Blood Bank : जे. जे. सरकारी रक्तपेढी कथित रक्तचोरी गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल होणार

राज्यातील सर्व रक्तपेढ्यांचे ऑडिट व 'क्यूआर कोड' ट्रॅकिंग प्रणाली लागू करण्याचे सरकारचे आश्वासन


मुंबई : मुंबईतील सर जे. जे. महानगर सरकारी (Sir J. J. Metropolitan Govt) रक्तपेढीतील कथित रक्तचोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राज्य सरकार अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असून, या प्रकरणातील मुख्य दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, अशी ठाम भूमिका सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधान परिषदेत मांडली. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देताना मंत्री बोर्डीकर यांनी स्पष्ट केले की, प्राथमिक चौकशीमध्ये जे. जे. रक्तपेढीचे प्रमुख डॉ. हितेश पगारे आणि वैद्यकीय सामाजिक अधिकारी भिसे हे प्रथमदर्शनी दोषी आढळले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांची सेवा तात्काळ समाप्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याविरुद्ध लवकरच फौजदारी गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात येतील.



यापूर्वी, आमदार चित्रा वाघ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात हा अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. चिंचपोकळी येथील रक्तदान शिबिरातून संकलित झालेल्या १२८ रक्तपिशव्यांपैकी ५५ रक्तपिशव्या कोणतीही पूर्वपरवानगी अथवा अधिकृत नोंद न करता बदलापूर येथील 'माया रक्तपेढी' या खासगी केंद्राकडे पाठविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच, सरकारी यंत्रणेचा गैरवापर, नियमबाह्य सवलती देऊन प्रति रक्तपिशवी ६६५ रुपयांच्या दराने पुरवठा आणि खासगी संस्थांकडून झालेली नफेखोरी याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. याशिवाय गरीब रुग्ण, थॅलेसेमिया व सिकलसेल रुग्णांना होणारा त्रास, डोनर कार्डवरील बारकोडचा अभाव आणि गेल्या दहा वर्षांत रक्तपेढीचे ऑडिट न होणे या सर्व प्रशासकीय त्रुटींवर त्यांनी सरकारला प्रश्न विचारले.


आमदारांच्या या प्रश्नांना अत्यंत सविस्तर उत्तर देत मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सरकारच्या आगामी ठोस उपाययोजनांची माहिती दिली. रक्तपेढीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी सहाय्यक संचालकाचे पूर्णवेळ पद निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच, भविष्यात रक्ताचा असा कोणताही गैरव्यवहार रोखण्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO) व अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) मार्गदर्शक सूचनांनुसार एक कडक एसओपी (SOP) तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक रक्तपिशवीचे पारदर्शक ट्रॅकिंग करण्यासाठी 'क्यूआर कोड आधारित ट्रॅकिंग प्रणाली' लागू करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.



रक्तपेढ्यांच्या संख्येवर प्रश्न


याच चर्चेदरम्यान, भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी राज्यातील रक्तपेढ्यांच्या संख्येवर प्रश्न उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या ४१७ रक्तपेढ्या कार्यरत असून आवश्यकतेपेक्षा जास्त रक्तसंकलन होत असताना आणखी १५० नवीन रक्तपेढ्यांना परवानगी देण्याची चर्चा का सुरू आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना मंत्री बोर्डीकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आणि "नवीन १५० रक्तपेढ्यांना मंजुरी देण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारसमोर विचाराधीन नाही," असे स्पष्ट केले.



राज्यव्यापी तपासाची मागणी


सभागृहातील इतर सदस्यांनी या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन राज्यव्यापी चौकशीची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री बोर्डीकर यांनी सांगितले की, राज्यातील सर्व रक्तपेढ्यांचे नियमित ऑडिट केले जात असून, आवश्यकता भासल्यास विशेष तपासणी मोहीमही राबवली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही रक्तपेढीची गय केली जाणार नाही आणि त्यांचे परवाने थेट रद्द केले जातील. रक्तपेढ्यांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी 'थर्ड पार्टी ऑडिट' (Third Party Audit) करण्याचाही सरकारचा मानस आहे. दोषींविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर चौकशीत आणखी काही गंभीर बाबी किंवा इतर व्यक्ती समोर आल्या, तर त्यांच्यावरही अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सरकारतर्फे सभागृहात दिली.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि