Saturday, August 22, 2026

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सेवा पूर्ण झाल्यानंतरही हे श्वान पोलीस दलासोबतच राहणार असून, त्यांच्या भोजन आणि देखभालीचा संपूर्ण खर्च गृहविभागाकडून करण्यात येणार आहे.

पोलीस दलात 10 वर्षे सेवा बजावताना श्वानांचा त्यांच्या हँडलरसोबत विशेष जिव्हाळा निर्माण होतो. दीर्घकाळ एकाच वातावरणात राहिल्यामुळे त्यांना त्या ठिकाणाची आणि आपल्या साथीदाराची सवय झालेली असते. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना अन्य ठिकाणी दत्तक दिल्यास मानसिक ताण निर्माण होऊन काही श्वान अन्नत्याग करत असल्याचे निदर्शनास आले होते.

10 वर्षे सेवा केल्यानंतर हाल होणे योग्य नाही

पोलीस दलाला आयुष्याची 10 वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्तीच्या काळात या श्वानांचे हाल होणे योग्य नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. श्वान असला तरी त्याने बजावलेल्या सेवेचा सन्मान करत त्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गृहविभाग उचलणार संपूर्ण खर्च

नव्या निर्णयानुसार, निवृत्त झाल्यानंतरही पोलीस श्वान पोलीस दलाच्या ठिकाणी आणि आपल्या हँडलरसोबत राहू शकतील. त्यांच्या भोजनासह आवश्यक देखभालीचा आर्थिक भार गृहविभाग उचलणार आहे.

या निर्णयामुळे पोलीस श्वानांचा त्यांच्या हँडलरसोबतचा जिव्हाळ्याचा संबंध कायम राहणार असून, सेवेनंतरचे त्यांचे आयुष्यही सुरक्षित आणि सुखकर होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >