महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतरांची मालिका अजूनही थांबलेली नाही. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून सुरू असलेली गळती हा पक्षासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. प्रत्येक पक्षांतरानंतर नेतृत्वाला धक्का बसल्याचे चित्र दिसते, तर दुसरीकडे संघटनेतील संवाद, नेतृत्वाची पकड आणि कार्यकर्त्यांशी असलेले संबंध यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अलीकडेच माजी मंत्री आणि आमदार सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी खासदार संजय दिना पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनीही पक्षाला रामराम ठोकला होता. पक्षातील नाराजी, नेतृत्वावरील विश्वास, राजकीय वास्तव आणि बदलत्या सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देत आहेत.
सहा खासदारांच्या बंडखोर गटात संजय दिना पाटील यांचे नाव आले आणि त्यांनी अधिकृतरीत्या शिंदे सेनेत प्रवेश केला, तेव्हाच आमदार सचिन अहिरही उबाठातून बाहेर पडणार, हे जाणकारांनी हेरले होते. अहिर ज्या पक्षात होते, त्या पक्षाच्या प्रमुखांना आणि त्यांच्या युवराजांना मात्र याने चांगलाच धक्का बसलेला दिसला. त्यांना याची जराही कल्पना नव्हती, हे त्यांनी उघडरीत्या व्यक्त केलेल्या भावनांतून तरी दिसते. आपल्याबरोबर असणाऱ्यांची किती माहिती ही मंडळी किती ठेवतात आणि राजकारणाची त्यांना किती जाण आहे, हेही यावरून स्पष्ट होते. यशस्वी राजकारण करायचे, आपल्या बरोबरच्या नेत्या, कार्यकर्त्यांचे भविष्य घडवायचे, तर त्यासाठी कान जमिनीला लागलेले असावे लागतात. प्रत्यही प्रवाही राजकारणातल्या वाऱ्यांचा वेध घ्यावा लागतो. उबाठा आणि त्यांच्या चिरंजीवांकडून ही अपेक्षा करता येत नाही. कारण त्यांना मुळात राजकारणात, जनजीवनातच रस नाही. आपल्याबरोबरच्या लोकांबाबत आस्था नाही. राजकारणामुळे साध्य होऊ शकणाऱ्या अन्य बाबींत मात्र त्यांना विलक्षण रस आहे! त्यामुळे, त्यांचे विषयही तेच असतात. विचार करण्याचे, चिंतनाचे विषय जर सतत केवळ चैन आणि ऐषोरामाचे असतील, तर अशा नेत्यांच्या वाट्याला यापेक्षा वेगळे काय येणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठी फूट पडली, तेव्हा जनमानसात या पिता-पुत्राबाबत थोडीशी सहानुभूती होती. त्यांनी चेहऱ्यावर भोळेपणाचा आणि सज्जनतेचा जो बुरखा घेतला होता, त्यामुळे मध्यमवर्गीय मतदारात सहानुभूती तयार झाली होती. पण, त्यानंतरच्या निवडणुकांत त्यांनी उपसलेले कष्ट, पक्ष वाचवण्यासाठी घेतलेली ढोर मेहनत, प्रबोधनकार आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचा वारसा सिद्ध करण्यासाठी दाखवलेली कमालीची सजगता पाहून मतदारांचे डोळे दिपून गेले. या पिता-पुत्राच्या ऐदी, आळशी आणि आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याच्या वृत्तीकडे पाहून त्यानंतरच्या फुटींवेळी, पराभवांवेळी त्यांच्या बाजूने जनतेची सहानुभूती अजिबात दिसत नाही. शिवसैनिकांकडून संताप व्यक्त व्हायला, संताप उमटायला आता तिथे शिवसैनिकच शिल्लक नाही आणि जो जुन्या निष्ठेने शिल्लक आहे, त्याला वस्तुस्थिती दिसते आहे.
तो तरी आपल्या मनाची किती फसवणूक करून घेईल? त्यामुळे, उबाठाच्या अ. भा. प्रवक्त्यांनी 'ऑपरेशन तुडवा'चा आदेश देऊनही रस्त्यावरची एक काडीही कोणी पायाखाली घेतली नाही! शिल्लक आमदारांपैकी, नगरसेवकांतल्या एकानेही हा आदेश पाळू नये? प्रवक्त्यांनी खरेतर यावरून आपली संघटनेतील पत लक्षात घ्यायला हवी होती. पण, ते तसे (कधीच) करणार नाहीत. कारण, ते ज्या दिवशी पक्षातली पत पाहून बोलायला जातील, त्यावेळी त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नसेल. उबाठातल्या शिल्लक असल्यानसल्या पदाधिकाऱ्यांना आणि या प्रवक्त्यांना हे पक्के माहीत आहे, की हे प्रवक्ते वृत्तवाहिन्यांसमोर जे बोलतात, त्याचा वस्तुस्थिती किंवा पक्ष संघटना किंवा पक्षाच्या राजकारणाशी काहीही संबंध नसतो. ती फक्त वृत्तवाहिन्यांची गरज असते. या प्रवक्त्यांच्या सख्ख्या भावाच्या मतदारसंघातही कोणा ‘गद्दारा’ला 'तुडवल्या'चे कोणी पाहिले का? सगळा बोलाचा भात अन् बोलाचीच कढी! खासदार अरविंद सावंत आज निष्ठेच्या अन् लोकसभेतल्या कामगिरीच्या मोठ्या गोष्टी करतात. त्यांना सहा - सात खासदारांचा छोटासा गटही सांभाळता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. एवढ्या छोट्या गटातही काय चालले आहे, याचा अंदाज त्यांना आला नाही. आधी टेलिफोन कर्मचाऱ्यांची संघटना, त्यानंतर विधान परिषद, त्यानंतर लोकसभेत प्रदीर्घ संधी मिळूनही त्यांना एवढाही अंदाज येत नसेल, तर दोष त्यांच्या शून्य राजकीय कौशल्याला द्यायचा, की सतत संधी मिळत राहिल्याने अंगात मुरलेल्या बेफिकिरीला? बंगल्यावर जाऊन ‘दरबारी कानखुजली’ करत राहण्यापेक्षा संघटनेत जबाबदारी पार पडली असती, आपल्या पदांना न्याय दिला असता, तर पक्षाची गळती रोखण्यासाठी कोणीतरी काहीतरी करत आहे, हे दिसले असते. जाणाऱ्याने दोन मिनिटे थांबून विचार तरी केला असता! काही तासापूर्वीपर्यंत आपल्याबरोबर बसणारे, चर्चा करणारे अचानक उठून कसे काय निघून जातात? हा प्रश्न जे शिल्लक आहेत (आणि ज्यांच्या मनात बाजू बदलण्याचा तीळमात्रही विचार नाही) त्यांनी करायचा आहे. अन्यथा, जी अखेरची निष्ठावान म्हणून चार-दोन डोकी दिसताहेत, त्यातल्या अर्ध्यांबाबत बाहेर चर्चा सुरू आहेच. वयाच्या साठीच्या आसपास असलेले, या टप्प्यावर कशाला राजकीय आत्महत्या करतील? अहिर यांना पक्ष संघटनेत खूप काही जबाबदाऱ्या दिल्या गेल्या, कारण प्रश्न वरळी विधानसभा मतदारसंघाचा होता.
तो नसता, तर अहिर हे इतके पात्र वाटण्याचे काहीच कारण नव्हते! अहिर आणि संजय पाटील या दोघांनाही त्यांच्या मूळ पक्षात; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही कमी संधी मिळाली नव्हती. दोघांनीही तिथे दीर्घकाळ मुंबईचे अध्यक्षपद सांभाळले होते. अहिर यांना राष्ट्रीय मिल मजदूर संघाची, तर कायमची भेट मिळाली. तिथेही ते पक्षनेतृत्वाच्या अगदी जवळ होते. उबाठातही अहिर यांना तसेच ‘मानाचे पान’ मिळाले. तरीही दोन्ही ठिकाणाहून ते इतक्या बेमालूम बाहेर पडले, की अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या निकटवर्तियांनाही त्याचा संशय आला नाही! विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची माळ आता त्यांच्या गळ्यात आहे. आजपर्यंतच्या प्रवासापेक्षा ही जबाबदारी वेगळी आहे. या टप्प्यावरून त्यांचा राजकीय आलेख कुठल्या दिशेने जाणार, ते ठरणार आहे.





