CM Devendra Fadnavis : फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन

१ कोटी खोटारडे लोक मेले, तेव्हा हे पैदा झाल्याचा हल्लाबोल


मुंबई : "देवेंद्र फडणवीसला हव्या तेवढ्या शिव्या द्या, मला त्याची सवय झाली असून मी आता 'शिव्या प्रुफ' झालो आहे; परंतु आपल्याच राज्याची बदनामी करून इथल्या 'इंजिनीअरिंग मार्व्हल' ठरलेल्या प्रकल्पांवर चिखलफेक करू नका. मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना बुधवारी विधानसभेत खडे बोल सुनावले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील 'कनेक्टिंग लिंक' प्रकल्पावर झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेवरून विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना, "एक कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर हे लोक पैदा झाले असतील, त्यांना खोटे बोलायला लाजही वाटत नाही," असा घणाघाती हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला. त्याचवेळी मुंबईसाठी १३ हजार कोटींच्या एकात्मिक पूरनियंत्रण यंत्रणेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची माहिती त्यांनी दिली.



मुंबई आणि महानगर परिसरात झालेला मुसळधार पाऊस, उद्भवलेली परिस्थिती आणि मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे निर्माण झालेला गदारोळ यावर विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या चर्चेला मुख्यमंत्री विधानसभेत उत्तर देत होते. गेल्या काही दिवसांत मुंबईत झालेल्या अभूतपूर्व पावसाची आकडेवारी मांडताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जुलै महिन्यात कुलाबा येथे ७३४ मिमी आणि सांताक्रूझ येथे ८५६ मिमी सरासरी पाऊस होतो; मात्र यंदा अवघ्या ६ दिवसांत कुलाब्यात ८८२ मिमी (१११ टक्के) आणि सांताक्रूझमध्ये ९८८ मिमी (१०२ टक्के) पावसाची नोंद झाली. मुंबईच्या एकूण पावसाळ्याच्या तब्बल ४१ ते ४२ टक्के पाऊस या ६ दिवसांत पडला असून तो दिल्लीच्या एकूण पावसाळ्यापेक्षा ११७ टक्के आणि पुण्याच्या पावसाळ्यापेक्षा ११३ टक्के जास्त आहे. अशातच ५० ते ५५ किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि त्यातच आलेली ४ मीटरची हायटाईड (भरती) अशा तिहेरी संकटामुळे मुंबईत झाडे उन्मळून पडली आणि अनेक दुर्घटना घडल्या. या दुर्घटनांमधील नागरिकांच्या मृत्यूबाबत त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत प्रशासनाला आणि मुंबई महापालिकेला आवश्यक ते निर्देश दिले असल्याचे स्पष्ट केले. तसेच मुंबईतील ३७० पावसाळी हॉटस्पॉटचा केंद्र सरकारकडे पाठवलेला तांत्रिक आराखडा हा पाऊस आणि भरती एकाच वेळी असल्यास ३० मिनिटांत पाणी उपसण्यासाठी तयार केल्याचे त्यांनी सांगितले.



कनेक्टिंग लिंकवर विरोधकांकडून होणाऱ्या अवाजवी टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचा इतिहासच सभागृहासमोर मांडला. ते म्हणाले, "आघाडी सरकारच्या काळात या मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दोन पानांची नोट लिहून तब्बल १४ कारणे पुढे करत हा प्रकल्प अशक्य असल्याचे सांगितले आणि त्याची फाईल कायमची बंद करून टाकली होती. पण महायुती सरकारमध्ये ती हिंमत होती, म्हणून आम्ही अधिकारी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा धाडसी निर्णय घेतला. आज आम्ही हा प्रकल्प पूर्ण करून जगातला सगळ्यात रुंद बोगदा आणि भारतातला सर्वात उंच केबल स्ट्रेड ब्रिज (ब्रीज) तयार करून दाखवला आहे. कोकण रेल्वे उभारतानाही अनेकांनी दरड कोसळण्याच्या भीतीने हा प्रकल्प चालू शकणार नाही, असे म्हटले होते. मात्र तत्कालीन रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी हिंमत दाखवून धाडसी निर्णय घेतला. रेल्वे सुरू झाल्यावर सुरुवातीची १५ वर्षे तिथे सातत्याने दरडी कोसळल्या, पण त्यातून धडे घेऊन तांत्रिक उपाययोजना केल्या गेल्या. जर केवळ त्या भीतीपोटी कोकण रेल्वेच उभारली नसती, तर आज कोकणची काय अवस्था झाली असती?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मिसिंग लिंकवर घडलेल्या घटनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, वरून दरड पाण्याच्या कमानीवर कोसळल्यामुळे ती तुटली आणि ढिगारा खाली आला. मात्र, बोगद्यात इमर्जन्सी बटन दाबताच अवघ्या ३ मिनिटांत क्रेन आली आणि प्रवाशांनी स्वतः सांगितले की बोगदा होता म्हणूनच आम्ही वाचलो. तरीही काहींनी लगेच '७ हजार कोटी पाण्यात गेले' असे खोटे व्हिडिओ फिरवण्यास सुरुवात केली. मात्र, या टीकाकारांच्या थोबाडावर टिच्चून प्रशासनाने अवघ्या १८ तासांत तिथली वाहतूक पूर्ववत सुरू करून दाखवली.



'भाड्याच्या टट्टूंना' सोडणार नाही!


सोशल मीडियावरून पैशांच्या जोरावर सुरू असलेल्या बदनामीच्या मोहिमेवर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "ज्यांना गल्लीत कुत्रा विचारत नाही, ते आज सोशल मीडियावर येऊन सगळ्यांना शिव्या देत आहेत. काही भाड्याचे टट्टू पैसे घेऊन सोशल मीडियावर लिहीत आहेत. मी त्यांना स्पष्ट सांगतो, महाराष्ट्राचा अपमान कराल तर मी सोडणार नाही. या घटनेतून आपण शिकलो आहोत, पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो हे लक्षात आले आहे. आता आपण आयआयटीमधील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नव्या उपाययोजना करणार आहोत, जेणेकरून भविष्यात अशी घटना घडणार नाही. आजपासून १० वर्षांनी या प्रकल्पावरून आमच्यावर चिखलफेक करणारे कुठेच दिसणार नाहीत, पण हा प्रकल्प तिथेच असेल आणि त्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचेच नाव असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक