Saturday, July 4, 2026

Devendra Fadnavis : गेमिंगमध्ये भारताची मोठी झेप! ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ साठी ‘इंडिया रायझिंग’चा ऐतिहासिक मार्ग खुला

Devendra Fadnavis : गेमिंगमध्ये भारताची मोठी झेप! ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ साठी ‘इंडिया रायझिंग’चा ऐतिहासिक मार्ग खुला

- ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पॅरिस येथे होणाऱ्या 'ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६' या गेमिंग विश्वाच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 'इंडिया रायझिंग' आणि 'जिओ ब्लास्ट'च्या माध्यमातून भारताचे दरवाजे खुले होत आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक गुणवंत युवा गेमरला आता जागतिक स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटविण्याची संधी उपलब्ध झाली असून, हा भारताच्या डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेच्या वाटचालीतील ऐतिहासिक टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर, बीकेसी, मुंबई येथे आयोजित 'इंडिया रायझिंग : रोड टू ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६' या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ पी अन्बळगन, जिओ ब्लास्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ली कॉड्रे, ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप फाउंडेशनचे प्रतिनिधी जेम्स कनिंगहॅम, विविध ई-स्पोर्ट्स संघटनांचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच देशभरातील गेमर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईने चित्रपट आणि मनोरंजन उद्योगाच्या माध्यमातून 'स्वप्ननगरी' म्हणून जागतिक ओळख निर्माण केली आहे. आता ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) या नव्या सर्जनशील उद्योगांमध्येही महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. माहिती तंत्रज्ञान, डिजिटल कौशल्य, उत्कृष्ट शैक्षणिक संस्था, चित्रपटसृष्टी, ओटीटी निर्मिती, पोस्ट-प्रोडक्शन सुविधा आणि सक्षम पायाभूत व्यवस्था यांमुळे महाराष्ट्राने या क्षेत्रात भक्कम परिसंस्था उभी केली आहे. (Devendra Fadnavis)

एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्र झपाट्याने विकसित :

गेमिंग उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्याकडे लक्ष वेधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जागतिक स्तरावर गेमिंग उद्योगाचा वार्षिक महसूल चित्रपट आणि संगीत उद्योगाच्या एकत्रित महसुलापेक्षाही अधिक झाला आहे. भारतात ५० कोटींहून अधिक सक्रिय गेमर्स असून देशांतर्गत गेमिंग उद्योगाची व्याप्ती सुमारे ४० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे गेमिंग हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून रोजगार, नवोन्मेष, उद्योजकता आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा प्रभावी आधारस्तंभ बनत आहे. परवडणारा डेटा, वेगवान इंटरनेट, युपीआय व्यवहार व्यवस्था आणि अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानामुळे भारतात एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हर्च्युअल प्रोडक्शन आणि इमर्सिव्ह तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भविष्यातील मनोरंजन आणि डिजिटल कंटेंट उद्योगाची दिशा निश्चित होत आहे. (Devendra Fadnavis)

राज्यभरात १२ एव्हीजीसी पार्क :

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, व्यापक एव्हीजीसी-एक्सआर धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या धोरणांतर्गत ३,२६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे आणि दोन लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा देण्यात आला असून राज्यभरात १२ एव्हीजीसी पार्क विकसित करण्यात येत आहेत. (Devendra Fadnavis)

मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक व्हर्च्युअल प्रोडक्शन व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रेंडरिंग सुविधा उभारण्यात येणार असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ५० एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे कंटेंट क्रिएटर्स संकुल उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. (Devendra Fadnavis)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून मुंबईमध्ये 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज' स्थापन होत असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही संस्था देशाच्या क्रिएटिव्ह आणि ऑरेंज इकॉनॉमीला नवी दिशा देणारी ठरेल आणि जागतिक दर्जाचे मनुष्यबळ घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'इंडिया रायझिंग' आणि 'जिओ ब्लास्ट' या उपक्रमांमुळे भारतातील प्रत्येक युवा गेमरला जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्रातील शहरांसह ग्रामीण भागातील प्रतिभावान युवकांनाही आता जागतिक स्तरावर पोहोचण्याची समान संधी मिळणार आहे. त्यामुळे भारताची गेमिंग प्रतिभा जागतिक मंचावर अधिक प्रभावीपणे झळकणार आहे.

या उपक्रमात सुमारे ५० हजार स्पर्धक, पाच हजार प्रत्यक्ष प्रेक्षक, आठ कोटी डिजिटल प्रेक्षक आणि २० कोटींहून अधिक डिजिटल इम्प्रेशन्स अपेक्षित असून जिओच्या ६० कोटींहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत या अभियानाची पोहोच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या इतिहासातील सर्वात व्यापक आणि प्रभावी ई-स्पोर्ट्स अभियान म्हणून 'इंडिया रायझिंग'ची नोंद होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गेमिंग उद्योग भविष्यातील जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण घटक ठरणार असून महाराष्ट्रातील युवा शक्ती, नवोन्मेष आणि सर्जनशीलतेच्या बळावर राज्य जागतिक गेमिंग आणि डिजिटल कंटेंट उद्योगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "चित्रपट आपल्याला स्वप्नांचे जग दाखवतात; परंतु गेमिंग आपल्याला त्या स्वप्नांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि स्वतः त्या विश्वाचा नायक बनण्याची संधी उपलब्ध करून देते."

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक, जिओ ब्लास्ट, उद्योग क्षेत्रातील सहभागी संस्था तसेच सर्व स्पर्धकांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र शासन एव्हीजीसी-एक्सआर, गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स क्षेत्राला सर्वतोपरी पाठबळ देत राज्याला डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनविण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >