संवाद-गुरुनाथ तेंडुलकर
मागच्या मार्च महिन्यातली गोष्ट. सकाळी साडेनऊ दहाच्या सुमाराला मी कार घेऊन कामासाठी बाहेर पडलो होतो. बाहेर ऊन रणरणत होतं. त्या रणरणत्या उन्हात बसस्टॉपवर तीन शाळकरी विद्यार्थी बसची वाट पाहत उभे होते. त्यातलाएक मुलगा आमच्याच सोसायटीमध्ये राहणारा होता. त्याला पाहून मी ड्रायव्हरला कार थांबवायला सांगितली. त्या मुलांना कारमध्ये घेतलं.
‘थँक्यू काका. तुम्ही अगदी देवासारखे आलात. बसची खूप वेळ वाट पाहत होतो आम्ही. आजपासून परीक्षा सुरू होताहेत.’
‘कितवीला आहात तुम्ही?’
‘दहावीला. एसएससीला.’ तिघांचा कोरस
‘ओह, गुड... बेस्ट ऑफ लक.’ मी त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या नि विचारलं ‘कुठलं सेंटर आलंय?’
‘नानावटी स्कूल.’
मी ड्रायव्हरला गाडी नानावटी स्कूलकडून घेण्याची सूचना दिली.त्या तिन्ही मुलांचं आपापसात जे बोलणं सुरू होतं ते माझ्या कानावर पडत होतं. त्यातून मला जो अर्थबोध झाला तो असा की परीक्षा पंधरा दिवस, महिनाभर लांबणार अशा बातम्या येत असताना बोर्डानं परीक्षा अगदी वेळेवर जाहीर केल्या. त्यामुळे ते विद्यार्थी नाराज झाले होते. आणखी किमान दोन आठवडे अभ्यासाला मिळाले असते तर...त्यांचं ते बोलणं ऐकून मला माझ्या शालांत परीक्षेची आठवण झाली. मी एसएससीला असतानाही ‘थोडा अधिक वेळ मिळाला असता तर...’ असं म्हणणारे माझे काही मित्र होतेच की.त्या तीन मुलांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर सोडून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी निघालो. पण मनात मात्र सतत एकच विचार घोळत होता. आणखी काही दिवस... आणखी थोडा वेळ...तुम्हाला काय वाटतं? जर त्या मुलांना आणखी पंधरा-वीस दिवस अभ्यासाला मिळाले असते, तर त्यांनी अधिक अभ्यास केला असता? बिलकूल नाही. त्यांनी ते पंधरा दिवस देखील तस्सेच टंगळमंगळ करीत घालवले असते.आपल्या आजूबाजूला नजर टाकली, तर अनेकजण अत्यंत सामान्य आयुष्य जगताना दिसतात. कुठेतरी आठ-दहा तासांची नोकरी करायची. घरी येऊन टीव्ही बघायचा. मोबाईलवर गेम खेळायचे. व्हॉट्सअॅपवर आलेले व्हिडीओ बघायचे. फेसबुकवर जाऊन काहीतरी शेअर करायचं, किती लाईक्स मिळाले ते मोजायचे आणि त्यातच स्वत:च्या आयुष्याची धन्यता मानायची. आलेला दिवस ढकलायचा.
एक एक दिवस ढकलत ढकलत जगण्यापेक्षा एखादा छंद जोपासावा. चांगली पुस्तकं वाचावीत. एखादी कला आत्मसात करावी. एखादी भाषा शिकावी. व्यायाम करावा, तब्येत राखावी. अगदीच नाही तर एखाद्या सार्वजनिक संस्थेत जाऊन थोडंफार समाजकार्य करण्यात हातभार लावावा... पण सर्वसामान्य माणसं यातलं काहीच करत नाहीत. कारण हे सगळे करायला त्यांच्याजवळ वेळ नसतो, त्यांना फक्त टाईमपास करायचा असतो. टाईमपास... किती चांगला शब्द आहे नाही. या टाईमपासचं एक वैशिष्ट्य म्हणजे टाईम ‘पास’ होतो आणि टाईमपास करणारा मात्र ‘फेल’ होतो. या टाईमपासचे दुष्परिणाम सांगणारी आजची कविता ‘माफ करा मला.सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये राहणाऱ्या भाग्यश्री नारायण शेळके या कवियत्रींची ही कविता. त्या म्हणतात...
माफ करा मला, बराच टाईमपास केला
महत्त्वाचा वेळ मी मोबाईलमध्ये घालवला
आपण स्वतः मोबाईलच्या स्क्रीनवरली नजर दूर करून डोळे मिटून अंतर्मुख होऊन थोडा विचार केला, तर आपल्याला जाणवेल की आपल्याला बरंच काही करायचं आहे. एखाद्या ध्येयाचा ध्यास घेऊन, एखाद्या विचारात झोकून काहीतरी भव्य-दिव्य करणं तर सोडाच पण अगदी दैनंदिन जीवनातलीदेखील अनेक कामं शिल्लक राहिली आहेत.एखादा नातेवाईक आजारी असल्याचं कानावर येतं. त्याच्याकडे जाऊन त्याच्या तब्यतीची विचारपूस करायची असते. पण... वजन वाढलंय. दररोज किमान एक तासभर चालायला जा असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असतो. पण...आपल्या घराजवळच एक चांगलं रांगोळी प्रदर्शन लागलेलं असतं. ते पाहण्याची इच्छा असते. पण...आपल्या ऑफिसमधल्या एका सहकाऱ्यानं आत्मचरित्र लिहिलेलं असतं. त्याची कॉपी त्याने आपल्याला पोस्टाने पाठवलेली असते. ते वाचायचं मनात असतं. पण...बरंच काही करायचं असतं. पण... पण उद्या करू... नंतर करू अशी चालढकल करीत करीत आपण ते काम टाळतो आणि नंतर ते काम कधीच पूर्ण होत नाही. आयुष्य असंच निघून जातं. हां हां म्हणता संपूनही जातं. काय करतो आपण या वेळेत? टीव्हीवरच्या कौटुंबिक कलहाच्या मालिका बघतो. घटकाभर करमणूक करणारे क्रिकेटचे सामने बघतो. फेसबुकवरचे लाइक्स मोजतो. ज्या गोष्टी न केल्यामुळे आपल्या आयुष्यात काहीही फरक पडणार नसतो त्या गोष्टी करतो आणि त्यामुळे आयुष्यावर मात्र फार मोठा फरक पडतो. दुर्दैवाने तो फरक केवळ आणि केवळ नकारात्मकच असतो. सिगारेट, दारू, जुगार अशा व्यसनापेक्षादेखील अधिक भयावह परिणाम करणारं हे व्यसन आहे.
एक संस्कृत श्लोक सांगतो.
इदमद्य करिष्यामि श्वः कर्तास्मि
इति वादिनम् ।
कालो हरति संप्राप्तो नदीवेग इव द्रुमम् ।।
अर्थ : आज करीन, उद्या करीन असं म्हणणाऱ्या माणसाचं आयुष्य नदीतून वाहून जाणाऱ्या लाकडाच्या ओंडक्यासारखं वाहून वाया जातं. म्हणूनच इंग्रजीत एक म्हण आहे. टाईम इज मनी. पण मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की वेळ असेल तर गेलेले पैसे पुन्हा मिळवता येतात. पण हातातला वेळ गेला तर मात्र कितीही पैसे खर्च करूनही तो वेळ पुन्हा आणता येत नाही. घड्याळाचे काटे पुढे पुढेच चालत राहतात. त्या काट्याबरोबर निसटून गेलेला क्षण पुन्हा कधीही माघारी येत नाही.म्हणूनच...मी सांगण्यापेक्षा तुम्हीच विचार करा. आणि केवळ विचार नको तर कृती करा... आजपासूनच... माफ करा मला बराच टाईमपास केला
महत्त्वाचा वेळ मी मोबाईलमध्ये घालवला
माफ करा मला व्यायामाची आवड कधी नव्हती
कधी कळलेच नाही ती तर आरोग्यसंपत्ती होती
माफ करा मला शेवटपर्यंत अबोलच राहिलो
मूठभर मोजण्याइतपतसुद्धा मित्र नाही
कमवू शकलो
माफ करा मला आत्मविश्वासाची
जरा कमी होती
पदोपदी अपमान सहन केला.
उत्तर देण्याची धमकच नव्हती
माफ करा मला जरा मागेच राहिलो
जिंकायचे होते जीवनात हे जरा विसरूनच गेलो
कवियत्री : भाग्यश्री शेळके