राजकन्या

कथा-रमेश तांबे


 

एक होती राजकन्या. राजाची एकुलती एक मुलगी! तिला ना भाऊ होता, ना बहीण! एवढ्या मोठ्या राजवाड्यात एकटीच! अगदी कुणी मित्र-मैत्रिणीदेखील नव्हत्या. तशी प्रधानाची मुलगी, सेनापतीचा मुलगा, काही सरदारांची मुलं होती. अगदी राजवाड्याजवळच राहायची. पण ते कोणी राजकन्येसोबत खेळायला आलेलं राणीला आवडत नसे. त्यामुळे राजकन्या महालाच्या खिडकीतूनच त्या साऱ्या मुलांचे खेळ बघायची. तिथे सरदार, सेनापती, प्रधानाची मुलं एकत्र खेळायची, एकाच शाळेत जायची. खूप मजा करायची. खेळायची पण आणि भांडायची पण! जीवनाचे सारे अनुभव घेत ती वाढत होती, मोठी होत होती. त्यांच्यात आत्मविश्वास वाढत होता. पण इकडे राज्यकन्या मात्र कोणताही नवा अनुभव न घेता मोठी होत होती. महालातच खेळत होती आणि महालामध्येच शिकत होती. राजकन्या असल्यामुळे सगळ्याच गोष्टी तिच्यापुढे हात जोडून उभ्या होत्या.



एकीकडे राणी आपल्या मुलीला वाईट सवयी लागू नयेत, तिने सर्वसामान्य मुलांसोबत राहू नये म्हणून अति काळजी घेत होती, तर दुसरीकडे राजा मात्र आपल्या मुलीच्या भवितव्याबाबत खूपच चिंतेत होता. राजकन्या अशाच पद्धतीने मोठी झाली, तर तिला पुढील आयुष्य खूपच त्रासदायक ठरू शकतं ही गोष्ट राजाला समजत होती. पण राणी पुढे राजाचे काही चालत नसे. तरीसुद्धा राजा एक युक्ती करतो अन् राजकन्येमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतो.“राजकन्येला आपण तिच्या मावशीकडे ठेवूया का!” राजाने राणीला हळू आवाजातच विचारले. “का!” राणी जवळजवळ ओरडलीच. पण राजा अगदी मृदू आवाजात म्हणाला,“तुझ्या बहिणीला मूल नाही. तिचं आयुष्य अगदी बेचव झालं आहे. राजकन्या तिच्याकडे सहा महिने राहिली तर तुझ्या बहिणीचे आयुष्यही आनंदी होईल.” बहिणीचा चेहरा समोर येताच राणीचे डोळे पाण्याने भरले. तरीही मुलीला मावशीकडे पाठवण्यासाठी ती तयार नव्हती. पण राजाने कशीबशी मनधरणी करून राणीचे मन वळवले आणि राजकन्या मावशीकडे रवाना झाली. राजाने राजकन्येच्या शिक्षणाची सर्व व्यवस्था आधीच करून ठेवली होती. चार-पाच शिक्षक तिच्यासाठी नेमले होते. मैदानी खेळासोबतच घोडेसवारी, तलवारबाजी यासाठीही शिक्षक होते. झाडावर चढणे, डोंगरावरून धावत पळत खाली येणे, विहिरी-नद्यांमध्ये पोहणे अशा अनेक गोष्टी राजकन्या करू लागली. दोन-चार महिन्यांतच राजकन्या अगदी सगळ्याच गोष्टीत तरबेज झाली. सोबत पुस्तकी शिक्षणही सुरू होतेच. आता तिच्या चेहऱ्यावरचा मलूलपणा गायब झाला. तिच्यातल्या भित्रेपणाची जागा आता आत्मविश्वासाने घेतली. राजकन्या पहिल्यापेक्षा अधिक तजेलदार आणि तेजस्वी दिसू लागली आणि पाहता पाहता मावशीकडे राहण्याचे सहा महिने संपत आले. “राजकन्येला घेऊन” या असा लकडा राणीने राजाजवळ दहा दिवस आधीच लावला होता. मग एके दिवशी राजकन्या पालखीतून राजवाड्यात येण्याऐवजी भरधाव घोड्यावरच स्वार होऊन आली आणि सर्वांना आश्चर्याचा एकच धक्का बसला. घोड्यावरून उतरताच एक सैनिक तलवार घेऊन तिच्या अंगावर धावून गेला. पण प्रसंगावधान राखून राजकन्येने लगेचच कमरेची तलवार काढून त्याच्यावर रोखली आणि तो सैनिक शरण आला. राजकन्येचे हे आगळेवेगळे रूप बघून राणी अचंबितच झाली. मावशीकडे जाऊन राजकन्येत इतका बदल कसा झाला याचा विचार करत असतानाच राणीने राजाकडे पाहिले, तर राजा गालातल्या गालात हसत होता. तेव्हा राणीच्या लक्षात आले. आपण अतिकाळजीमुळे, अतिप्रेमापायी मुलीला बाहेर जाऊ देत नव्हतो. तिला वेगवेगळे अनुभव घेऊ देत नव्हतो. तिच्या प्रगतीच्या आड आपली माया येत होती. पूर्वीच्या राजकन्येपेक्षा आत्ताची राजकन्या केवळ राणीलाच नव्हे, तर जनतेलाही फार आवडली. राणीने दुरूनच राजाला नमस्कार केला आणि आपले अश्रूंनी भरलेले डोळे हळूच पुसले.

Comments
Add Comment

मित्र

नक्षत्रांचे देणे- डॉ. विजया वाड   लिमये बाई वर्गात गोष्ट सांगत होत्या. वर्गात दत्तचित्र गोष्ट ऐकत होता. वर्गात

आभाळमाता

जीवनगंध-पूनम राणे   जून महिन्याचा पहिला आठवडा. आभाळ भरून आले होते. आभाळात ढगांनी गर्दी केली होती. थंडगार वारा

आईचं पत्र हरवलं

मनस्विनी-पूर्णिमा शिंदे खरंच हरवले ना! पत्र!! कारण संवाद हरवला आहे. मोबाईलच्या या नेट युगामध्ये नात्यांचं जाळंच

समुद्रात बेटे कशी तयार झाली?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील   मंदिरात शिवम मित्र गटाच्या ज्ञान विज्ञानाच्या गोष्टी खूपच वाढत होत्या. “मग

फक्त पुस्तकी पंडित बनू नका

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर   ज्ञान हे माणसाच्या जीवनाला दिशा देणारे सामर्थ्य आहे; परंतु केवळ पुस्तके

दिसतं ते विकतं

प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ   व्हिएतनामला एका थ्रीडी फोटो म्युझियमला भेट दिली होती. तिथे गेल्यावर अगदी