Monday, July 20, 2026

Ramayana Part 1 Trailer : रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर रिलीज होण्याआधीच लीक; निर्मात्यांनी उचलले 'हे' कठोर पाऊल!

Ramayana Part 1 Trailer : रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर रिलीज होण्याआधीच लीक; निर्मात्यांनी उचलले 'हे' कठोर पाऊल!

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिकेत असलेल्या 'रामायण: पार्ट १' (Ramayana Part 1) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. भगवान रामाच्या भूमिकेतील रणबीरचा फर्स्ट लूक यापूर्वीच चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच निर्मात्यांना एक मोठा धक्का बसला आहे. या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर अधिकृतरीत्या प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर लीक झाला आहे.

खास इव्हेंटमधून व्हिडिओ व्हायरल

हा ट्रेलर खास अतिथींसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमातून लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये 'प्रथम संकल्प' नावाच्या एका विशेष इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांपैकीच कोणीतरी मोबाईलच्या कॅमेऱ्यात १ मिनिट २८ सेकंदांचा ट्रेलर रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. या अनधिकृत व्हिडिओमुळे चित्रपटातील काही महत्त्वाचे सीन्स आणि कलाकारांच्या भूमिका उघड झाल्या आहेत.

व्हायरल क्लिपमध्ये काय दिसले ?

सोशल मीडियावर वेगाने पसरत असलेल्या या १ मिनिट २८ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये रणबीर कपूरची भगवान रामाच्या रूपातील दमदार एन्ट्री पाहायला मिळत आहे. याव्यतिरिक्त, आणखी एका व्हायरल व्हिडिओमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार यश (Yash) हा रावणाच्या रौद्र भूमिकेत दिसत आहे. कलाकारांचे हे लूक समोर आल्याने सोशल मीडियावर या चित्रपटाचीच चर्चा रंगली आहे.

निर्मात्यांची पायरसी विरोधात कठोर कारवाई

या प्रकाराची गंभीर दखल घेत चित्रपट निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या टीमने तातडीने कठोर पावले उचलली आहेत. निर्मात्यांच्या लीगल टीमने आणि अँटी-पायरसी पार्टनर्सनी शनिवार रात्रीपासूनच इंटरनेटवरून हे सर्व अनधिकृत व्हिडिओ हटवण्याची मोठी मोहीम (Anti-Piracy Operation) हाती घेतली आहे. तसेच, प्रेक्षकांनी अशा अनधिकृत आणि लीक झालेल्या क्लिप्स पाहू नयेत किंवा शेअर करू नयेत, असे आवाहनही मेकर्सकडून करण्यात आले आहे.

अधिकृत ट्रेलर आणि चित्रपट कधी येणार ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेक्षकांना या भव्य चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर २४ जुलै रोजी सिनेमागृहांमध्ये पाहता येणार आहे. तर, संपूर्ण देशभरात 'रामायण: पार्ट १' हा चित्रपट ८ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >