मैत्री ते फ्रेंडशिप...; एक उत्क्रांती

- निमित्त; साधना कुलकर्णी


- आज जगताना आपल्याला प्रत्यक्ष आणि आभासी विश्वात वावरणं हे एक अटळ वास्तव आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी नीरक्षीर विवेक अत्यंत आवश्यक आहे. प्रतिष्ठा आणि संख्येसाठी फ्रेंड्स की साचलेपणाला वाट देण्यासाठी मित्र, यात नेमकं काय गरजेचं आहे हे निश्चित करण्याची वेळ आली आहे. तात्पुरतं की कायम, मज्जा की आनंद, टाईमपास की आश्वस्तता या प्रश्नामध्ये समतोल साधण्याचा विवेक अंगी बाळगणं हेच महत्त्वाचं.



आजी तुला निटींग येतं ना? मला फ्रेंडशिप बँड्स करून दे ना... रंगीबेरंगी लोकर, मोती, मणी, घुंगरू असं साहित्य समोर ठेवत माझ्या नातीने आदेश दिला. तिचा आदेश धुडकावण्याची माझ्यात कुठे हिम्मत?
ओके. किती बँड्स तयार करायचे?
तू वीस सिंपल बँड्स तयार कर आणि पाच एकदम मस्त कर. माझ्या पाच बेस्ट फ्रेंड्ससाठी.
अर्थातच मी मान हलवली.


ए आजी, तुला किती फ्रेंड्स आहेत? शाळेत असताना तुम्ही असे बँड्स बांधायचे का गं?
आता यावर नेहमीप्रमाणेच बौद्धिक आणि तात्त्विक उत्तर देण्यासाठी माझी जीभ उचलली गेली; पण ती टाळ्याला लावण्याचा मोह प्रयत्नाने आवरला. कारण या पिढीला मुळात मराठी शब्दांचा अर्थच समजत नाही. त्यात बोधपर भाष्य म्हणजे सोऽऽऽऽ बोअरिंग. त्यांच्या उत्क्रांत मेंदूमध्ये असल्या जुनाट विचारांच्या प्रोसेसिंगचा प्रोग्रामच नाही, त्याला ते तरी काय करणार? इथे मला आमचा बाळबोध कार्यक्रम (प्रोसेसिंग हो.) आठवतो. आम्ही थोरा-मोठ्यांची वक्तव्ये आणि सुभाषिते एका डायरीत लिहून ठेवत असू. निबंधात, प्रसंगानुरूप आणि कधी मधी जगण्यातही त्यांचा उपयोग करत असू. आता लहानपणापासून हा कार्यक्रम हार्डवायर्ड असल्याने कधीमधी उफाळून येतोच. डिलीटही होत नाही मेला. पण हो, त्याचा कमीत कमी वापर करण्याचं कौशल्य मात्र मी आत्मसात केलंय.
मी शांतपणे म्हणाले, मला ना? मला सात मैत्रिणी आहेत आणि त्या बँड बांधणाऱ्या नाही, तर बंध जपणाऱ्या आहेत. (अपेक्षेनुसार शेवटचं वाक्य अर्थातच व्होलाटाईल.) फक्त सात? ममाला तर वन थाऊजंड सिक्स्टी फाईव्ह फेसबुक फ्रेंड्स आहेत.


पुन्हा एकदा जीभ वळवळली. पण संयमानं मी म्हणाले, हो गं, काही लोकांना तर फाईव्ह लॅक्स फ्रेंड्स असतात. मी पण मोठी झाली की असेच खूप फ्रेंड्स जमवणार आहे आजी.


तथास्तु! म्हणत मी विषय संपवला आणि लोकर, सुया हातात घेतल्या. महाभारतात एकदा युधिष्ठिर भीष्माचार्यांना आपल्या मनातल्या शंका विचारत असताना उत्तम मित्र कसे ओळखावेत असा प्रश्न विचारतो. त्यावेळी भीष्माचार्य त्याला सहार्थ, भजमा, सहज आणि कृत्रिम असे मित्रांचे चार प्रकार सांगतात. सहार्थ म्हणजे ज्या मित्राला आपल्याकडून अपेक्षा असतात आणि ही मैत्री केवळ देवाणघेवाणीवर अवलंबून असते. भजमान म्हणजे कौटुंबिक नात्यांमधून निर्माण झालेली मैत्री. भावा-बहिणीची, नवरा-बायकोची, सासू-सुनेची, नणंद-भावजयीची, आई-मुलांची इ.इ. यात नात्यांचे बंध अधिक बळकट करण्याची क्षमता असते. तिसरी सहज मैत्री म्हणजे निरपेक्ष मैत्री. अगदी लहानपणापासून असणारी आणि आयुष्यभर निगुतीने जपलेली. या मैत्रीत एकमेकांची सुख -दुःखं, जय-पराजय, गुण-अवगुण, मान- अपमान, गुपित सगळं माहीत असतं आणि कशानेही या मैत्रीत फरक पडत नाही. प्रेम, निरपेक्षता, जिव्हाळा आणि आधार हे या मैत्रीचे चार खांब. असे मित्र जितके जास्त, तितकी ती व्यक्ती जास्त श्रीमंत. त्यानंतर चवथी कृत्रिम म्हणजे मतलबी मैत्री. मतलब साध्य होत नाही तोपर्यंत मैत्री टिकवून ठेवायची. एकदा काम झालं की मग, तू कोण? असं हे चार प्रकारचं मैत्र. भजमान आणि सहज मित्र मिळणं हे भाग्यच.


आता महाभारताच्या काळात फेसबुक नव्हतं म्हणून. नाही तर भीष्माचार्य यांनी फेबु. मित्र; नाही नाही, फेबु. फ्रेन्ड हा पाचवा प्रकार नक्कीच सांगितला असता. पण बरं झालं फेसबुक नव्हतं त्या काळी. नाही तर आधीच प्रचंड गुंतागुंत असलेलं हे महाकाव्य आणखी अवघड झालं असतं. शिवाय भीष्माचार्यांसारख्या महारथीला सुद्धा मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखणं कठीण झालं असतं. असो. पण फेसबुक आणि इन्स्टाने (मला येवढेच माहीत आहेत) मित्र आणि मैत्री यात प्रचंड उत्क्रांती घडवून आणली आहे. आता ती मित्र आणि मैत्री नसून फ्रेंड आणि फ्रेंडशिप ही संकल्पना झाली आहे. ही उत्क्रांती शारीरिक, मानसिक, वैचारिक, वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर झाली आहे. मुळात हा मैत्रीचा; नव्हे, फ्रेन्डशिपचा पाया ‌‘विश्वचि माझे घर‌’ या वैश्विक भूमिकेवर आणि विशाल मनोवृत्तीवर आधारित आहे. आयुष्यात ज्या व्यक्तीला कधी प्रत्यक्ष बघितलं नाही, जिच्या संबंधी काहीही माहिती नाही, अशा व्यक्तीला फ्रेंड म्हणून स्वीकारणं हे ‌‘वसुधैव कुटुंबकम‌’चं लक्षण नाही काय? वय, लिंग, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, भौगोलिक सीमा, प्रतिष्ठा... काहीही या फ्रेंडशिपच्या आड येत नाही. सगळीकडे कसं फ्रेंडली वातावरण. ही फे.बु. फ्रेंड प्रजाती सध्या विलक्षण फोफावली आहे. कोविड विषाणूपेक्षा वेगाने व्हायरल होणाऱ्या या प्रजातीने समस्त जनतेला ग्रासलं आहे.


या फ्रेंडशिपची लागण झालेले फ्रेंड्स सदैव लाईक्स, अंगठे, बदाम, जीआयएफ देण्यात एक तर व्यस्त असतात, नाही तर स्वतःला आलेले मोजण्यात व्यस्त असतात. यात गुणवत्तेपेक्षा संख्येला जास्त महत्त्व असतं. चुकून एखाद्याने विरोधाची भाषा केलीच तर त्याला अनफ्रेंड करण्याचं वैशिष्ट्यही या उत्क्रांत फ्रेंडशिपमध्ये आहे. किंबहुना, एखाद्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवण्याची किंवा पायदळी तुडवण्याची क्षमता या उत्क्रांतीमुळे निर्माण झाली आहे. प्रामाणिक प्रतिक्रिया कितीही कुचकट असो, पण कौतुक, अभिनंदन, आनंद व्यक्त करण्याचा मनाचा मोठेपणा या प्रजातीमध्ये आवर्जून आढळतो. आता तर घराघरातल्या नातेवाइकांनीही फ्रेंडशिप स्वीकारली आहे, ज्यामुळे नावडते नातेसंबंधही दृढ झाले आहेत. शिवाय घरात एकाच ठिकाणी बसून (किंबहुना त्यामुळेच) ही फ्रेंडशिप निभावता येत असल्याने वेळ, पैसा, यातायात यांची बचत आणि ऊर्जा, पर्यावरण यांचं संरक्षण या महत्त्वाच्या उपलब्धी या उत्क्रांतीमुळे साध्य झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या (मुळात नसलेल्या) कलागुणांच्या प्रदर्शनाची आवड या फ्रेंड्स प्रजातीत प्रामुख्याने आढळून येते आणि मग यातून स्पर्धा, ईष्या, मत्सर, कुरघोडी हे (गुण) वाढीला लागले आहेत. असं असलं तरी अजूनही काही अतिचिवट मित्र जातीने (फ्रेंड्स नाही) या उत्क्रांतीसमोर शरणागती पत्करलेली नाही. आभासी दुनियेतील फ्रेंडसच्या झंझावातात या जातीने आपली पाळेमुळे जपून ठेवली आहेत.


कुपथ निवारि सुपंथ चलावा।
गुन प्रगटै अवगुनन्हि दुरावा॥
देत लेत मन संक न धरई।
बल अनुमान सदा हित करई॥


‌‘श्रीरामचरितमानस‌’मधील किष्किंधा कांडात गोस्वामी तुलसीदास यांनी उत्तम मित्राचे वर्णन केले आहे. वाईट मार्गाने जाणाऱ्या मित्राला योग्य दिशेने वळवणारा, त्यांचे गुण प्रकट करून अवगुण झाकणारा, नि:शंकपणे देणारा आणि घेणारा तसेच आपल्या कुवतीनुसार मित्राचे सदैव हित जपणारा असा आदर्श मित्र असतो.


पौराणिक काळातली कृष्ण-सुदामा यांची मैत्री सत्ताधीश आणि सामान्य व्यक्तीमधील भेद मिटवणारी आहे. शत्रूपक्षात असूनही राक्षसी त्रिजटेने सीतेच्या पाठीशी उभी राहून, आधार देऊन आपल्या मैत्रीचा एक आदर्श निर्माण केला. दुर्योधन-कर्णाच्या मैत्रीमध्ये कर्णाने दुर्योधनाच्या आचरणाला नाही, तर मैत्रीला प्राधान्य दिले. अकबर बिरबलाची मैत्री ही धर्माच्या भिंतीपेक्षा अभेद्य होती. बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय आणि बिपीनचंद्र पाल, अर्थातच लाल बाल पाल यांच्या राजकीय मैत्रीने (जी आज शोधूनही सापडत नाही) घडवलेला इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते, जे स्वराज्य बांधणीसाठी आवश्यक असे अस्त्र होते. अशी इतिहासातील किती तरी उदाहरणं आपल्याला आढळतील. शेवटी काय, आजच्या या अस्थिर, अस्वस्थ वर्तमानकाळात मित्र हा एक दिलासा, विसावा आहे, तर वेगवान यांत्रिक युगात एकाकी पडलेल्यांसाठी आभासी जगातले फ्रेंडस हा एक विरंगुळा आहे, निराश मनस्थितीवरचा एक उपाय आहे. तेव्हा मित्र असो वा फ्रेन्ड्स, या अनुक्रमे अतूट आणि तात्पुरत्या नात्यातून आनंद, सकारात्मकता आणि रचनात्मक लाभ घेणं आपल्याच हातात आहे आणि हीच काळाची गरज आहे.


Comments
Add Comment

जाणीव ठेवून केली परतफेड...

- स्मृतीपटल; अनिल रा. तोरणे - आपण केलेक्या त्यागाचे फळ आपल्याला कधी ना कधी तरी मिळतेच. हिंदी चित्रपटसृष्टीतील

चिरकारीची कथा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे स्कंद पुराणानुसार ही कथा महर्षी नारदांनी महिसागर संगमाच्या

दैवजात दुःखे भरता…

- ललित; माधवी मसुरकर गीत रामायणात जेव्हा श्रीराम भरताला वनवासाचे सत्य समजावून सांगतात, तेव्हा ते जीवनाचे महान

‘तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी!’

- नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे इंग्रजी सिनेमात आपल्यासारखी आणि आपल्याइतकी गाणी नसतात. ही काही कौतुकाची बाब

मुलांच्या एकाग्रतेसाठी माइंडफुलनेस

- आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू आई, माझं पुस्तक कुठे आहे?” पुस्तक टेबलावरच असतं. “माझी पेन्सिल दिसत नाही!” ती

भारतीय शिक्षणतत्त्वज्ञानाचे शिल्पकार

- आठवण; प्रा. डॉ. बाळासाहेब मुरादे - लोकमान्य टिळकांना केवळ न्यू इंग्लिश स्कूल किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे