नेमकी जागा...

संवाद-गुरुनाथ तेंडुलकर


एका कारखान्यात घडलेली गोष्ट...



सकाळचे ७ वाजले. पहिल्या पाळीचे सगळे कामगार कामावर आले. कपडे बदलून, युनिफॉर्म-गमबूट चढवून आपापल्या कामाच्या जागी यंत्रावर रुजू झाले. प्रोसेस ऑपरेटरने मशीन चालू केली. अर्धा तास सर्व काम नीटपणे सुरू होतं आणि अचानक एका यंत्रातून खडखड खडखड असा आवाज येऊ लागला. त्या यंत्रावरच्या कामगाराने ती बाब त्याच्या सुपरवायझरला सांगितली. सुपरवायझरने मेन्टेनन्स डिपार्टमेंटला कळवलं. तिथून इंजिनीअर आले. त्यांनीही मशीन तपासली. पण तो खडखडाट कमी होण्याऐवजी वाढतच गेला आणि अचानक मशीन बंद पडली.


सर्व जणांनी आपापल्या परीने ती मशीन पुन्हा सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण मशीन सुरूच होईना.चार-सहा तास असेच वाया गेले. आता मात्र सगळ्यांचेच धाबे दणाणले. प्रॉडक्शन डिपार्टमेंट हैराण झालं. कारण दररोज ठरावीक प्रॉडक्शन देणं गरजेचं होतं. एक मशीन बंद म्हणजे त्याचा परिणाम इतर सगळ्या मशीनवर होणार होता. दिवाळी तोंडावर आली होती. आता करायचं काय? घेतलेल्या ऑर्डर्स पूर्ण करायच्या होत्या.कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आले. मालक आले. त्यांनी आणखी दोन तीन सीनिअर इंजिनीअरांबरोबर चर्चा केली. लवकरात लवकर ही मशीन सुरू होणं गरजेचं होतं. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत होता. पण... मशीन काही केल्या सुरू होईना.अखेरीस व्यवस्थापनाने एका कन्सल्टंटशी संपर्क साधला. त्या कन्सल्टंटच्या कंपनीतून एक इंजिनीअर दुसऱ्या दिवशी सकाळी आला. त्याने ती सगळी मशीन नीट पाहिली. कामगारांना काही प्रश्न विचारले आणि एक हातोडा मागवून घेतला.त्या इंजिनीअरने मशीनच्या एका विशिष्ट भागावर खडूने फुल्ली मारली आणि हातोड्याने त्या खुणेवर दणकन् घाव घातला...
‘आता मशीन ऑन करा.’ तो
इंजिनीअर म्हणाला.
मशीनचा स्वीच ऑन केला आणि
काय आश्चर्य!


मशीन अगदी नवीन असल्यासारखी चालू झाली. आदल्या दिवशी होणारा खडखड आवाजही आता बंद झाला होता...सगळ्यांच्या जीव भांड्यात पडला. सर्वांनी त्या इंजिनीअरचं कौतुक केलं. जाता जाता त्या इंजिनीअरने आपलं बील कंपनीच्या मालकाच्या हातात ठेवलं. बिलाची रक्कम होती ‘दहा हजार शंभर रुपये.’कंपनीच्या मालकाने ते बिल पाहिलं आणि विचारलं, ‘हे काय दहाहजार शंभर रुपये. हे असलं कसलं बील? तुम्ही तर फक्त एक हातोडा मारलात आणि दहा हजार शंभर रुपये मागताय? हातोडा काय आमच्या कुणीही कामगाराने मारला असता.’ठीक आहे. मी शंभर रुपये कमी करतो. दहा हजारच द्या.’ तो इंजिनीअर मिश्कीलपणे म्हणाला.‘काय फक्त शंभर रुपये कमी करताय तुम्ही?मालकांनी गोंधळून  होय. दहा हजार शंभर रुपयातले शंभर रुपये हातोडा मारण्याचे. ते काम तुमच्या कोणत्याही कामगारानं सहज केलं असतं. म्हणून ते शंभर रुपये मी सोडून देतो. आणि दहा हजार रुपये?’‘दहा हजार रुपये हातोडा नेमका कुठं मारायचा त्याचे... तुमच्या कामगारांनाजमलं नसतं.’तेव्हा मात्र मालकांनी कौतुकभरल्या नजरेनं त्या इंजिनीअरकडे पाहिलं आणि दहा हजार शंभर रुपयांचा चेक त्याच्या नावाने लिहिला.


आपल्याला आपल्या नेहमीच्या दैनंदिन व्यवहारात हा अशा प्रकारचा अनुभव नेहमीच येत असतो.भिंतीला रंग लावणारा रंगारी दिवसभराचे केवळ चार-पाचशे रुपये मिळवतो, पण छोट्याशा कॅनव्हासवर चित्र काढणारा चित्रकार मात्र हजारो-लाखो रुपये मिळवतो.हॉस्पिटलमधे झाडू मारणारा, उपकरण धुणारा वॉर्डबॉय दिवसभर राबतो पण त्याला मिळणारा पगार आणि ऑपरेशनच्या वेळी पेशंटला अर्ध्या मिनिटात भूल देणारा ॲनस्थेटिक्स डॉक्टर दोघांच्या उत्पन्नात प्रचंड तफावत असते.कोर्टाच्या आवारात टायपिंग करणारा कारकून आणि योग्य तन्हेने युक्तिवाद करून खटला जिंकून देणारा वकील यांच्या उत्पन्नातला फरक ध्यानात घ्या...पोष्टाच्या बाहेर पत्रं लिहून देणारा माणूस आणि एखाद्या चित्रपटासाठी गाणी लिहिणारा गीतकार...अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. हातोडा मारायचे केवळ शंभर रुपये... पण हातोडा नेमका कुठं मारायचा याचे मात्र दहा हजार रुपये. कारण केवळ हातोडा मारणं महत्त्वाचं नसतं, तर तो योग्य जागी मारणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ती योग्य जागा समजण्यासाठी योग्य ते शिक्षण घेणं आवश्यक असतं. त्या व्यवसायाचं तंत्र आत्मसात करणं आवश्यक असतं.अनेक अनुभव गाठीशी साठवावे लागतात. योग्य ज्ञान प्राप्त करावं लागतं आणि नंतरच हातोडा नेमका कुठं मारायचा ते कळतं.नेमकी जागा न सापडता तोच हातोडा जर चुकीच्या जागी बसला असता तर...? तर त्या मशीनची वाट लागली असती...एक संस्कृत श्लोक आठवला म्हणून सांगतो...युक्तैव बोधयित्येष जीव आत्मनि योज्यते। यद् युक्त्या सद्यते कार्य न तद् यत्नम् शतैरपि ।।अर्थ : युक्तीने जे कार्य साधते ते केवळ शेकडो पट अधिक प्रयत्न करूनही साधत नाही.यशासाठी केवळ प्रयत्न आणि श्रम उपयोगी नसतात. तिथं डोकं वापरणं अत्यंत महत्वाचं असतं.आज आपण आपल्या आजूबाजूला जी अयशस्वी माणसं पाहतो त्यापैकी नव्याण्णव टक्के माणसं आपल्या अपयशाचं खापर नशिबावर फोडतात किंवा दुसऱ्या कुणाला तरी दोष देतात.‘त्या अमक्या तमक्यामुळे मला आयुष्यात पुढे जाता आलं नाही.’ असं सांगून स्वतःचा नाकर्तेपणा नाकारतात. परिस्थितीची ढाल पुढे करून आपली कर्तृत्वहीनता झाकण्याचा प्रयत्न करतात. नशिबाला बोल लावून स्वतःचा आळस लपवतात... काही माणसं तर खूप काम करतात. अगदी ढोर मेहनत करतात. पण तरीही त्यांना त्यांच्या कामात यश मिळत नाही.  शाळेत सुद्धा आपण पाहतो. केवळपुस्तकात डोकं खुपसून बसलेली अनेक मुलं परीक्षेत मागे पडतात. कारण त्यांना परीक्षेचं तंत्र उलगडलेलं नसतं.क्रिकेटच्या खेळात आपण पाहतो. केवळ बॅट उचलून वेगाने फिरवली म्हणजे चेंडू सीमापार होत नाही. त्यासाठी अचूक वेळ आणि अचूक दिशा महत्त्वाची असते. केवळ औषधं घेऊन रोगी बरा होत नसतो. योग्य औषध योग्य प्रमाणात, योग्य वेळी घेणं आणि त्याचबरोबर पथ्य, आराम वगैरे इतर योग्य गोष्टी योग्य प्रमाणात असाव्या लागतात. व्यापार उद्योगातही दुकानात दिवसभर बसूनही अनेक धंदे बुडालेले आपण पाहतो. कला, क्रीडा, राजकारण, साहित्य, नाट्य कोणतंही क्षेत्र घ्या. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अनेक अयशस्वी माणसं आढळतील. ‘मी खूप कष्ट केले पण... पण नशीबच नव्हतं...’ असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील.


ही अपयशी माणसं अनेकदा खूप भाबडी असतात. राब राब राबतात. काबाडकष्ट करतात. अगदी ढोर मेहनत करतात. पण त्या मेहनतीच्या मानाने त्यांना यश मिळत नाही. अनेकदा तर खूप कष्ट करूनही अपयशच पदरात पडतं. कारण यश मिळविण्यासाठी केवळ कष्ट करणं महत्त्वाचं नसतं तर त्या कष्टांची दिशा देखील योग्य असावी लागते.
पण नीट विचार केला तर कोणत्याही ‘अपयशाचं रहस्य’ नेमकं काय असतं?
चमकलात ना?
‘अपयशाचं रहस्य...’ हा शब्द वाचून दचकलात ना?
आपण यशाच्या रहस्याबद्दल खूप वाचलेलं, ऐकलेलं असतं पण ‘अपयशाचं रहस्य...?’
होय. अपयशाचं रहस्य म्हणजे...!
हातोडा नेमका कुठे मारायचा याचं
ज्ञान नसणं...!
केवळ हातोडा उचलून ताकद एकवटून जोरात घाव घालून भागत नाही. घाव नेमका कुठं घालायचा ती जागा ठाऊक असणं
अधिक महत्वाचं...
मला वाटतं यश आणि अपयश या दोघांतला फरक ती नेमकी जागा माहीत असणं आणि माहीत नसणं यातच दडला आहे.

Comments
Add Comment

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

विश्वासघात

संस्कृतीचा गोडवा-पूर्णिमा शिंदे पुण्यातील कर्वेनगर येथे स्थायिक असलेले संध्या आणि विनोद शहा हे व्यापारी असतात.

बाळू

नक्षत्रांचे देणे- डॉ. विजया वाड बाळू माझा विद्यार्थी. अगदी भारी दांड. मी तेव्हा उदयाचलात पर्यवेक्षक होते. एका

प्रामाणिकपणा

जीवनगंध-पूनम राणे शाळा सुरू व्हायला अवघे दोन दिवस बाकी होते. सरला मॅडम आपल्या घराची साफसफाई करण्यात गुंग होऊन