दिसतं ते विकतं

प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ


 

व्हिएतनामला एका थ्रीडी फोटो म्युझियमला भेट दिली होती. तिथे गेल्यावर अगदी प्रवेशद्वारापाशी पहिला फोटो होता ज्याच्यात कागदी आकर्षक खूप साऱ्या पिशव्या दोन्ही बाजूला होत्या आणि मध्ये आपण उभे राहून त्या पिशव्यांवर हात ठेवायचा होता जणू एवढी शॉपिंग करून आपण बाहेर पडत आहोत. तो फोटो काढायचा मोह स्त्रियांना काय पुरुषांनाही होत होता. खूप सारी खरेदी म्हणजेच शॉपिंग हे प्रत्येकालाच आवडते पण इतक्या मोठ्या प्रमाणात ती करता येतेच असे नाही. त्यामुळे कमीत कमी फोटोमधून तरी तो आनंद घ्यावा म्हणून त्या बॅग्यांच्यासोबत प्रत्येक जण उभा राहत होता. आज मला हे आठवायचे कारण म्हणजे अलीकडेच एक तरुणी दोन्ही हातामध्ये खूप साऱ्या कागदी आकर्षक बॅगा घेऊन रस्त्याने चालत होती. तिच्या चेहऱ्यावर साहजिकच आनंद झळकत होता. इतकाच काय तो व्हिडीओ होता. खूप सुंदर तरुणी आणि त्याच्यात तिने केलेले इतके शॉपिंग पाहून तो व्हिडीओ परत परत बघितला जात होता. गंमत म्हणजे या सगळ्या बॅगांवर एकच नाव ठळकपणे दिसत होते म्हणूनही इथे इतके चांगले कपडे असावेत किंवा स्वस्त असावेत किंवा कोणता तरी सेल निश्चितपणे चालू असावा असा भास होत होता. त्यामुळे अनेकांनी दुसऱ्या दिवशी त्या दुकानात गर्दी केली. एखाद्या दुकानाबाहेर गर्दी आहे पाहून आपल्यालाही त्याच दुकानात जायचा मोह होतोच ना! त्याप्रमाणे रस्त्यावरून चालणारा ग्राहकसुद्धा कोणत्याही इतर दुकानात जाण्यापेक्षा या गर्दीच्या दुकानाकडे वळत होता. अशा तऱ्हेने त्या दुकानांमध्ये ग्राहकांना आकर्षित करायची वापरलेली क्लृप्ती निश्चितपणे उपयोगी ठरली होती. त्या आकर्षक खूप साऱ्या बॅगांनी केली होती. ही एक मस्त जाहिरात होती.आजचे युगच जाहिरातीचे आहे. एखादी वस्तू दाखवणे, परत परत दाखवणे, आकर्षक पद्धतीने दाखवणे, ती दाखवताना एखादे चलचित्र किंवा आकर्षक संगीत किंवा गाणे वाजवणे किंवा एखादा उत्तम संवाद यामुळे त्या वस्तूकडे ग्राहक निश्चितपणे वळतात.आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिऱ्हाईक फिरकेना... सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गर्दी पेलवता पेलवेना... महाकवी सुधाकर गायधने यांच्या या सुप्रसिद्ध ओळी आहेत.


इथे सोनं याचा अर्थ म्हणजे चांगले विचार, चांगले ज्ञान, चांगली मूल्य किंवा गुणवत्ता अशा अर्थाने हे वापरले आहे. तर चांगले विचार, ज्ञान, चांगली मूल्य, गुणवत्ता हे आपण अगदी साधेपणाने लोकांसमोर मांडले तर त्याची किंमत समाजाला लक्षात येत नाही. त्याचा स्वीकार होत नाही. याउलट खोटारडेपणाने दिखावूपणाने जर निकृष्ट किंवा निरोपयोगी वस्तू आपण विकायला काढतो तेव्हा बाहेरच्या डामडौलीला समाज फसतो आणि दिखाव्याला भुलतो.एखाद्या आशयाला आंतरराष्ट्रीय मान्यता सहज मिळते जेव्हा त्यातून प्रभावी आशय मांडला जातो, मग तो कोणत्या का भाषेतील असेना! परंतु आजची दुनिया फसवी आहे. आपल्याकडे काय आहे, हे कधी कधी महत्त्वाचे नसते पण आपल्याकडे काय आहे हे आपण ज्या पद्धतीने दर्शवतो, त्या पद्धतीमुळे माणसे आपल्याकडे आकर्षित होतात. गंमत अशी आहे की हातात काहीही नसतानासुद्धा एखाद्याकडे पाहून त्यात माणसे गुंतवणूक करतात आणि फसली जातात.


दोन-तीन महिन्यांपूर्वी एक अतिशय उंची पॉलिशचा टीपाॅय शेजाऱ्यांकडे पाहिला तेव्हा वाटले की किती सुंदर आहे; परंतु काल तो एखाद्या वाळूच्या ढिगाऱ्यासारखा ढासळलेलाही पाहिला. तेव्हा कोणत्याही जाहिरातीला भुलून किंवा नुसते डोळ्याला सुंदर दिसते म्हणून त्याकडे आकर्षित न होता, त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याची उपयुक्तता जाणून घेतली पाहिजे! म्हणजे आजचे जग ‘दिसतं ते विकतं आणि म्हणून जग फसतं.’


या पार्श्वभूमीवर संत चोखामेळा यांचा अभंग कायम स्मरणात ठेवावा इतका सुंदर आहे.
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा।
काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥
कोणत्याही माणसाच्या बाबतीतसुद्धा त्याच्या बाह्यरंगांवर, त्याच्या पेहरावावर, राहणीमानावर लक्ष न देता त्याच्या अंतरंगात डोकवायला शिकले पाहिजे! हीच मानवतेची शिकवण आहे! pratibha.saraph@gmail.com

Comments
Add Comment

आभाळमाता

जीवनगंध-पूनम राणे   जून महिन्याचा पहिला आठवडा. आभाळ भरून आले होते. आभाळात ढगांनी गर्दी केली होती. थंडगार वारा

आईचं पत्र हरवलं

मनस्विनी-पूर्णिमा शिंदे खरंच हरवले ना! पत्र!! कारण संवाद हरवला आहे. मोबाईलच्या या नेट युगामध्ये नात्यांचं जाळंच

समुद्रात बेटे कशी तयार झाली?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील   मंदिरात शिवम मित्र गटाच्या ज्ञान विज्ञानाच्या गोष्टी खूपच वाढत होत्या. “मग

फक्त पुस्तकी पंडित बनू नका

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर   ज्ञान हे माणसाच्या जीवनाला दिशा देणारे सामर्थ्य आहे; परंतु केवळ पुस्तके

राजकन्या

कथा-रमेश तांबे   एक होती राजकन्या. राजाची एकुलती एक मुलगी! तिला ना भाऊ होता, ना बहीण! एवढ्या मोठ्या राजवाड्यात

दाट धुक्यामुळे काही दिसेनासे झाले तेव्हा...

- अनिल तोरणे, स्मृतीपटल आपल्या ‘काला बाजार’ या चित्रपटाच्या बाह्यचित्रीकरणासाठी देव आनंद निघाले पण दाट