या प्रत्येक गोष्टीचा अचूक आणि प्रभावी वापर करून यश मिळवणे ही एक

Pune Univercity Fake Degree Racket: पुणे विद्यापीठात बनावट पदवीचं रॅकेट? उघड झाला धक्कादायक प्रकार

पुणे :  'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' म्हणून देशभरात ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावावर बनावट पदवी

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Nashik : गंगापूर धरणातून विसर्गात वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मंगळवारी (दि. २८) दुपारी ४ वाजता मोठी वाढ करण्यात