Sunday, July 26, 2026

BMC News : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प!

BMC News : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प!

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात!

मुंबई : मालाड (Malad) खाडीमध्ये जागतिक स्तरावरील 'द ओशन क्लीनअप' (The Ocean Clean-Up) संस्थेच्या इंटरसेप्टर हा प्रायोगिक तत्वावर प्रकल्प साकारला जात आहे. प्रायोगिक टप्प्यात इंटरसेप्टर प्रणालीद्वारे कचरा संकलनासाठी मुंबई महानगरपालिकेला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या खर्चात बचत होणार आहे.द ओशन क्लीनअप' ही जागतिक स्वयंसेवी संस्था महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये हा पायलट प्रकल्प राबवत आहे. याची प्रत्यक्ष पाहणी भाजपचे (BJP) नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी केली. यावेळी त्यांनी स्वतः नदीपात्रात उतरून यंत्रणेची कार्यपद्धती, तरंगता कचरा अडविण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाचा सखोल आढावा घेतला.

'द ओशन क्लीनअप' ही जागतिक स्वयंसेवी संस्था महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने मालाड आणि ट्रॉम्बे खाडी येथे इंटरसेप्टर तंत्रज्ञानाद्वारे समुद्रात जाणारा प्लास्टिक व इतर तरंगता कचरा नदी-नाल्यांमध्येच अडविण्याचा हा उपक्रम आहे. संस्थेच्या अभ्यासानुसार, मुंबईतून दरवर्षी सुमारे ५० लाख किलो प्लास्टिक अरबी समुद्रात वाहून जाते आणि हा प्रकल्प ते प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

या पायलट प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रायोगिक टप्प्यात इंटरसेप्टर प्रणालीद्वारे कचरा संकलनासाठी मुंबई महानगरपालिकेला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या खर्चात बचत होत असून, मुंबईकरांनी कररूपाने भरलेला जनतेचा पैसा वाचत आहे. पर्यावरण संरक्षणाबरोबरच सार्वजनिक निधीचा कार्यक्षम, जबाबदार आणि पारदर्शक वापर करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.

अलीकडेच मुसळधार पावसामुळे आणि भरतीच्या वेळी जुहू किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा वाहून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. नदी-नाल्यांमधून वाहत आलेला हा कचरा अखेरीस समुद्रात जाऊन किनाऱ्यावर परत येतो. त्यामुळे समुद्री पर्यावरणाचे मोठे नुकसान होते, सागरी जीवसृष्टी धोक्यात येते आणि हा कचरा पुन्हा उचलण्यासाठी महापालिकेला मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत नदी-नाल्यांमध्येच कचरा अडविणारी इंटरसेप्टर प्रणाली मुंबईसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

"लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सूचना देणे किंवा उद्घाटने करणे पुरेसे नसून, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची गुणवत्ता तपासणे आणि जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविणे हीच खरी लोकसेवा आहे. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक मालाड घडविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू." असे यावेळी तेजिंदर सिंग तिवाना स्पष्ट केले.

"प्रदूषण रोखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. नदी, नाले किंवा समुद्रात कचरा फेकू नये. ओला व सुका कचरा याचे योग्य वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी आणि स्वच्छ मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करावे. नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यासच आपले समुद्र, नद्या आणि किनारे स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवणे शक्य होईल." असेही आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >