Sunday, July 5, 2026

Tree Collapse Accident In Mumbai : धक्कादायक! मुसळधार पावसात आणखी एक बळी; आरे कॉलनीत तरुणाचा दुर्दैवी अंत

Tree Collapse Accident In Mumbai : धक्कादायक! मुसळधार पावसात आणखी एक बळी; आरे कॉलनीत तरुणाचा दुर्दैवी अंत

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दुर्घटनांची मालिकाही सुरूच आहे. पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच गोरेगावच्या आरे कॉलनीत चालत्या दुचाकीवर झाडाची मोठी फांदी कोसळून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर मुंबईतील पावसामुळे झालेल्या मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे. (Tree Collapse Accident In Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी मुसळधार पावसादरम्यान आरे कॉलनीतील युनिट क्रमांक १३ रस्त्यावर ही दुर्घटना घडली. हसन रझा जहांगीर आलम सय्यद (वय १८) हा साकीनाका परिसरातील रहिवासी असून तो मित्रांसोबत दुचाकीवरून जात होता. त्याचवेळी झाडाची मोठी फांदी अचानक तुटून त्याच्या डोक्यावर कोसळली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. (Tree Collapse Accident In Mumbai)

स्थानिक नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी हसन रझाला तातडीने मलाड पूर्व येथील बाळाजी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आरे कॉलनी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, यापूर्वीही शनिवारीच कुर्ल्यातील नौपाडा परिसरात झाड कोसळून ६३ वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झाला. दुपारी सुमारे १२.४५ वाजता घडलेल्या या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. (Tree Collapse Accident In Mumbai)

याआधी दोन दिवसांपूर्वी साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तसेच चेंबूरमध्ये झाड कोसळून एका शाळकरी मुलाचाही जीव गेला होता. या चार वेगवेगळ्या दुर्घटनांमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर झाडांची पाहणी, धोकादायक फांद्यांची छाटणी आणि उघड्या मॅनहोलवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (Tree Collapse Accident In Mumbai)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >