Tuesday, June 30, 2026

Nashik : देशातील 12'हीट रेसिलियंट सिटीज'मध्ये नाशिकचा समावेश, शहरासाठी पाच कोटींचा विकास आराखडा

Nashik : देशातील 12'हीट रेसिलियंट सिटीज'मध्ये नाशिकचा समावेश, शहरासाठी पाच कोटींचा विकास आराखडा

Nashik : काँक्रिटीकरणाचा वेग आणि हवामानातील सातत्याने होणार बदल यामुळे निर्माण होणाऱ्या 'अर्बन हीट आयलंड'च्या संकटावर मात करण्यासाठी नाशिक महानगरपालिका सरसावली आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी 'हीट रेसिलियंट सिटीज' (Heat Resilient Cities)  उपक्रमासाठी देशातील केवळ १२ शहरांची निवड करण्यात आली आहे आणि त्यामध्ये नाशिकचा समावेश झाला आहे.

पाच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार

'हीट रेसिलियंट सिटीज' (Heat Resilient Cities) या प्रकल्पासाठी शहराला तब्बल पाच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. या उपक्रमासाठी नाशिक महानगरपालिका आणि राष्ट्रीय नागरी व्यवहार संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील उष्णता, 'अर्बन हीट आयलंड'चा प्रभाव, उष्णतेसाठी संवेदनशील भाग आणि जोखमीच्या लोकसंख्येचा सखोल वैज्ञानिक अभ्यास केला जाणार आहे. त्याआधारे शहरासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यात येतील. प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील उष्णतेचे 'हॉटस्पॉट' निश्चित करण्यात येणार असून त्यांचे डिजिटल मॅपिंग (Digital Mapping) करण्यात येईल.

महानगरपालिकेत स्वतंत्र 'उष्णतारोधक कक्ष'

उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी अनेक प्रत्यक्ष विकासकामांनाही गती दिली जाणार आहे. सरकारी आणि खासगी इमारतींवर 'कूल रूफ' संकल्पना राबविणे, इमारतींमध्ये नैसर्गिक वायुविजनासाठी आवश्यक बदल करणे, शहरात 'कूलिंग सेंटर्स' उभारणे, तसेच कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सावलीची व्यवस्था निर्माण करणे या कामांचा समावेश आहे. याशिवाय, महानगरपालिकेत स्वतंत्र 'उष्णतारोधक कक्ष' स्थापन करून हवामानाबाबत पूर्वसूचना देणारी आधुनिक यंत्रणा विकसित केली जाणार आहे. सुमारे १५ महिन्यांत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पाद्वारे शहरातील हरित क्षेत्रे वाढविणे, जलसुरक्षेला चालना देणे, उष्णतेमुळे उद्भवणारे आरोग्यविषयक धोके कमी करणे आणि पर्यावरणपूरक शहरी नियोजनाला गती देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

नाशिकला काय फायदा ?

पर्यावरणपूरक आणि शाश्वत नागरी नियोजन

शहरातील हरित क्षेत्रे आणि जलसुरक्षेला चालना मिळेल

उष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांमध्ये घट होईल

हवामान बदलाशी सुसंगत शहरी विकास होण्यास मदत

भविष्यातील तापमानवाढीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम शहराची निर्मिती

कोणती कामे होणार ?

इमारतींमध्ये नैसर्गिक वायुविजनासाठी रेट्रोफिटिंग करणे

नागरिकांसाठी विविध भागात कूलिंग सेंटर्स विकसित करणे

सरकारी व खाजगी इमारतींवर कूल रूफ प्रणाली विकसित करणे

मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी कामगार चौक परिसरात सावलीची व्यवस्था निर्माण करणे

देशातील १२ शहरांमध्ये निवड झाल्यामुळे नाशिकला राष्ट्रीय स्तरावरील हवामान - संवेदनशील आणि उष्णतारोधक शहर म्हणून विकसित होण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे. या उपक्रमामुळे नाशिकचा शाश्वत, पर्यावरणपूरक आणि नागरिककेंद्रित विकास अधिक वेगाने करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे, असे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >