Monday, July 6, 2026

Maharashtra Monsoon Session 2026 : अधिवेशनाला येणाऱ्या मंत्री, आमदारांनाही पावसाचा फटका; कामकाज स्थगित

Maharashtra Monsoon Session 2026 : अधिवेशनाला येणाऱ्या मंत्री, आमदारांनाही पावसाचा फटका; कामकाज स्थगित

- रस्ते, रेल्वे मार्ग बंद, विमान सेवा विलंबाने, अनेकांनी मतदारसंघात राहणे केले पसंत

मुंबई : मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा आणि पूरपरिस्थितीचा मोठा फटका सर्वसामान्यांप्रमाणेच मंत्री आणि आमदारांनाही बसला आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे आपल्या मतदारसंघात गेलेले अनेक मंत्री आणि आमदार मुंबईत परतू न शकले नाही. रस्ते आणि रेल्वे मार्ग ठप्प झाल्याने, तसेच विमान सेवाही विलंबाने सुरू असल्याने अनेक लोकप्रतिनिधींना जागच्या जागीच अडकून पडावे लागले. त्यामुळे अनेकांनी मुंबईत येण्याऐवजी आपल्या मतदारसंघातच राहून मदतकार्याला प्राधान्य देणे पसंत केले. दरम्यान, मुंबईतील पावसाळी स्थिती लक्षात घेता विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी (Maharashtra Monsoon Session 2026) स्थगित करावे लागले.

पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session 2026) दोन दिवस सुट्टी असल्याने विदर्भ आणि इतर दूरच्या जिल्ह्यातील अनेक आमदार आपल्या गावी गेले होते. सोमवारी सकाळी त्यांना कामकाजासाठी मुंबईत परतायचे होते, मात्र मुंबईतील तुफान पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान सेवा विस्कळीत झाली. नागपूर विमानतळावर सकाळी १०.०५ वाजता मुंबईसाठी निघणारे विमान विलंबाने आल्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस आमदार विकास ठाकरे आणि भाजप आमदार प्रवीण दटके यांना तब्बल दीड तास तिथेच ताटकळत राहावे लागले. दरम्यान, मुंबईतील अतिवृष्टीमुळे अधिवेशनाचे कामकाज स्थगित झाल्याची माहिती मिळताच, या तिन्ही नेत्यांनी मुंबईचा दौरा रद्द करून मतदारसंघातच थांबण्याचा निर्णय घेतला.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील आमदार वेळेत उपस्थित राहू शकले असले, तरी इतर भागांतील आमदारांची मोठी कोंडी झाली. पुणे-मुंबई रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे अनेक आमदार वाटेत अडकले. पहाटेच्या सत्रात ज्यांच्या विमानांचे कसेबसे उड्डाण होऊ शकले, ते आमदार मुंबईत पोहोचले खरे; मात्र तोवर परिस्थितीचे गांभीर्य पाहून विधानसभा अध्यक्षांनी कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, कोकणातील काही मंत्री मुंबईत उपस्थित होते, परंतु महामार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे कोकणातील आमदारांना मुंबई गाठता आली नाही. (Maharashtra Monsoon Session 2026)

पालघरच्या आमदारांचा मतदारसंघातच थांबण्याचा निर्णय :

अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या पालघर जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी मुंबईकडे न जाता मतदारसंघातच थांबण्याचा निर्णय घेतला. पालघरमध्ये पूरपरिस्थिती गंभीर असल्याने आणि रस्ते-रेल्वे बंद असल्याने या आमदारांनी स्थानिक पातळीवर प्रशासनासोबत रस्त्यावर उतरून मदत आणि बचावकार्य राबवण्याला प्राधान्य दिले. (Maharashtra Monsoon Session 2026)

अधिवेशन कालावधी वाढवा :

मुंबईहून विमान वेळेत न उडाल्यामुळे नागपूरहून जाणाऱ्या आमदारांचे वेळापत्रक कोलमडले. पावसामुळे विनाकारण अडकून पडण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी जाणे योग्य ठरेल, असे आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले. तर काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी, आमदारांना मुंबईत पोहोचता आले नसल्यामुळे या आठवड्यातील कामकाजाचे दिवस वाढवून मिळावेत, अशी मागणी केली. दरम्यान, मंगळवारीही पावसाचा असाच जोर राहिल्यास अधिवेशनाच्या दैनंदिन कामकाजावर याचा विपरित परिणाम होणार आहे. (Maharashtra Monsoon Session 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >