Thursday, July 23, 2026

CM Devendra Fadnavis : राज्यातील सर्वात मोठा परीक्षा घोटाळा उद्धव ठाकरेंच्या काळात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis : राज्यातील सर्वात मोठा परीक्षा घोटाळा उद्धव ठाकरेंच्या काळात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नापास विद्यार्थ्यांना पास करण्याचा 'मविआ'चा पराक्रम

मुंबई : "महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडला. या घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्यांपासून ते तत्कालीन मंत्र्यांपर्यंत अनेक जण सामील होते. यात पेपर लीक झालेच, शिवाय नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा पराक्रम ‘मविआ’ सरकारच्या काळात झाला," असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी केला.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील आंदोलन, संसदेतील वाद आणि ठाकरे बंधूंच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा जोरदार समाचार घेतला. महाविकास आघाडीच्या काळात टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारांची आठवण करून देत मुख्यमंत्री म्हणाले, "आमच्या सरकारने टीईटी परीक्षेत गैरव्यवहार होत असल्याचे लक्षात येताच परीक्षा होण्यापूर्वीच घोटाळेबाजांना अटक करून कठोर कारवाई केली. परंतु, ठाकरे सरकारच्या काळात झालेला घोटाळा आणि भ्रष्टाचाराचा स्तर राज्याने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता."

राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना खुले आव्हान देत मुख्यमंत्री म्हणाले, "विरोधी पक्षांनी पळपुटेपणा सोडून संसदेतील चर्चेला सामोरे जावे. लोकशाहीत निर्णय रस्त्यावर नव्हे, तर संसदेत होतात. जर देशाच्या संविधानावर विश्वास असेल तर संसदेत चर्चा करा, उत्तरे मागा आणि तुमच्याकडे काही चांगल्या संकल्पना असतील तर सरकारला त्या अमलात आणण्यासाठी भाग पाडा. परंतु आंदोलनांच्या आधारे आपली राजकीय पोळी भाजणे बंद करा. विद्यार्थ्यांचे हित चर्चेतूनच साध्य होऊ शकते. पेपर लीकप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे. 'नीट'ची पुनर्परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडली असून विद्यार्थी खूश आहेत आणि उत्तीर्ण झाल्यावर आनंदोत्सव साजरा करत आहेत."

संसदेत चर्चा करण्याची विरोधकांमध्ये हिंमत नाही

यूपीए सरकारच्या काळात देशाचे शैक्षणिक बजेट अवघे ८ हजार कोटी रुपये होते, ते मोदी सरकारने १ लाख ३९ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवले आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. आयआयटी, एम्स यांसारख्या आयकॉनिक संस्थांसह वैद्यकीय, इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापन शाखांमधील जागा वाढवून तरुणांना मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विरोधी पक्षांमध्ये संसदेत चर्चा करण्याची हिंमत नाही. कारण कर्नाटकात पेपर कसा लीक झाला, तेलंगणात कशा प्रकारे गैरव्यवहार झाला, पंजाबमधील 'आप' सरकार आणि राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या काळात आठ-आठ वेळा पेपर कसे फुटले, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. स्वतःच्या राज्यातील घोटाळे बाहेर येण्याच्या भीतीने विरोधक चर्चेपासून पळ काढत असून, देशात अराजकता पसरवणे हीच त्यांची मानसिकता आहे," अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

'त्या' व्हिडीओची चौकशी सुरू

- आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांकडून धमकावले जात असल्याच्या व्हायरल व्हिडिओबाबत (Viral Video) बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, "संबंधित व्हिडिओची चौकशी सुरू असून, चौकशी प्रलंबित असतानाच त्या पोलिसावर कारवाई करून त्याला तिथून हटवण्यात आले आहे."

- दरम्यान, "आंदोलनाच्या नावाखाली दगडफेक करणारे आणि पोलिसांवर हल्ला करणारे लोक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आलेले नव्हते. या आंदोलनाचा फायदा घेऊन अराजकता माजवणारे हे घटक होते. आंदोलनकर्त्यांनीही अशा देशविरोधी आणि हिंसक प्रवृत्तींपासून सावध राहिले पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >