शिक्षक आणि विद्यार्थी

प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ


 

कोणत्याही व्यवसायिकाला किंवा नोकरदाराला एकाच पारड्यात तोलणे चुकीचे आहे. आपण शिक्षकांची उदाहरणे घेऊ या. जगभरातील लाखो विद्यार्थी, आपण शिक्षकांमुळे घडल्याचे सांगतात आणि हे खूपदा खरेही असते. ज्या घरात अशिक्षित माणसे असतात, त्या घरातल्यांना खूपदा शिक्षणाचे महत्त्व असतेच असे नाही अशा वेळेस शिक्षक त्या विद्यार्थ्याला सांभाळून घेतात. त्यांच्या घरच्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून देतात. कधीकधी पदरचे पैसे घालून त्यांची फी भरतात. त्यांना पुस्तके आणून देतात.पण कधी कधी शिक्षकांवर त्यांच्या अयोग्य वर्तनाविषयी टीका केली जाते. शिक्षक पक्षपातीपणा करतात, असे आपण विद्यार्थ्यांकडून ऐकतो. याचे मला माझ्या शाळेतील उदाहरण आठवते. आमच्या शाळेतील एक वर्गशिक्षिका एके दिवशी वर्गात आल्या आणि म्हणाल्या, “अरे हा मुलगा आला नाही का आज? मग तुम्ही काल शिकवलंय त्याचा अभ्यास करा. उद्या तो आल्यावर आपण पुढचा नवीन धडा सुरू करू.” आम्ही आठव्या वर्गात शिकत होतो तेव्हा, त्यामुळे तो जो विद्यार्थी आला नव्हता तो वर्गात पहिला येणारा विद्यार्थी होता. त्या शिक्षिकेसाठी आम्ही कोणीच नव्हतं जणू... त्याला शिकवण्यासाठी त्या वर्गात येत होत्या, असे आम्हाला वाटून गेले! किंवा एखाद्या विद्यार्थ्याला त्याची चूक नसताना शिक्षा करणे आणि एखाद्याची स्पष्ट चूक दिसत असूनही त्याला माफ करणे, हेही मी पाहिलेले आहे.


एकदा सुपरव्हिजनसाठी गेले असताना माझ्यासोबत आणखी एक शिक्षक होते. परीक्षेच्या काळात मुलांची अवस्था फार वाईट असते. आपण अभ्यास केलेला आठवेल का? परीक्षेत सोपे प्रश्न येतील का? पेपर वेळेत लिहून पूर्ण होईल का? इ. अशा पार्श्वभूमीवर माझ्या सोबतीचे शिक्षक छोट्याशा कारणावरून एका विद्यार्थ्याला खूप ओरडत होते. परीक्षेच्या काळात अस्वस्थतेतून त्यांच्याकडून कधी आयकार्ड वगैरे आणायचे विसरले जाऊ शकते किंवा आणखीही छोट्या-मोठ्या चुका होऊ शकतात. अशा वेळेस कमीत कमी परीक्षेच्या काळात तरी त्यांना थोडेसे समजून घेऊन त्यांच्याशी मायेने व्यवहार करायला हवा, असे मला वाटते. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतोच! ‘शिस्त’ काय असते हे शिक्षक म्हणून मी नेहमी समजून घेतले आहे; परंतु विद्यार्थ्यांना ‘माणूस’ म्हणून समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे, ज्यावर मी नेहमीच भर दिला आहे. अवाजवी शिस्तीमुळे एखादा विद्यार्थी आणखी बिघडू शकतो किंवा आत्महत्येपर्यंतही तो सहज जाऊ शकतो. प्रत्येक माणसामध्ये थोडेफार गुण आणि अवगुण असतात तर या विद्यार्थ्यांचे गुण कशा तऱ्हेने गुणता येतील आणि अवगुण कशा तऱ्हेने भागता येईल याचा प्रयत्न मात्र शिक्षक म्हणून प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे!
आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे त्यांची अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून आई-वडील जीवाचे रान करतात; परंतु काही शिक्षक काय करतात बघा.


एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एकदा नव्हे तर वारंवार बलात्कार केले. नवी मुंबई येथील या शिक्षकावर आरोप सिद्ध झाले आणि त्याला वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली.अशा एक नाही अनेक घटना आसपास सातत्याने घडत असतात. भाईंदर येथे एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केले तेव्हा त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक झाली. त्याला कोणती शिक्षा झाली हे नंतर कळू शकले नाही.अशाही वेगवेगळ्या परिस्थितीतून, भयावह मानसिकतेतून खडतर वाट काढत विद्यार्थी शिकत असतात. विद्यार्थ्यांना निव्वळ शिकवणे, हे शिक्षकांचे कार्य नसून त्यांच्यावर चांगले संस्कार घडवणे हेही शिक्षकांचे एक महत्त्वाचे कार्य आहे. शिक्षक मग तो पुरुष असला तरीसुद्धा मातृदयाचा असला पाहिजे! विद्यार्थी हे त्याला आपल्या स्वतःच्या अपत्यांसारखे वाटले पाहिजे! पण असे घडतेच असेही नाही. या पार्श्वभूमीवर एक अतिशय चांगली घटना उद्धृत करते. -उत्तराखंडच्या अतिशय डोंगराळ असलेल्या एका भागात असलेल्या शाळेत एका विद्यार्थिनीची प्रकृती अचानक बिघडली. या खेडेगावात हॉस्पिटल तर जाऊ द्या; परंतु कोणता डॉक्टरही नव्हता. तसेच वाहतुकीची ही कोणतीही सुविधा नव्हती. या परिस्थितीत शाळेतील एका हिमानी जोशी नावाच्या शिक्षिकेने आपल्या ओढणीने त्या मुलीला पाठीवर बांधले आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले. हा प्रवास अतिशय खडतर होता, शिवाय सहा किलोमीटर अंतरावर पहिले हॉस्पिटल होते.


ज्या प्रेमाने आणि तत्परतेने निर्णय घेऊन या शिक्षिकेने या विद्यार्थिनीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले त्यामुळे त्या मुलीला वेळेत उपचार मिळाले आणि त्या मुलीला जीवदान मिळू शकले. कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील असलेल्या हिमानी जोशी या शिक्षिकेचे खूप कौतुक झाले. मानवतावादाचे इतके सुंदर उदाहरण तिने आपल्या डोळ्यांसमोर ठेवले आहे, त्यातून आपण निश्चितपणे प्रेरणा घेतली पाहिजे!
pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment

आषाढ... परंपरेतला अन् प्रत्यक्षातला

- चिंतन; डॉ. साधना कुलकर्णी आषाढ मनात आशा घेऊनच उजाडतो. व्याकूळ होऊन संपूर्ण सृष्टी पावसाची वाट बघू लागते. इतर

एका गीतातून जन्मलेला चित्रपट

- स्मृतीपटल; अनिल तोरणे कोणा व्यक्तीला केव्हा आणि कोठे कशापासून प्रेरणा मिळेल हे सांगता येणार नाही. सुप्रसिद्ध

‘अबके हम बिछड़े तो शायद…’

- नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे उर्दूतील शेरोशायरी अनेकदा रोमांसमधील अगदी तरल भावनांच्या सूक्ष्म छटाही सहज

नर्मदातीरावरील तीर्थांचा महिमा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे भारतातील गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा या नद्यांपैकी नर्मदा नदीच्या केवळ

संकोच नव्हे, संवाद हवा!

- आनंदी पालकत्व; डॉ. स्वाती गानू आजही अनेक पालक मुलांशी लैंगिक शिक्षणाबद्दल बोलणे टाळतात. काहींना संकोच वाटतो,

दिलमें जुनून चाहिये...

स्पंदन-अश्विनी भोईर झटपट यश कसं मिळेल, यशाचा मूलमंत्र असे सांगणारी अनेक पुस्तकं आपल्याला बाजारात विक्रीला