Tuesday, June 30, 2026

Minister Nitesh Rane : २०१९ ला राजकीय धर्मांतर केले नसते उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती! महाराष्ट्रातील अभिषेक बॅनर्जीमुळे उबाठा गट रिकामा होणार

Minister Nitesh Rane : २०१९ ला राजकीय धर्मांतर केले नसते उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती! महाराष्ट्रातील अभिषेक बॅनर्जीमुळे उबाठा गट रिकामा होणार

मुंबई : उबाठा गटाचे उपनेते आणि आमदार सचिन अहिर यांनी महायुतीकडून (शिवसेना) विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला चढवला. "उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये सत्तेच्या हव्यासापोटी 'राजकीय धर्मांतर' केले नसते, तर आज त्यांच्यावर ही नामुष्कीची वेळ आली नसती. आज उबाठा गटात जी काही पडझड सुरू आहे, ती त्यांच्याच पापांचे फळ आहे," असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे कुटुंबाच्या कार्यपद्धतीवर आणि राजकीय भूमिकेवर कडाडून टीका केली. राणे म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये टीएमसी रिकामी होण्याचे मूळ कारण अभिषेक बॅनर्जी होते. अगदी तसाच एक 'अभिषेक बॅनर्जी' आमच्याकडे महाराष्ट्रात (आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा) आहे. त्यांच्यामुळेच उबाठा पक्ष पूर्ण रिकामा होणार आहे. आता जे काही परिणाम दिसत आहेत, ते त्याच स्वभावाचे आणि कार्यपद्धतीचे आहेत. सचिन अहिर हे कामगार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आहेत. वरळीत आदित्य ठाकरेंच्या निवडणुकीत त्यांचे मोलाचे योगदान होते. अहिर आणि सुनील शिंदे यांच्यासारखे लोक मेहनत करतात म्हणूनच हे दोघे (उद्धव आणि आदित्य) सभागृहात बसून टोमणे मारतात. जर एवढीच हिंमत असेल, तर आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि स्वतःच्या ताकदीवर वरळीतून पुन्हा निवडून येऊन दाखवावे. सुनील शिंदे यांनीही आता तिथे राहून वेळ वाया घालवू नये", असा सल्लाही त्यांनी दिला.

२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सख्ख्या भावापेक्षा जास्त जपले. पण, यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्या फडणवीसांना २०१९ मध्ये मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी कारस्थाने केली, आज त्यांनाच पंतप्रधान करण्याची भाषा उद्धव ठाकरे करत आहेत. याच्याइतका नीचपणा दुसरा असू शकत नाही. २०१९ ला मुल्ला-मौलव्यांच्या समोर लोटांगण घालून ज्यांनी हिंदुत्वाशी, स्वतःच्या धर्माशी आणि देवी-देवतांशी गद्दारी केली, त्यांना आता कोणताही हिंदू देव आशीर्वाद देणार नाही. त्यांनी सरळ जामा मशिदीत किंवा हाजी अली दर्ग्यात जावे आणि एखाद्या मौलवीची दाढी पकडून काही मिळते का ते पाहावे", असा घणाघात नितेश राणे यांनी केला.

दोष उद्धव ठाकरेंमध्येच

शिवसेनेच्या इतिहासात सर्व नेत्यांच्या पक्षाबाहेर पडण्याला उद्धव ठाकरेंचा स्वभावच कारणीभूत असल्याचे नितेश राणे म्हणाले. गणेश नाईक, त्यानंतर नारायण राणे साहेब, राज ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हे सगळे ज्येष्ठ नेते जर एकाच माणसाच्या विरोधात जाऊन पक्ष सोडत असतील, तर दोष बाहेर पडणाऱ्यांमध्ये नाही, तर दोष उद्धव ठाकरेंमध्येच आहे. त्यांनी आता गपचूप राजकारण सोडावे आणि कुठेतरी वृद्धाश्रमात जाऊन बसावे. कारण आता उबाठा पक्ष हा एका छोट्या बचत गटापेक्षाही लहान झाला आहे," अशा शेलक्या शब्दांत त्यांनी टोला लगावला.

बाळासाहेबांना दिलेला त्रास भोगणार

"स्वतःच्या वडिलांना (बाळासाहेबांना) त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये जो त्रास, छळ यांनी केला, त्याचे भोग हा भोगत राहणार आहे. आमच्या राणे साहेबांना जे जेवणाच्या ताटावरून उचलले, त्याचेही भोग तो भोगणार आहे. जो आपल्या वडिलांचा झाला नाही, जो आमच्या देवेंद्रजींचा झाला नाही, तो या आमदारांचा, खासदारांचा आणि शिवसेनेच्या सहकाऱ्यांचा काय होणार? उद्धव ठाकरेंनी स्वतःच स्वतःची वेळ खराब करून घेतली आहे", असेही नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा