Friday, July 10, 2026

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर आक्षेपार्ह टिप्पणी, न्यायमूर्तींसमोर गोंधळ

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर आक्षेपार्ह टिप्पणी, न्यायमूर्तींसमोर गोंधळ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एका वकिलाने न्यायालयीन शिष्टाचाराचे उल्लंघन करत न्यायमूर्तींसमोर अभूतपूर्व गोंधळ घातल्याची घटना घडली. सुनावणी सुरू असताना संबंधित वकिलाने न्यायमूर्तींनाच आदेश देण्याचा प्रयत्न केला, न्यायमूर्तींच्या दिशेने कागदपत्रे भिरकावली आणि सरन्यायाधीशांचा उल्लेख करत आक्षेपार्ह भाषा वापरल्याने न्यायालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रबल प्रताप नावाचा वकील स्वतःच्याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत होता. ही याचिका इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाविरोधात दाखल करण्यात आली होती. सुनावणी सुरू होताच संबंधित वकिलाने युक्तिवाद करण्याऐवजी थेट न्यायालयालाच आदेश देण्याची भूमिका घेतली. ‘एसीपी, लखनऊ यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्या,’ असे म्हणत त्याने न्यायालयाशी असामान्य पद्धतीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला.(New Dehli)

या वक्तव्यानंतर खंडपीठावरील न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी, ‘तुम्ही आम्हालाच आदेश देत आहात का?’ असा प्रश्न दोन वेळा उपस्थित केला. मात्र, त्यानंतरही संबंधित वकिलाने आपली भूमिका न बदलता, ‘माझ्याकडून एवढेच, सर्व काही रेकॉर्डवर आहे,’ असे म्हणत हातातील कागदपत्रे न्यायमूर्तींच्या दिशेने भिरकावली. त्यानंतर त्याने सरन्यायाधीशांचा उल्लेख करत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचे सांगण्यात आले.

घटनेमुळे न्यायालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी संताप व्यक्त करत संबंधित वकिलाला तत्काळ न्यायालयाबाहेर काढण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, या सुनावणीचे थेट प्रक्षेपण सुरू असल्याने संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, न्यायालयाने संबंधित वकिलाविरोधात अवमानाची किंवा अन्य दंडात्मक कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी निरीक्षण नोंदवताना, संबंधित वकील मानसिकदृष्ट्या त्रस्त आणि हतबल असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याच्याविषयी सहानुभूती बाळगत न्यायालय त्याच्याविरोधात कठोर कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्याची याचिका फेटाळून लावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयासारख्या सर्वोच्च न्यायिक संस्थेत घडलेल्या या अभूतपूर्व घटनेची कायदेवर्तुळात आणि न्यायालयीन क्षेत्रात मोठी चर्चा सुरू असून, न्यायालयीन शिस्त आणि वकिलांच्या आचारसंहितेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >