नॉस्टॅल्जिया-श्रीनिवास बेलसरे
कोणताही कलाकार थोडाफार बंडखोर असतोच. जग ‘जसे आहे तसे’ त्याला मान्य नसते. म्हणून तर तो आपल्या कलेतून त्याला आदर्श वाटणारी प्रतीसृष्टी उभी करत असतो. मग तो कुसुमाग्रजांसारखा नाटककार असेल, अरुण साधूंसारखा कादंबरीकार असेल, नारायण सुर्वे किंवा नामदेव ढसाळांसारखा कवी असेल किंवा जब्बार पटेलांसारखा दिग्दर्शक असेल. आहे त्यात काही बदल हवा असलेली ती सृजनशील व्यक्ती असते.
सुरेश भट हे असेच एक बंडखोर, कलंदर कवी होते; परंतु त्यांनी मराठीला केवळ बंडखोर कविता दिल्या असे नाही तर ‘मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग’ किंवा ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’सारख्या अतितरल रोमँटिक कविताही दिल्या. तरीही त्यांना प्रामुख्याने ओळखले जाते ते ‘गझलसम्राट सुरेश भट’ म्हणूनच. तसे मराठी साहित्यात गझल आणण्याचे सुरुवातीचे प्रयत्न कवी माधव ज्युलियन यांनी केले होते. मात्र हा काव्यप्रकार मराठीत रुजवला, वाढवला तो भटांनीच! त्यांनी उर्दू गझलचे नियम (वृत्त, रदीफ, काफिया) मराठी भाषेच्या व्याकरणाशी आणि संस्कृतीशी सहज जुळवून दाखवले. ते केवळ स्वतः गझल लिहून थांबले नाहीत, तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून ‘गझल कार्यशाळा’ घेतल्या. गझल कशी लिहावी, तिचे शास्त्र काय आहे, हे त्यांनी तरुण कवींना शिकवले. कविवर्यांनी मराठीत गझलकारांची एक अख्खी पिढी निर्माण केली. इलाही जमादार, प्रदीप निफाडकर, नीता भिसे, आशा पांडे, रमण रणदिवे, ए. के. शेख यांच्यासारखे अनेक नामाकिंत गझलकार त्यांचाच वारसा पुढे
चालवत आहेत.
आतून हा कवी एक अस्वस्थ पण चिंतनशील, मनस्वी पण विचारी माणूस होता. स्वत:ची स्वतंत्र दृष्टी असल्याने त्यांचे कोणत्याच रूढ व्यवस्थेशी जमले नाही. आयुष्यभर अनेक चढउतार आणि भावनिक आंदोलनातून गेल्यावर त्यांनी आपल्या मनस्वी कलंदर स्वभावामुळे भोगाव्या लागलेल्या वेदना अनेक गझलातून मांडल्या होत्या. अशीच एक गझल पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केली आणि अरुण दाते यांनी गायली होती.
गझलेत सुरेशजी जीवनालाच एखाद्या मित्रासारखे कल्पून त्याला एखाद्या जिवंत व्यक्तीसारखे संबोधून म्हणतात, ‘मित्रा, गड्या, आपले सूर काही जुळले नाही बाबा! तू आणि मी अगदी वेगळे आहोत. मग आपल्यात सामंजस्य कसे निर्माण होईल? -
‘सूर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा, मी असा’!
कवी म्हणतो, माणसाच्या जगण्याला, व्यवहारी जगाच्या एकंदर रितीरिवाजांना मी जवळून पाहिले आहे. मला आयुष्य जगताना, माझ्या वेगळेपणामुळे असेल, पण खरे सुख असे कधी मिळालेच नाही. मी आयुष्याचा आढावा घेतला, तर मला केवळ दु:खच दु:ख मिळाल्याच्या आठवणी
समोर येतात -
‘तू मला, मी तुला पाहिले.
एकमेकांस न्याहाळिले;
दुःख माझा, तुझा आरसा!
जीवना तू तसा,
मी असा!’
स्वार्थासाठी तत्त्वे सोडणे, पैसा, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खोटे वागणे मला जमलेच नाही. त्यामुळे जगताना याच गोष्टीना महत्त्व असलेल्या आजच्या जगात माझे मन रमलेच नाही. मी जसे वाट्याला आले तसे फक्त जगत गेलो पण शरण गेलो नाही, तडजोड केली नाही, असे या मनस्वी कवीचे निवेदन आहे. जगताना काहीच मनासारखे झाले नाही. ‘सगळे आयुष्य एक जुगार ठरले आणि मी डाव हरतच गेलो’ हे सांगताना दुसऱ्या एका गझलेत ते म्हणाले होते -
“खरेच माझा जगावयाचा
विचार होता,
खरेच तो एक जीवघेणा जुगार होता”
‘एकदाही मनासारखा,
तू न झालास माझा सखा,
खेळलो, खेळ झाला जसा!
जीवना तू तसा, मी असा!’
कवीने जगाच्या लहरीपणाशी जुळवून घ्यायचा खूप प्रयत्न केला. अनेकांचे ऐकून घेतले. सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला कुणी समजून घेतलेच नाही अशी त्याची तक्रार आहे. जगाने त्याच्या भावना समजून घेण्याऐवजी त्याचा रागच केला. मात्र कवी बधला नाही. आपल्या तत्त्वाशी प्रामाणिक राहतच तो जीवन जगला. आयुष्याशी आपली तार काही जुळलीच नाही हे कवीचे दु:ख आहे -
‘खूप झाले तुझे बोलणे,
खूप झाले तुझे कोपणे,
मी तरीही जसाच्या तसा!
जीवना तू तसा, मी असा!’
शेवटी येणाऱ्या टोकाच्या निराशेचे वर्णन करणारा, त्यांच्या दुसऱ्या एका गझलेतला एक शेर अशीच हुरहूर लावणारा होता. त्यात ते म्हणतात -
“असेच हे कसेबसे कसेतरी जगायचे, कुठेतरी कधीतरी असायचे, नसायचे.”
आशा संपत चालली उलट निराशा घेरते आहे. त्यावेळी कवी म्हणतो -
“अाता राहिलो मी जरासा जरासा,
उरावा जसा मंद अंती उसासा.”
सर्व अपेक्षाभंग, वंचना, भोगूनही कवी अजून आशावादी बनण्याचा प्रयत्न करतोच आहे. तो एक वेडी आशा घेऊन जीवन जगतो -
‘रंग सारे तुझे झेलुनी,
शाप सारे तुझे घेउनी,
हिंडतो मीच वेडापिसा!
जीवना तू तसा, मी असा!’
सरळमार्गी कवी जसा व्यवहारी जगात हरला आहे तसा तो प्रेमातही हरला आहे. त्यामुळे दुसऱ्या एका रचनेत तो जे म्हणतो ते त्याचे निरागस मन आपल्यासमोर आणते आणि वाचकालाही अस्वस्थ करून जाते. तो प्रेयसीला विचारतो,
‘गडे सांग हा घाव आहे कुणाचा?
तुझा चेहरा वाटतो पाहिलासा.’
मात्र हा कमालीचा मनस्वी कवी तिच्या नकाराचेही वर्णन कसे करतो पाहा -
‘अजूनही मी कधीकधी मोहरून जातो, किती लाघवी तुझा तो नकार होता.’
कुणी न हेलावले, कुणी ढाळले न आसू, खरोखरी हुंदकाच माझा भिकार होता.’
सुरेशजींनी अनेकांच्या जखमांवर आपल्या शब्दांनी फुंकर घातली. अनेक हरलेल्यांना दिलासा दिला. ते स्वत: दु:खात जगत असताना दुसऱ्यांना बळ देणे, प्रेम देणे याला ते ‘अमृताचा वसा’ म्हणतात. मात्र आजच्या जगाची ठेवण पाहता हा अमृताचा वसाही व्यर्थच आहे हे मान्यही करतात. गझलेच्या शेवटच्या ओळीत ते जीवनाला, खरे तर जगाला सांगतात, ‘हरकत नाही, तू जसा असशील तसा असे, पण मी बदलणार नाही. मीही जसा आहे तसाच राहणार!
‘काय मागून काही मिळे?
का तुला गीत माझे कळे?
व्यर्थ हा अमृताचा वसा!
जीवना तू तसा, मी असा!’
सुरेशजींनी एकदा तर आपले अगदी अंतिम दु:ख मांडताना म्हटले होते,
“इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.”