दैवजात दुःखे भरता…

- ललित; माधवी मसुरकर


गीत रामायणात जेव्हा श्रीराम भरताला वनवासाचे सत्य समजावून सांगतात, तेव्हा ते जीवनाचे महान तत्त्वज्ञान सांगतात - ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा.’ म्हणजे दुःख हे जन्मासोबतच येतं, त्याचा दोष कोणालाही देता येत नाही.


जीवनाचे खूप मोठे तत्त्वज्ञान प्रभू रामचंद्र इथे सांगून जातात. कितीही कठीण काळ आला तरी ते आपले दैव समजून त्याचा विनातक्रार स्वीकार करायचा हा समजूतदारपणा, विनयशीलता आणि मनाचा मोठेपणा प्रभू श्रीरामाकडून शिकावा. प्रभू रामचंद्र हे देव असूनसुद्धा त्यांना भोग सुटले नाहीत, तर आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा?


माणूस जन्माला येताना सुख आणि दुःख बरोबर घेऊन येतो. त्यातील सुख हे प्रत्येकाला हवेहवेसे असते पण दुःख मात्र कोणालाच नको असते. कारण ते मनाला यातना देते, तर सुख आनंद देते. सुख म्हणजे नक्की काय हे मात्र ठोस कोणालाच सांगता येत नाही. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी...सुखाचा शोध घेण्याचा मार्ग वेगळा.


गेला महिनाभर मी आमच्या मूळगावी राहते आहे. खूप मानसिक शांतता मिळाली मला इथे येऊन. छोटंसं गाव... निसर्गाचं वरदान लाभलेलं...हिरवागार परिसर, थंड आणि मोकळी प्रदूषणविरहित हवा... तुरळक वस्ती... कोणीही गर्भश्रीमंत नाही... जे आहे ते स्वकष्टाने मिळविलेले...प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आहे... प्रॉब्लेम कुणाला नाहीत असे नाही पण त्याचा बाऊ करताना दिसत नाहीत. दुःखाचा देखावा नाही. गावातील कुटुंबांमध्ये वाद आहेत पण अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावून जाण्याची वृत्ती आहे. सगळे सणसमारंभ एकत्रित येऊन साजरे करतात तेव्हा वादविवादाचा मागमूसही नसतो... TEAM या शब्दाचा अर्थच... Together Everyone Achieves More... इथे सापडतो. वाद कितीही असले तरी शेवटी आम्ही एकमेकांसोबत आहोत ही भावना जेव्हा येते तेव्हा एक प्रकारची सुरक्षितता येते. विश्वास निर्माण होतो. सुखाची आशा निर्माण होते आणि दुःखाला थारा मिळत नाही. ‘मी एकटा नाही’ ही भावनाच माणसाला जगण्याचं बळ देते. दुःखाला दूर ठेवते.


सुखाच्या फार मोठ्या अपेक्षा नाहीत यांच्या. दोन वेळचे पोटभर जेवण. दिवसभर श्रम करून रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या झोप किंवा देवळात हरिनाम घेता घेता ब्रह्मानंदी टाळी लागणे एवढ्याच बहुतेक सुखाच्या कल्पना असाव्यात. मला वाटतं, सुखाच्या कल्पना अशाच मर्यादित असाव्यात म्हणजे दुःख वाट्याला येत नाही. माणूस जेव्हा अधिक सुख मिळविण्याच्या मागे लागतो आणि ते मिळत नाही... गरजा आणि अपेक्षा यांचा ताळमेळ बसत नाही तेव्हा तो दुःखाला जवळ करतो.


समर्थ रामदास स्वामीनी म्हटले आहे, “जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना, तूची शोधून पाहे।।” दुःख हे प्रत्येकाच्या नशिबी आहे. जेव्हा सुखाच्या वाटा बंद होतात तेव्हा दुःखाची जाणीव होते. म्हणजे सुखाचा अनुभव आधी घेतलेला असतो तो सुखद असतो म्हणून नंतर दुःखाची झळ सोसवत नाही. आणि मग आपण म्हणतो, दुःख माझ्याच वाट्याला का? पण जेव्हा सुख उदंड मिळालेले असते तेव्हा हे सुख फक्त माझ्याच वाट्याला का? असे मात्र आपण म्हणत नाही. म्हणजे हा स्वार्थीपणा झाला.मनुष्य आहेच मुळात स्वार्थी. पशुपक्षी, प्राणिमात्र हे गरजेपुरतेच अन्न घेतात. पण माणूस गरजेपेक्षा जास्त साठा करतो आणि ते जतन करण्यासाठी कायम चिंतेत राहतो. दुःखाचा उगम हा स्वार्थीपणातच असतो. दुसऱ्याचे दुःख आपल्यापेक्षा जास्त आहे याची जाणीव जेव्हा होते तेव्हा स्वतःच्या सुखाचा शोध लागतो.


स्वतःकडे आणि जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहावे, अंतर्मुख व्हावे म्हणजे सुखदुःख हे तत्त्वज्ञान ध्यानी येते. पण आपण आनंदी क्षण विसरून जातो आणि दुःखाला कवटाळून बसतो म्हणून कायम असमाधानी राहतो. सुखदुःखाचा फेरा कोणालाच चुकलेला नाही. अगदी देवांनाही नाही. पुराण काळातील सत्यवती, पराशर, राजा शंतनू आणि भीष्म देवव्रत याची कथा म्हणजे एका महत्त्वाकांक्षी स्त्रीची नियतीने केलेली वाताहत आणि निर्मोही सत्यवचनी असूनसुद्धा देवव्रतची शोकांतिका दाखवते. रामाला चौदा वर्षांचा वनवास चुकवता आला नाही. कर्ण कुंतेय असूनसुद्धा सूत पुत्र म्हणून आयुष्यभर त्याची अवहेलना झाली. कृष्णाने तर आयुष्यभर त्यागच केला. आपण कोणताही विरह सहन करू शकत नाही आणि औदासीन्य येते तेव्हा कृष्णाला आठवावे. आपली आवडती गोष्ट हातातून निसटून गेल्यानंतरही सुखी कसे राहावे हे भगवान श्रीकृष्णाकडून शिकावे.


जीवनात येणाऱ्या दुःखांचा सामना हसत हसत करता आला पाहिजे. वर्तमान काळात कितीही चांगले कर्म केले तरी दुःख चुकत नाही जर ते प्राक्तनात लिहिलेले असेल तर….


त्यामुळे उगाचच...‘मी कोणाचे काय वाईट केले म्हणून हे भोग माझ्या वाट्याला आले?’ यासारख्या विचारांना मनात थारा देऊ नये. त्या दुःखाची धार बोथट व्हावी म्हणून चांगले कर्म, परमेश्वराची आराधना मात्र जरूर करावी. पण परमेश्वर त्यांनाच मदत करतो जे स्वतःच्या बळावर आयुष्याची लढाई लढतात. तो फक्त दिशा दाखवतो... लढायचे आपल्यालाच आहे...आपण कर्तव्याला चुकत नसू, नीतिमत्ता आपल्या अंगी असेल तर तो आपल्याला विजय मिळवून देतो. गीतेमध्ये म्हणूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला भर रणांगणात वेदार्थ सांगितला होता...“कर्तव्याने घडतो माणूस...भाग्य चालते कर्मपदानी...!”
आपण लढू शकतो निश्चितच.. फक्त आत्मविश्वास पाहिजे.


जेव्हा मनात असूनही काहीही करणे आपल्या हाती नसते तेव्हा परिस्थितीला सामोरे जाण्यावाचून पर्याय राहात नाही. आपण खूप स्वप्न बघतो पण ती सत्यात उतरतातच असे नाही. ज्यांची सत्यात उतरतात ते नशीबवान असतात. नशिबात असते तेच घडते. भविष्यात काय होणार आहे याची चिंता करीत बसू नये. कारण भविष्यात काय दडलंय हे आपल्याला कुठे माहीत आहे?


व. पू. काळे यांचे शब्द इथे आठवतात. “वादळं जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने ती निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे असते ते आपण त्याच्याशी कशी झुंज देतो ते आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर पडतो हे.”


जीवनाचे तत्त्वज्ञान हेच तर आहे. सुखद आठवणी मनाच्या कुपीत जपायच्या आहेत आणि वाईट घटनांना विसरून जायचे आहे. जे मनाला रुचत नाही त्याकडे दुर्लक्ष करायचे आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशाने सुखी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगताना म्हटले आहे की,


“जिंदगी को जीना आसान नही होता... जिंदगी को जीना आसान बनाना पडता है । कैसे?
कुछ सब्र करके... कुछ बरदाश्त करके...
कुछ नजर अंदाज करके।।”

Comments
Add Comment

जाणीव ठेवून केली परतफेड...

- स्मृतीपटल; अनिल रा. तोरणे - आपण केलेक्या त्यागाचे फळ आपल्याला कधी ना कधी तरी मिळतेच. हिंदी चित्रपटसृष्टीतील

मैत्री ते फ्रेंडशिप...; एक उत्क्रांती

- निमित्त; साधना कुलकर्णी - आज जगताना आपल्याला प्रत्यक्ष आणि आभासी विश्वात वावरणं हे एक अटळ वास्तव आहे. त्यामुळे

चिरकारीची कथा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे स्कंद पुराणानुसार ही कथा महर्षी नारदांनी महिसागर संगमाच्या

‘तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी!’

- नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे इंग्रजी सिनेमात आपल्यासारखी आणि आपल्याइतकी गाणी नसतात. ही काही कौतुकाची बाब

मुलांच्या एकाग्रतेसाठी माइंडफुलनेस

- आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू आई, माझं पुस्तक कुठे आहे?” पुस्तक टेबलावरच असतं. “माझी पेन्सिल दिसत नाही!” ती

भारतीय शिक्षणतत्त्वज्ञानाचे शिल्पकार

- आठवण; प्रा. डॉ. बाळासाहेब मुरादे - लोकमान्य टिळकांना केवळ न्यू इंग्लिश स्कूल किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे