गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर
मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी करिअरला खूप महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही ध्येय असते. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, मेहनत आणि योग्य दिशा आवश्यक असते. करिअर म्हणजे केवळ नोकरी किंवा व्यवसाय नव्हे, तर आपल्या क्षमता, आवड आणि कौशल्यांच्या आधारे घडवलेले यशस्वी जीवन होय.महाभारतातील अर्जुन हा एक आदर्श विद्यार्थी होता. धनुर्विद्येच्या सरावाच्या वेळी गुरू द्रोणाचार्यांनी पक्ष्याच्या डोळ्यावर नेम साधण्यास सांगितले. तेव्हा अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळाच दिसत होता. त्याचे संपूर्ण लक्ष ध्येयावर केंद्रित होते. म्हणूनच तो यशस्वी झाला. आपल्या करिअरबाबतही प्रत्येक विद्यार्थ्याने अर्जुनासारखे एकाग्र लक्ष ठेवले पाहिजे.
आजच्या स्पर्धात्मक युगात विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. डॉक्टर, अभियंता, शिक्षक, शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू, उद्योजक अशा अनेक क्षेत्रांत विद्यार्थी आपले भविष्य घडवू शकतात. मात्र करिअर निवडताना इतरांचे अनुकरण न करता स्वतःची आवड, क्षमता आणि कौशल्य यांचा विचार करणे आवश्यक आहे. करिअर घडवण्यासाठी शिस्त, परिश्रम, आत्मविश्वास आणि चिकाटी हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकून पुढे जाणे गरजेचे आहे. योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि सतत ज्ञान मिळवण्याची वृत्ती यामुळे यशाचा मार्ग अधिक सुकर होतो.
करिअर हे एक अर्जुनलक्ष्य आहे. ज्या विद्यार्थ्याचे ध्येय स्पष्ट असते आणि जो त्या ध्येयासाठी निष्ठेने प्रयत्न करतो, त्याला यश नक्कीच मिळते. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून अर्जुनाप्रमाणे एकाग्रतेने व जिद्दीने त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत. यश हे त्याच्या पावलांशी नक्कीच येईल.‘करिअर’, ‘प्रोफेशन’, ‘व्यवसाय’ हे शब्द नित्याचेच झाले आहेत. करिअर हा आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. सध्याच्या जमान्यात करिअर महत्त्वपूर्ण असते याबद्दल दुमत नाही. पण करिअर म्हणजे नेमके काय? करिअर म्हणजे ज्या विषयाचा आपण सखोल अभ्यास केला आहे, ज्या विषयात आपल्याला खास रुची आहे, अशा विषयाशी निगडित कायमस्वरूपी काम करणे होय. माझ्यामते, ‘करिअर’ विद्यार्थी जीवनापासून पुढील सर्व आयुष्यात सुखाचे क्षण आणते. येणाऱ्या संकट व अडचणींवर मात करून यश मिळवून देते व जीवनाचा खरा अर्थ समजावून देते.
पूर्वी परंपरागत व्यवसायावर भर होता. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी, सोनाऱ्याचा मुलगा वडिलांचा व्यवसाय करीत असे. पूर्वी शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मर्यादित होता. व्यवसायाच्या कमी वाटा चोखाळल्या जात होत्या. शिक्षणाच्या मदतीने व्यावहारिक बारकावे समजून व्यवसाय भरभराटीला आणणे ही व्यवहारी बाजू लक्षात घेतली नाही. मात्र काळ बदलला आणि औद्योगिकीकरण, शहरीकरण व जागतिकीकरण या प्रक्रिया सुरू झाल्या व शिक्षणाची नवनवीन दालने खुली झाली. आता तर ज्या विषयात आवड व रुची आहे, त्याचा अभ्यासक्रम करण्याची संधी सर्वांना आहे. पूर्वी शिक्षणाच्या तीन शाखा (विज्ञान, वाणिज्य व कला) होत्या व उपशाखाही ठरावीक म्हणजे इंजिनीयरिंग, मेडिकल अथवा वकिली असत. मात्र आता अभ्यासक्रमात इतकी विविधता आली की केवळ स्पेशलायझेशन नाही, तर सुपर स्पेशलायझेशन देखील करता येऊ शकते.
समाजातील बदलत्या जीवनशैलीमुळे नवीन व्यवसाय उदयास आले. उदा. हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापन, ट्रॅव्हल आणि टुरिझम, अवकाशशास्त्र, पत्रकारिता, संगणक, इव्हेंट मॅनेजमेंट, समुपदेशन, मास आणि मीडिया... असे कितीतरी ! म्हणजेच ‘You name it and you have it.’ अशी स्थिती आता आहे. या सर्व परिस्थितीत करिअर चॉईस हा एक गहन विषय आहे. अनेक पर्यायांतून अचूक पर्याय निवडून मिळालेल्या संधीचा फायदा करून घेणे आवश्यक आहे. वाढत्या स्पर्धा व बरेच करिअर मार्ग यातून योग्य पर्याय करिअर म्हणून निवडणे महत्त्वाचे आहे. खरेतर १० वी व १२ वी नंतर काय करायचे? हे ४०% मुलांना माहीत नसते व उरलेल्या ६०% मुलांनी पालकांवर निर्णय सोपवलेला असतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात सखोल माहिती घेऊन आपल्या क्षमतेला न्याय देणारे करिअर निवडावे. स्वतःसाठी विचारपूर्वक योग्य असेच करिअर निवडा.
Because-If you don’t consciously, develop a great successful career, You will definitely land in the trap of an average career.
म्हणूनच असं क्षेत्र निवडा; जे तुम्हाला शोभेल
असं क्षेत्र निवडा; जे तुम्हाला निखळ
आनंद देईल
असं क्षेत्र निवडा; जे तुम्हाला
आनंददायी ठेवेल!
असं क्षेत्र निवडा; जे तुम्हाला आजीवन समाधान आणि शांती प्रदान करेल!