Saturday, July 11, 2026

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

Traffic Congestion  : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून, ती देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार ठरत असल्याचे आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नमूद करण्यात आले आहे. दिल्ली, मुंबई, बंगळूर आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये वाहतूक कोंडीमुळे दरवर्षी सुमारे ₹१.४७ लाख कोटींचे आर्थिक नुकसान होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या नुकसानीमध्ये वाहतूक कोंडीत वाया जाणारा वेळ, उत्पादकतेतील घट, इंधनाचा अतिरिक्त वापर आणि वाहतूक खर्चातील वाढ यांचा समावेश आहे. शहरी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात अपयश आल्यास येत्या काळात आर्थिक विकास, पर्यावरण आणि नागरिकांच्या जीवनमानावर त्याचे अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही सर्वेक्षणात देण्यात आला आहे.

सर्वेक्षणानुसार, कोणत्याही महानगराच्या विकासात वाहतूक व्यवस्था ही रक्तवाहिनीप्रमाणे महत्त्वाची असते. लोक, वस्तू आणि सेवांची जलद व सुरळीत हालचाल अर्थव्यवस्थेला गती देते. मात्र अपुरी किंवा कमकुवत वाहतूक व्यवस्था असल्यास वाहतूक कोंडी, वायू व ध्वनी प्रदूषण आणि कार्यक्षमतेत घट यांसारख्या समस्या निर्माण होतात.दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) च्या अभ्यासानुसार, वाहतूक कोंडीमुळे अकुशल कामगारांचे वार्षिक ₹७,२०० ते ₹१९,६००, कुशल कामगारांचे ₹८,३०० ते ₹२३,८०० आणि उच्च कौशल्य असलेल्या व्यावसायिकांचे ₹९,००० ते ₹२५,९०० इतके वैयक्तिक आर्थिक नुकसान होते. बंगळूरमधील इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज (ISEC) च्या अभ्यासानुसार, २०१८ मध्ये वाहतूक कोंडीमुळे सुमारे ७.०७ लाख उत्पादक तास वाया गेले. त्यामुळे केवळ एका शहरातच सुमारे ₹११.७ अब्ज रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या विश्लेषणानुसार दिल्ली, मुंबई, बंगळूर आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये वाहतूक कोंडीमुळे दरवर्षी एकूण ₹१.४७ लाख कोटींचे स्थूल आर्थिक नुकसान होते. विलंब, इंधनाचा अपव्यय आणि उत्पादकतेतील घट ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, डच लोकेशन टेक्नॉलॉजी कंपनी टॉमटॉमच्या २०२५ च्या विश्लेषणानुसार, जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या पहिल्या १०० शहरांमध्ये भारतातील दहा शहरांचा समावेश आहे. यावरून देशातील शहरी वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण स्पष्ट होत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.(Traffic Congestion)

तज्ज्ञांच्या मते, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणे, खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करणे, रस्त्यांचा कार्यक्षम वापर वाढविणे आणि शहरांची रचना वाहनांऐवजी नागरिकांच्या सुरळीत प्रवासाला प्राधान्य देणारी असणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडीचे मूळ कारण लोकांचा वाढता प्रवास नसून, कमी प्रवासी घेऊन धावणाऱ्या खाजगी वाहनांकडून रस्त्यावरील जागेचा होणारा मोठ्या प्रमाणातील वापर असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >