Sunday, July 5, 2026

Cyber ​​Fraud : शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष; ₹३.६२ लाखांची सायबर फसवणूक, तामिळनाडूतून आरोपीला बेड्या

Cyber ​​Fraud : शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष; ₹३.६२ लाखांची सायबर फसवणूक, तामिळनाडूतून आरोपीला बेड्या

मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीतील (Cyber ​​Fraud) एका आरोपीला पोलिसांनी तामिळनाडूतून अटक केली आहे. तांत्रिक तपास आणि दोन दिवसांच्या पाठलागानंतर ही कारवाई करण्यात आली. आरोपीवर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही कोट्यवधी रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक १५३१/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(2), ३१८(4) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(C) आणि ६६(D) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कशी केली फसवणूक?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत फिर्यादीशी संपर्क साधून प्रतीक बियानी नावाच्या व्यक्तीने स्वतःला 'Asian Market Securities Private Limited' या कंपनीचा संचालक असल्याचे भासवले. त्याने फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल, असे सांगून विश्वास संपादन केला. (Cyber ​​Fraud)

यानंतर आरोपीने कंपनीच्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून व्यवहार करण्यास सांगत फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने ३ लाख ६२ हजार २५३ रुपये गुंतवून घेतले. मात्र, नफ्याऐवजी संपूर्ण रक्कम हडप करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. (Cyber ​​Fraud)

तांत्रिक तपासातून आरोपी गजाआड :

तपासादरम्यान फसवणुकीतील १ लाख ५० हजार रुपये एका सी.टी. युनियन बँकेच्या खात्यात जमा झाल्यानंतर धनादेशाद्वारे काढण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी खात्याची तांत्रिक माहिती तपासून खातेदाराचा माग काढला. तपास पथक चेन्नईला पोहोचले असता आरोपी बँकेत दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळले. त्यानंतर मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दोन दिवस सातत्याने पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव टी. सोलोमन राजा असून तो ओल्ड पेरिनगत्तूर, जिल्हा चेंगलपट्टू, तामिळनाडू येथील रहिवासी आहे. (Cyber ​​Fraud)

इतर कोट्यवधींच्या सायबर गुन्ह्यांशीही संबंध :

तपासादरम्यान आरोपीच्या बँक खात्याचा वापर इतर अनेक सायबर फसवणुकींसाठीही करण्यात आल्याचे समोर आले आहे. नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २ कोटी १ लाख ६ हजार रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. याशिवाय राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टलवरही आरोपीविरोधात आंध्र प्रदेश, ठाणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथील तीन स्वतंत्र तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. (Cyber ​​Fraud)

सायबर पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्ती किंवा संस्थांच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले असून, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची विश्वासार्हता तपासूनच आर्थिक व्यवहार करण्याचा सल्ला दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >