भारतीय संत-डॉ. अनुराधा कुलकर्णी
श्री नामदेवांच्या निरागस व प्रांजल स्वभावाप्रमाणे त्यांचे अभंगही अतिशय प्रासादिक आणि भावमधुर असल्याने ते अभंग जनमानसाच्या हृदयात अलगद शिरून बसलेले आहेत. विठ्ठलाच्या अनन्य भक्तीने कीर्तनाच्या रंगात बेभान होऊन नाचणाऱ्या नामदेवांचे बोल जगात ज्ञानदीप उजळविण्यासाठी समर्थ ठरतात. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी’ असे श्रीनामदेव म्हणतात. त्यांनी उभ्या महाराष्ट्राला कीर्तनरंगात रंगवून आपली भक्तिपरंपरा थेट पंजाबपर्यंत नेली. शिखांच्या अत्यंत पवित्र अशा ‘ग्रंथसाहेब’ या ग्रंथात श्री नामदेवांचेही काही हिंदी अभंग आहेत. अनेक संतांची चरित्रे श्री नामदेवांनी लिहिली असल्याने ते मराठी भाषेतील आद्य चरित्रकार ठरतात. श्री ज्ञानेश्वरांचे चरित्र तर अतिशय विस्तृतपणे श्री नामदेवांनी रेखाटले आहे. त्यांच्या त्या चरित्रलेखनाने ज्ञानदेवमाऊलीच्या संपूर्ण जीवनाचे हुबेहुब चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. ज्ञानदेव व नामदेव हे दोन्ही महान संत समकालीन असल्याने त्यांच्या सहवासाचा, संवादांचा पावनकाळ आपणही नामदेवांच्या अमृतमय शब्दांतून अनुभवू शकतो. त्यात नामदेवांनी कुठेही विठ्ठलाला विसंबलेले नाही. नामदेवांनी लिहिलेल्या ज्ञानदेव चरित्रात तसेच नामदेवांच्या आत्मचरित्रात विठोबा-रखुमाईच्या प्रत्यक्ष उपस्थितीचे चित्रण नामदेव करतात. विठ्ठलाशी तर नामदेवांचे प्रत्यही संभाषण घडत असते. याला व्यावहारिक तर्काची कसोटी कोणी लावू नये. विठुमाऊली नामदेवांच्या अंतरंगात तर ठासून भरलेली आहेच, पण त्यांना बाह्य विश्वातही विठ्ठलच आपला सांगाती असल्याचे अखंड जाणवते. हा श्री नामदेवांच्या निर्व्याज अपार प्रेमाचा चमत्कार आहे. नामदेवांच्या संतत्वाचा स्तरच वेगळा आहे. त्यात कोरड्या वास्तवाचे बंध नाहीत. त्यांचे निष्कपट हृदय विठ्ठलाशी पूर्ण एकनिष्ठ होते. त्या एकनिष्ठेनेच त्यांच्या सगुण भक्तीला विलक्षण ताकद दिली होती. संकल्परूप अशी जी परावाणी त्यातच त्यांचा विठ्ठल भरला असल्याने त्यांचा व विठ्ठलाचा आपोआप संवाद होतो. त्यांच्या दृष्टीतच विठ्ठल असल्याने, त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगात विठ्ठल असतोच.
श्री नामदेवांच्या अभंगगाथेत श्री ज्ञानेश्वरांची आदि, तीर्थावळी, श्री ज्ञानेश्वरसमाधीचा महिमा आणि श्री ज्ञानेश्वरांची समाधी अशी चार प्रकरणे ज्ञानेश्वर चरित्राला वाहिलेली आहेत. यावरूनच या चरित्राचे किती बारीक सारिक पदर नामदेवांनी अतिशय भावपूर्णतेने उलगडले आहेत, हे लक्षात येते. ज्ञानेश्वर समाधीचे स्थळकाळ, त्यावेळी उपस्थित असलेला संतमेळावा यांचे प्रत्यक्षदर्शी वर्णन आपल्याला नामदेवगाथेतून मिळते. हे स्थळकाळ श्री ज्ञानश्वर माऊलीच्या संजीवन समाधीच्या लोकविलक्षण प्रसंगाचे जिवंत चित्रण श्री नामदेव महाराजांनी विलक्षण जिव्हाळ्याने केले आहे. त्यांच्या साध्याभोळ्या शब्दांतून त्या अनन्यसाधारण घटनेचे नुसते बाह्य वर्णन नाही, तर त्या घटनेचे साक्षीदार असलेल्या व्यक्तींच्या आंतरिक घालमेलीचेही श्री नामदेव महाराज प्रत्ययकारी वर्णन करतात. नदीच्या पाण्यात विष मिसळल्यावर मासे जसे तडफडतील तसा जनसमुदास तळमळू लागला...
देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर। जातो ज्ञानेश्वर समाधीसी।। नदीचिया माशा घातले माजवण। तैसे जनवन कालविले।। दाही दिशा धुंद उदयास्ताविण। तैसेचि गगन कालविले।। जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी। पुढे ज्ञानेश्वरी ठेवियेली।। ज्ञानदेवे म्हणे सुखी केले देवा। पादपद्मी ठेवा निरंतर।। तीन वेळा जेव्हा जोडिले करकमळे। झाकियेले डोळे ज्ञानदेवे।। भीममुद्रा डोळा निरंजनी लीन। जाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव ।। नाम म्हणे आता लोपला दिनकर। बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ।।
श्री निवृत्तिनाथांनी जरी ज्ञानेशांचा हात धरून त्यांना समाधीस्थळापर्यंत आणले होते, ज्ञानोबा आत उतरून गेले तेव्हा त्या विवरावर निवृत्तिनाथांनीच पाषाण ठेवला होता, तरी या प्रसंगी निवृत्तिनाथांची स्वतःची काय मनोवस्था असेल, त्याचे वर्णन नामदेव करतात, “तळ्याचा बांध फुटून पाणी बारा वाटा धावावे, गवताच्या पेंडीचा दोर सुटून अवघे गवत इतस्ततः व्हावे, वाघाच्या तावडीत सापडल्यामुळे जी घरी परतू शकली नाही अशा हरिणीच्या पाडसांनी जसे कावरेबावरे होऊन दशदिशा भटकावे तसे निवृत्तिनाथांचे चित्त थाऱ्यावर येत नव्हते...” नामदेव निवृत्तिनाथांचे हृदभाव प्रकट करतात की आईवडील त्यांना सोडून गेले तेव्हाही आताएवढे संकट वाटले नाही, आता मात्र कारुण्याचा हुताशनच पेटला आहे...!!
मायबापे आम्हा त्यागियेले जेव्हा। ऐसे संकट तेव्हा झाले नाही।। नामा म्हणे देवा पेटला हुताशन। करा समाधान निवृत्तीचे।।
असे हे श्रीनामदेवांचे हृदयात हात घालणारे अभंगबोल आहेत. त्यांची स्वतःची जीवनकहाणीही ते अतिशय प्रांजलपणे वर्णन करतात. बालवयात त्यांच्या केलेल्या अपार विनवणीमुळे देवाने त्यांनी आणलेला नैवेद्य ग्रहण केला. त्यानंतर नामदेवांनी जणू स्वतःलाच देवाला वाहून दिले.
सिंपियाचे कुळी जन्म माझा जाला। परि हेतु गुंतला सदासिवी।। रात्रिमाजी सिवी दिवसामाजी सिवि। आराणूक जीवी नोव्हे कदा।। सुई आणि सुतळी कात्री गज दोरा। मांडिला पसारा सदासिवी।। नामा म्हणे सिवी विठोबाची अंगी। म्हणोनिया जगी धन्य जालो।।
आपल्या व्यवसायानुसार नामदेव रात्रंदिवस शिवणकाम करीत होते, पण मन मात्र सदाशिवात म्हणजे आत्मारामात गुंतले होते. त्यांच्या कर्मात विठ्ठलच भरला असल्याने आपल्या हातून विठोबाचेच कपडे शिवले जात आहेत, असे त्यांना वाटत होते..!
श्री नामदेवांच्या लौकिक चरित्रापेक्षा त्यांचे पारमार्थिक चरित्र कसे घडत गेले, याचे फार विलोभनीय चित्रण त्यांच्या अभंगगाथेतून दिसते. हे वर्णन कमालीचे पारदर्शी आहे. विठ्ठलाची अनन्यभावे भक्ती करताना त्यांच्या मनी भक्तपणाचीच सूक्ष्म अहंता नकळत आली होती. पण निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या दैवी भावंडाचा तसेच गोरा कुंभार, विसोबा खेचर इ. एकनिष्ठ विठ्ठलभक्तांचा योग नामदेवांच्या भाग्यात होता, त्यामुळे या सर्व योगी संतांचा मेळा इंद्रायणीतील सिद्ध बेटावर जमला असता नामदेवही तेथे पोहोचले. संतमेळाव्यात सर्वच एकमेकांच्या पाया पडतात, सर्व संतमंडळी नामदेवांच्याही पाया पडली. पण आपण ज्येष्ठश्रेष्ठ विठ्ठलभक्त म्हणून नामदेवांनी कुणालाही वाकून नमस्कार केला नाही. त्यावेळचे छोट्याशा मुक्ताईचे बोल नामदेवांनीच आपल्या अभंगात लिहून ठेवले आहे, अखंड जयाला देवाचा शेंजार। कां रे अहंकार नाहीं गेला॥ मान अपमान वाढविसी हेवा। दिवस असतां दिवा हाती घेसी॥
मग मुक्ताईनेच गोरोबा कुंभारांना सर्वांचे डोक्याचे मडके पक्के आहे ना, हे तपासायला सांगितले. गोरोबांच्या हातातले थापटणे सर्वांच्या माथ्यावर आले, तेव्हा सर्वजण संतत्वाच्या कसोटीस उतरले. पण नामदेवांच्या माथ्यावर थापटणे येताच त्यांना मात्र ते लागले. दुःख संतापाने त्यांचे मन भरून गेले. ते देवाजवळ येऊन संतांचे गाऱ्हाणे गाऊ लागतात,
संतसमागम फळला रे मला'। सन्मानाचा जाला लाभ मोठा॥ अतीथि आदर केला मुक्ताबाई। लांकडानें डोई फोडिली माझी॥ नामदेवांचे गाऱ्हाणे ऐकून देव त्यांना समजावितात, जोडल्या सद्गुरुकृपालेश। मग सर्वत्र माझाचि प्रकाश।। तुज मज भेदाचा भाव। तो निरसोन जाईल।।
तेव्हा नामदेव देवाला म्हणतात, देवा, तुझ्या लाभासाठी सद्गुरूंची सेवा करतात, पण तू तर मला रोकडा भेटलेला आहेसच, तेव्हा सद्गुरूंची काय गरज? त्यानंतर मात्र विठोबा नामदेवांना परखडपणे सुनवतात की, मग श्रीहरी म्हणे अज्ञान। सांडून सेविजे गुरुचरण। तुझ्या प्रेमे माया सोंग धरून। लटिका तुजपाशी मी खेळे।। जंव सद्गुरूंचे नाही सेवन। तंव मी जैसे स्वप्नीचे धन।। तुझे न तुटे भवबंधन। सद्गुरुआज्ञेवाचूनी।।
“माझे तुला भेटणे, बोलणे ही माया होती” हे देवाचे बोल ऐकून मात्र नामदेवांना गुरुकृपेच्या माहात्म्याची तीव्र जाणीव झाली. त्यांच्या मनात सद्गुरूंच्या भेटीचे तीव्र आर्त उदयाला आले. अशा अवस्थेत फिरत असता नामदेवांना एका शिवालयात पिंडीवर पाय ठेवून पहुडलेले विसोबा खेचर दिसले. तेव्हा “अहो, उठा, उठा... देवावर पाय का ठेवता?’’ असे नामदेवांनी न राहवून रागाने विचारले, तेव्हा “जेथे देव नसेल तेथे तू माझा पाय ठेव’’ असे विसोबा म्हणाले. तेव्हा नामदेवांना देव नाही, अशी जागाच मिळेना..!
त्या क्षणी नामदेवांसाठी आत्मज्ञानसूर्याचा उदय होत होता. त्यांनी विसोबांना पूर्ण शरण जाऊन त्यांच्या पायाला मिठी मारली. तेव्हा विसोबांनी नामदेवांच्या माथ्यावर आपला कृपाहस्त ठेवून त्यांना गुरुपदेश केला... श्रवणीं सांगितली मात मस्तकीं ठेवियेला हात। परदपिदाविवजित केला नामा॥ (पूर्वार्ध)






