Wednesday, July 22, 2026

BJP vs CONGRESS in MUMBAI : मुंबईत भाजप आणि काँग्रेसची एकमेकांविरोधात आंदोलने; अमित साटम यांचे नेतृत्व

BJP vs CONGRESS in MUMBAI : मुंबईत भाजप आणि काँग्रेसची एकमेकांविरोधात आंदोलने; अमित साटम यांचे नेतृत्व

काँग्रेसच्या आंदोलनात वडेट्टीवार आणि सपकाळ सहभागी

मुंबई : दिल्लीत रंगलेल्या राजकीय नाट्याचे तीव्र पडसाद बुधवारी आर्थिक राजधानी मुंबईतही उमटले. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी एकमेकांविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि दिल्लीतील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असतानाच, दुसरीकडे भाजपनेही काँग्रेसच्या या भूमिकेला जोरदार प्रत्युत्तर देत रस्त्यावर उतरून निदर्शने केली.

दिल्लीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ मुंबईत काँग्रेस नेत्यांनी भर पावसात आक्रमक आंदोलन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, हुसेन दलवाई, अस्लम शेख आणि भाई जगताप यांच्यासह अनेक प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. गांधी भवनाबाहेर एकत्र येत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप कार्यालयाकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी वाटेतच अडवल्याने नेत्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. अखेर पोलिसांनी विजय वडेट्टीवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले. शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलीस कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी सपकाळ यांनी केला.

दुसरीकडे, काँग्रेसच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार निदर्शने केली. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप साटम यांनी यावेळी केला. राहुल गांधी यांनी स्वतःचे संपलेले राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी नकारात्मक राजकारण सुरू केले आहे. राहुल गांधींनी त्यांचा पासपोर्ट दाखवून परदेशात देशाच्या शत्रूंना केव्हा आणि कुठे भेट दिली, याचा तपशील जाहीर करावा असे आव्हान साटम यांनी दिले. भारत आर्थिक महासत्ता बनत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाला रोखण्यासाठी भारतविरोधी शक्तींच्या साथीने हा कट रचला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, यावेळी भाजपच्या काही आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >