Friday, July 3, 2026

FIFA WORLDCUP 2026 : सलाहच्या नेतृत्वाखाली इजिप्तचा इतिहास; ऑस्ट्रेलियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ ने हरवत प्रथमच विश्वचषकाच्या बाद फेरीत विजय

FIFA WORLDCUP 2026 : सलाहच्या नेतृत्वाखाली इजिप्तचा इतिहास; ऑस्ट्रेलियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ ने हरवत प्रथमच विश्वचषकाच्या बाद फेरीत विजय

अर्लिंग्टन (टेक्सास) : मोहम्मद सलाहच्या नेतृत्वाखाली इजिप्तने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत बाद फेरीतील आपल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. निर्धारित वेळ आणि अतिरिक्त वेळ संपल्यानंतर सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये इजिप्तने अचूक खेळ करत उपांत्यपूर्व फेरीकडे (राऊंड ऑफ १६) वाटचाल केली.

इजिप्तसाठी हा विजय अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच नॉकआऊट फेरीतील सामना जिंकण्याची किमया त्यांनी साधली. आता राऊंड ऑफ १६ मध्ये त्यांचा सामना गतविजेता अर्जेंटिना किंवा केप वर्दे यांच्यापैकी विजेत्या संघाशी होणार आहे.

सामन्याच्या १३व्या मिनिटाला इमाम अशूरने शानदार हेडरद्वारे इजिप्तला आघाडी मिळवून दिली. मात्र, ५५व्या मिनिटाला बचावपटू मोहम्मद हानीच्या दुर्दैवी आत्मघाती गोलमुळे ऑस्ट्रेलियाने १-१ अशी बरोबरी साधली. उर्वरित वेळेत दोन्ही संघांना संधी मिळाल्या, मात्र कोणालाही निर्णायक गोल करता आला नाही.

पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाची सुरुवातच खराब झाली. हॅरी साऊटरचा पहिला प्रयत्न गोलपोस्टच्या वर गेला, तर लुकास हेरिंग्टनचा चौथा फटका क्रॉसबारला लागला. इजिप्तकडून महमूद साबेर, रामी राबिया, मोहम्मद सलाह आणि अखेरीस होसाम अब्देलमग्विड यांनी अचूक पेनल्टी मारत संघाला ४-२ असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

लिव्हरपूलचा माजी स्टार मोहम्मद सलाह हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतरही संपूर्ण १२० मिनिटे मैदानावर खेळला. सामन्यानंतर भावना व्यक्त करताना तो म्हणाला, "आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक आहे. आमच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना आनंद साजरा करताना पाहणे यापेक्षा मोठे समाधान नाही."

इजिप्तचे प्रशिक्षक होसाम हसन यांनीही खेळाडूंच्या धैर्याचे कौतुक केले. "पेनल्टी शूटआऊटपूर्वी मी फक्त देवाकडे इजिप्तच्या चाहत्यांना आनंद देण्याची प्रार्थना करत होतो. खेळाडूंना मी फक्त त्यांच्या किकवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते," असे त्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियासाठी जॅक्सन इर्विन आणि अवर माबिल यांनी पेनल्टीमध्ये गोल केले. मात्र, दोन महत्त्वाच्या चुका संघाला महागात पडल्या. प्रशिक्षक टोनी पोपोविच यांनी पराभवानंतर निराशा व्यक्त करत, "विजयाच्या इतक्या जवळ येऊन पराभव स्वीकारणे अत्यंत वेदनादायक आहे. हा निकाल पचवणे कठीण आहे," अशी प्रतिक्रिया दिली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा युवा गोलकीपर पॅट्रिक बीचने अनेक उत्कृष्ट बचाव केले. अतिरिक्त वेळ संपल्यानंतर अनुभवी मॅथ्यू रायनला पेनल्टी शूटआऊटसाठी मैदानात उतरवण्यात आले, मात्र इजिप्तच्या अचूक फटक्यांसमोर त्यालाही यश मिळाले नाही.

विश्वचषकात गट फेरीत न्यूझीलंडवर मिळवलेल्या पहिल्या विजयापाठोपाठ आता बाद फेरीतील पहिलाच विजय मिळवत इजिप्तने आपल्या फुटबॉल इतिहासात नवे सुवर्णपान लिहिले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >