- नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे
इंग्रजी सिनेमात आपल्यासारखी आणि आपल्याइतकी गाणी नसतात. ही काही कौतुकाची बाब आहे असे मुळीच नाही पण असे आहे हे खरे. तिकडे गायकांचे अल्बम निघतात. त्यातही पुन्हा ऱ्हिदमला अर्थात ठेक्याला किंवा तालाला जास्त महत्त्व असते. सहसा त्या गाण्यांचा उपयोग संथ चालीच्या नाचासाठी होतो. आपल्यासारखे गाण्यातील कवितेला, आशयाला फार महत्त्व नसते. आपल्या गीतकारांनी मात्र एकेक कमाल करून ठेवली आहे.
साहीर लुधियानवींनी १९६५ साली आलेल्या ‘वक्त’सारख्या चित्रपटात क्लबमधील एका नर्तकीच्या तोंडी अख्खा चार्वाक मुनी उतरवला होता. इंदीवर यांनी १९६७ सालच्या मनोजकुमारच्या ‘उपकार’मध्ये एक चिंतनशील गाणे चक्क प्राणच्या तोंडी देण्यासाठी लिहिले होते. ‘सजन रे झुठ मत बोलो खुदाके पास जाना हैं’ हे सुंदर संदेश देणारे गाणे १९६६ सालच्या ‘तिसरी कसम’मध्ये शैलेन्द्रजींनी एका बैल-गाडीवानाच्या तोंडी दिले होते. त्याकाळी कोणत्याही भारतीय भाषेतले गाणे रागदारीशी नाते टिकवणारे, कर्णमधुर संगीत देणारे आणि काहीतरी अर्थपूर्ण आशय असलेले नसेल तर सहसा गाजत नसे. निदान चित्रपटांच्या सुवर्णकाळात तरी नक्कीच गाजू शकत नसायचे.
पूर्वी रेडिओ हे मनोरंजनाचे विनामूल्य आणि सहज उपलब्ध असलेले माध्यम होते तेव्हा तर रेडिओवर सिनेगीतांइतकीच भावगीतेही लोकप्रिय होती. भावगीतांच्या त्या नितांत सुंदर काव्यरचना करणाऱ्यात गदिमा, शांताराम नांदगावकर, मंगेश पाडगावकर, बा. भ. बोरकर, गंगाधर महाम्बरे, शांता शेळके, रमेश अणावकर, आरती प्रभू, सुरेश भट, कुसुमाग्रज, राजा बढे, सुधीर मोघे, ना. धों. महानोर, ग्रेस शांताराम आठवले, मधुकर जोशी हे आणि असे अनेक दिग्गज कवी होते.
काही भावगीते म्हणजे मनस्वी प्रेमकविता होत्या, विरहाचे दु:ख सांगणाऱ्या विरहिणी होत्या, कौटुंबिक नात्यातील प्रेमकाव्य होते, भजने होती, भक्तिगीते होती, जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान सांगणारी गाणी होती, तर काही निसर्गाचे सौंदर्य डोळ्यांसमोर उभी करणारी निसर्गगीते होती, रोमँटिक गाणी होती. या भावगीतात काय नव्हते? हाच प्रश्न जास्त योग्य ठरेल इतकी विविधता या महान कवींच्या गाण्यात दिसायची.
उत्तर भारतात अध्यात्म अगदी साध्या शब्दांत सोपे करून सांगणारे कबीरदासजींचे दोहे अनेकांच्या ओठावर होते. मधुकर जोशी या सिद्धहस्त कवीने कबीरदासजींच्या अशाच एका सुंदर दोह्यावर एक भावगीत लिहिले. कबीरदासजींच्या दोह्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात केवळ दोन ओळीतच खूप मोठा आशय समावलेला असतो. तो कबीरदासजी भाविकांच्या मनात सहज उतरवत.
एका दोह्यात त्यांनी कल्पना केली होती, की जेव्हा भांडी बनवण्यासाठी कुंभार पायाने माती तुडवत तिला मऊ करत असतो तेव्हा ती मातीच त्याच्याशी बोलू लागते. ती म्हणते, ‘अरे बाबा, तू मला आज तुडवत आहेस पण मनात गर्व निर्माण होऊ देऊ नकोस. शेवटी तुझा अंत तर माझ्याच पायापाशी होणार आहे ना?’ त्या दोह्याचे शब्द होते –
‘माटी कहे कुम्हारसे, तू क्या रौंदे मोहे।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूंगी तोहे।’
या दोन ओळींनी प्रभावित झालेल्या मधुकर जोशीजींनी मग त्या ओळींवरच पुढे अत्यंत लोकप्रिय ठरलेले, एक भावगीत लिहिले होते. त्यावेळचे प्रसिद्ध गायक गोविंद पोवळे यांनी त्या भावगीताला संगीतही दिले आणि स्वत: ते गाणे गायलेही! अगदी साधे शब्द आणि कोणत्याही विचारी मनाला अंतर्मुख करणारा संदेश -
‘माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी,
तुझाच आहे शेवट वेड्या, माझ्या पायाशी!’
श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर सगळे चित्र उभे करताना कवी म्हणतात, ‘तू मला तुझ्या पायांनी तुडवतोस, मग सारखे करण्यासाठी चाकावर फिरवतोस आणि नंतर माझ्यापासून सुंदर भांडी तयार करतोस. पण त्या प्रत्येक भांड्याचे भविष्य नियतीच ठरवत असते. कधी एखाद्या घटाचा वापर लग्नासारख्या मंगलप्रसंगी पवित्र धार्मिक विधीत होतो (पण मी त्याचा कधीच गर्व करत नाही कारण) तर कधी माझे घट अंत्यसंस्कारासाठी मृत व्यक्तीच्या प्रेताजवळही पडून असतात. (पण तुझा शेवट मात्र फक्त माझ्याच पायाशी होणार आहे!)
‘मला फिरविशी तू चाकावर,
घट मातीचे घडवी सुंदर.
लग्नमंडपी कधी असे मी, कधी शवापाशी,
तुझाच आहे शेवट वेड्या, माझ्या पायाशी...’
इतिहासात ज्यांनी मोठा पराक्रम केला, राज्यविस्तार केला, नाव आणि संपत्ती कमावली ते मोठे राजेरजवाडेही शेवटी माझ्याच पायाशी येऊन विसावलेत. इथे संत कबीरदासजी मध्यपूर्वेतल्या धार्मिक परंपरेत रूढ असलेल्या प्रतिमा वापरत आहेत. त्यामुळे हिंदू धर्मातील दहनसंस्काराचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. ते म्हणतात, मोठमोठे जग्ग्जेतेसुद्धा माझ्याच पायाशी येऊन निद्राधीन झाले आहेत. अष्टवक्रा, काळी, कुबडी, कुब्जा असो की अप्सरेसारखी सुंदर युवती असो, शेवटी माझ्याच पायाशी येऊन विसावतात!
‘वीर धुरंधर आले गेले,
पायी माझ्या इथे झोपले.
कुब्जा अथवा मोहक युवती, अंती मजपाशी,
तुझाच आहे शेवट वेड्या, माझ्या पायाशी..’
गाण्यात कवी मातीचे आणि कुंभाराचे प्रतीक वापरून जणू आपल्यालाच विचारत आहेत, ‘कसला अभिमान बाळगतोस? आपल्या क्षणभंगुर भौतिक संपत्तीचा आणि प्रतिष्ठेचा गर्व कशाला करतोस? ते सर्व धन इथेच सोडून तुला शेवटी मातीतच जाऊन मिळायचे आहे.
‘गर्वाने का ताठ राहसी?
भाग्य कशाला उगा नाससी?
तुझ्या ललाटी अखेर लिहिले,
मिलन माझ्याशी.
तुझाच आहे शेवट वेड्या, माझ्या पायाशी..’
पूर्वी असा अध्यात्मिक शिकवण देणारा विषयही गाण्यात नियमित दिसत असे. फक्त कवींनाच नाही तर रसिक श्रोत्यानाही तो भावत असायचा. पहाटे पहाटे आकाशवाणीवर लागणाऱ्या भक्तीसंगीतात ऐकल्यामुळे मनावर बिंबत असते. आज आपण पाहतो, की शृंगारिक प्रेम, विषयविलास, शारीरिक सुखाची थेट धरलेली अभिलाषा हे विषय आधुनिक साहित्यात प्रतिष्ठित होऊन बसलेत. त्यात कुणालाच काही गैर वाटेनासे झाले आहे. पण ज्यांनी सिनेगीतांचा आणि रेडिओवरील भावगीतांचा सुवर्णकाळ पाहिला आहे त्यांना अशी भावगीते आजही ऐकाविशी वाटतात. त्यातल्या त्यात सुदैव म्हणजे त्यासाठी युट्यूबसारखे विनामूल्य माध्यम आता सर्वांनाच उपलब्ध आहे.