Monday, June 29, 2026

Eknath Shinde : 'घर म्हणजे चार भिंती नव्हे, तर स्वप्नांचा महाल'; ठाण्यात जय भवानी सोसायटीतील रहिवाशांचे गृहस्वप्न पूर्ण

Eknath Shinde : 'घर म्हणजे चार भिंती नव्हे, तर स्वप्नांचा महाल'; ठाण्यात जय भवानी सोसायटीतील रहिवाशांचे गृहस्वप्न पूर्ण

- रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : "घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत, तर ते प्रेम, आपुलकी, आनंद आणि कुटुंबाच्या स्वप्नांचे सुरक्षित आश्रयस्थान असते. प्रत्येक कुटुंबाला दर्जेदार आणि सुरक्षित घर मिळावे, हेच राज्य सरकारचे ध्येय आहे," असे विधान उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

ठाण्यातील माजिवडा सर्कल परिसरातील साईनाथ नगर येथील जय भवानी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांना नव्या घरांच्या चाव्यांचे वितरण करताना ते बोलत होते. यावेळी अनेक लाभार्थ्यांचे अनेक वर्षांचे गृहस्वप्न साकार झाले. (Eknath Shinde)

ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच राजकीय प्रवास :

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, नगरसेवकापासून आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपर्यंतचा आपला राजकीय प्रवास ठाणेकरांच्या विश्वास आणि आशीर्वादामुळेच शक्य झाला. त्यामुळे नागरिकांच्या हातात स्वतःच्या घराच्या चाव्या देण्याचा क्षण हा नेहमीच आनंददायी आणि समाधान देणारा असतो. (Eknath Shinde)

रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यावर भर :

गृहनिर्माण खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभरातील रखडलेले पुनर्विकास आणि गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. विविध प्रशासकीय अडथळे दूर करून नागरिकांना शक्य तितक्या लवकर घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde)

क्लस्टर पुनर्विकासाला वेग :

राज्यात क्लस्टर पुनर्विकास योजनांना मोठी गती देण्यात येत असल्याचे सांगताना त्यांनी वागळे इस्टेटसह अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याची माहिती दिली. तसेच मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर येथे १७ हजार घरांच्या मोठ्या क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात झाल्याचेही त्यांनी नमूद केले. या माध्यमातून मुंबई आणि ठाणे झोपडपट्टीमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. (Eknath Shinde)

प्रत्येकाला दर्जेदार घर देण्याचा संकल्प :

सरकारकडून नागरिकांना सुमारे ३०० चौरस फुटांची दर्जेदार आणि सुरक्षित घरे उपलब्ध करून दिली जात असल्याचे सांगत, या प्रकल्पातील गुणवत्तापूर्ण बांधकामासाठी विकासक कटारिया यांचे त्यांनी कौतुक केले. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता येईल असे घर मिळावे, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)

'नऊ नव्हे, तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करा' :

"देर आये दुरुस्त आये," असे म्हणत या प्रकल्पासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना शिंदे यांनी विकासकांनाही स्पष्ट इशारा दिला. गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नऊ वर्षे लागणे आता स्वीकारार्ह नाही. पुढील काळात प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांच्या आत पूर्ण झाला पाहिजे. वेळेत आणि दर्जेदार काम करणाऱ्या विकासकांनाच सरकारकडून भविष्यातील प्रकल्पांमध्ये प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde)

या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी नागरिक उपस्थित होते. (Eknath Shinde)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा