कथा-रमेश तांबे पावसाळ्याचे दिवस होते. सगळी धरती हिरवीगार झाली होती. नद्या-नाले पांढरेशुभ्र पाणी घेऊन वाहत होते. झाडांची हिरवी पाने थंडगार वाऱ्यावर नाचत होती. अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. मध्येच उन्हे येत होती. या ऊन-पावसाच्या लपंडावात आकाशातून इंद्रधनू डोकावत होता. पक्षी मस्त विहार करत होते. प्राणी हिरव्याकंच गवतावर ताव मारत होते. आकाशात ढगांचा पकडापकडीचा खेळ सुरू होता. डोंगर उतारावरील झाडे-झुडपे मान वर करून ढगांचा तो विलोभनीय खेळ पाहत होती. सारे वातावरण कसे आल्हाददायक आणि मनाला समाधान देणारे होते.
अशावेळी एक मुलगा ओढ्याच्या काठावर शांतपणे बसला होता. खळाळणाऱ्या ओढ्याच्या पाण्याचे तुषार त्याच्या अंगावर उडत होते. पण त्याची त्याला फिकीर नव्हती. आजूबाजूला पांढरे बगळे, हिरवे पोपट, नयनरम्य पिसारा फुलवून गवतातील किडे टिपणारे मोर असे अनेक पक्षी होते, प्राणी होते. पण कोणास ठाऊक त्या मुलाचे कुणाकडेही लक्ष नव्हते.तेवढ्यात एक हरिण तिथे आले. ते अगदी त्या मुलाच्या जवळ गेले अन् म्हणाले, “काय रे मुला! इतका छान निसर्ग फुललेला असताना तू मात्र असा निराश का?” जसे ओढे-नाले पाण्याने भरले आहेत, तसे तुझे डोळे अश्रूंनी का भरले आहेत?” पण मुलाने हूं की चूं केलं नाही. मग तिथे गोबऱ्या गालाचा ससा असा आला. तोही मुलाला म्हणाला, ‘अरे माझ्याकडे बघ! मी किती भित्रा आहे. पण आज मीसुद्धा या रानात आनंदाने उड्या मारतोय, लुसलुशीत गवत खातो आहे. पण तू असा दुःखी का बसला आहेस.” पण मुलगा मात्र गप्पच! मग एक एक प्राणी-पक्षी त्या मुलाच्या जवळ आले. सगळेच आपापली तहान-भूक विसरून मुलाच्या भोवती जमा झाले. आता मात्र कुणाचा त्रास नको, म्हणून आपण दुसरीकडे जाऊ असा विचार करून मुलगा उठून उभा राहिला. बघतो तर काय शेकडो प्राणी-पक्षी त्याच्या भोवती उभे होते. मग डुलत डुलत एक चिमणी मुलाजवळ गेली आणि म्हणाली, “अरे मला मला सांग काय झालं तुला? असा एकटाच या रानात निराश होऊन का बसलायस?” इवल्याशा चिमणीचं ते मोठ्यांसारखं बोलणं पाहून, तिचं एवढ्या आस्थेने विचारपूस करताना पाहून मुलगा बोलू लागला, “माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही. मला कुणी वेळ देत नाही, माझ्या बरोबर खेळत नाहीत म्हणून मी रुसलो आहे.”
मुलाचे बोलणे एकूण चिमणी खो-खो हसू लागली. आणि म्हणाली, “वेड्या तुझ्यासाठीच तर आम्ही सारे इथे मजा करायची विसरून जमलो आहोत. ही झाडे, हे ओढे-नाले तुझ्यासाठीच तर खळाळून वाहत आहेत. तुझं मनोरंजन करण्यासाठी वारा गाणं म्हणतोय, आकाशात ढग त्यांचे खेळ तुला दाखवत आहेत, इंद्रधनूचा सप्तरंगीपट्टा तुझ्याच गळ्यात पडण्यासाठी आतुर झालाय. प्रत्येक जण तुझ्यावरील प्रेमापोटी तुला आनंदी करण्यासाठी सज्ज आहे. डोक्यातले वाईट आणि चुकीचे विचार बाजूला सार. आपला आनंद कधीच दुसऱ्यांवर अवलंबून नसतो. नीट उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला बघ. तो मोर पिसारा फुलवून उभा आहे. कोकीळ कधीपासून गाणं म्हणतोय तोही तुझ्यासाठीच! अरे आपला आनंद आपणच मिळवायचा.” चिमणीचे बोलणं ऐकून मुलगा भानावर आला. त्याने सभोवताली एक नजर फिरवली आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटली. तो आनंदाने नाचू लागला, टाळ्या पिटू लागला. तोच सगळ्या पक्ष्यांनी किलबिलाट केला आणि सारे प्राणी आनंदाने उड्या मारू लागले. पक्षी आकाशात विहार करू लागले. सारी सृष्टी आनंदात डुंबून गेली. मग मुलगा स्वतः ओढ्यात उभा राहून पाणी उडवू लागला. स्वतःचा आनंद स्वतःच मिळवू लागला... आता आनंदाने कोकीळ गाणं म्हणून लागला... आनंदी आनंद गडे... इकडे तिकडे चोहीकडे!






