मृग नक्षत्र लांबले, कोकण कोरडे पडले!

हिरवाई, पाऊस आणि निसर्गाच्या लयीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणावर यंदा बदलत्या हवामानाची छाया गडद झाली. पावसाची प्रतीक्षा लांबत असताना शेतकरी, जलस्रोत आणि संपूर्ण ग्रामीण जीवनचक्र चिंतेत सापडले आहे. ऋतुचक्रातील बदलामुळे कोकणातील पावसाची पारंपरिक वेळ विस्कटत असून, आकाशाकडे लागलेल्या नजरा आता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


तुचक्रातील या अनिश्चिततेमुळे सारेच बदलून गेले आहे. पाऊस केव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा केवळ कोकणातील शेतकऱ्यांनाच नाही, तर पाण्याच्या स्रोतांनाही आहे. दिवसेंदिवस पाण्याचे साठे कमी होत असून, यंदा कोकणात अपेक्षित प्रमाणात पाऊस होईल की नाही, याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे पावसाची सुरुवात अद्याप लांबली आहे, तर दुसरीकडे त्यामुळे अनेक प्रश्नांची गुंतागुंत निर्माण झाली आहे. नेहमी हिरवाईने नटलेल्या कोकणावरही यंदा निसर्गाची अवकृपा झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक भागात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे, तर काही ठिकाणी पेरलेला तरवा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. बदलत्या हवामानाचा फटका शेतीला बसत असून, बळीराजाच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोकणात साधारणपणे ७ जूनला मृग नक्षत्राच्या आगमनासोबत पावसाची सुरुवात होते, अशी परंपरागत समजूत आहे.



त्याआधी मे महिन्यातच अवकाळी पावसाच्या रूपाने मान्सूनची चाहूल लागते. मे महिन्याच्या सुरुवातीच्या किंवा शेवटच्या पंधरवड्यात पाऊस हजेरी लावतो; मात्र त्यानंतर काही दिवसांची विश्रांती घेतो. आणि एकदा का ७ जूनच्या मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाने जोर धरला की, कोकणात त्याची संततधार सुरू होते. कोकणातील पावसाची ही अनोखी सैर आणि निसर्गाची ही लय नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण राहिली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ऋतुचक्रात मोठे बदल जाणवत आहेत. पाऊस नेमका कधी येईल आणि कधी परतेल, याचा अंदाज बांधणे आता कठीण झाले आहे. यंदा तर उष्णतेने विक्रमी पातळी गाठली असून, प्रचंड उकाड्याने कोकण अक्षरशः होरपळून निघाले आहे. एप्रिल-मे महिन्यात जाणवणारी तीव्रता यंदा त्याही पुढे गेल्याचा अनुभव येत आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम कोकणातील जलस्रोतांवरही झाला आहे. ज्या काळात नद्या, नाले, ओहोळ पावसाच्या पाण्याने दुथडी भरून वाहायला हवेत, त्या काळात अनेक नदीपात्रे कोरडी पडलेली दिसत आहेत. पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामीण भागातही चिंता वाढली आहे. आता अवघे कोकण आकाशाकडे डोळे लावून बसले आहे. कधी एकदा पावसाच्या सरी बरसतात आणि निसर्ग पुन्हा हिरवाईने नटतो, याची आतुरतेने प्रतीक्षा सुरू आहे.




जूनच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असलेला पाऊस अद्यापही कोकणात दाखल झालेला नाही. अधूनमधून काही भागांत पावसाच्या हलक्या सरी येत आहेत; मात्र त्यात अपेक्षित जोर नसल्याने त्या काही अंतरावरच विरून जात आहेत. वळवाच्या पावसासारखीच या सरींची अवस्था असून, त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. त्यामुळे कोकणातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पारंपरिक भातशेती करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात घटली आहे. वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता आणि आर्थिकदृष्ट्या शेती परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेतीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी अनेक ठिकाणी भातशेतीचे क्षेत्र कमी झाले असून शेतजमिनी पडिक राहण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी कोकणातील अनेक गावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला की शेतकरी भात पेरणीला सुरुवात करतात. सुरुवातीचा चांगला पाऊस मिळाल्यास भाताची रोपेही जोमाने उगवतात. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. अनेक भागांत पेरलेले भात रुजलेलेच नाही, तर काही ठिकाणी थोडेफार उगवलेले पीकही पुढील पाण्याअभावी करपून गेले आहे. कडक उन्हाचा परिणाम भात पेरणीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणात पावसाचे आगमन झाल्यानंतर त्याचा जोर कायम राहतो आणि मुसळधार पाऊस पडतो, असा अनुभव शेतकऱ्यांना आहे.



त्यामुळे यंदाही वेळेवर आणि समाधानकारक पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी भातशेतीची तयारी केली होती. मात्र सध्याच्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे कोकणातील भात उत्पादकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते हिरवागार निसर्गसौंदर्य, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या-नाले आणि पावसाच्या सरींनी न्हाऊन निघालेली सृष्टी. पावसाळ्यात कोकणचे रूप अधिक खुलून येते. मात्र यंदा पावसाने काहीशी पाठ फिरवल्याने कोकणातील शेतकरी चिंतेत आहे. जून-जुलै महिन्यात भातशेतीसह काजू, आंबा यांसारख्या पिकांसाठीही पावसाची मोठी आवश्यकता असते. मात्र पावसाअभावी कोकणातील पाण्याचे स्रोत कमी होऊ लागले आहेत. आकाशात काळे ढग दाटून आले की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही क्षण आशेची किरणे उमटतात; पण ते ढग पाऊस न देता पुढे निघून गेले की पुन्हा निराशा पदरी पडते. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही भाग पूर्वी तीव्र दुष्काळासाठी ओळखले जायचे. या दुष्काळी गावांमधील पाण्यासाठी ग्रामस्थांची होणारी वणवण आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मात्र ताकारीसारख्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे कवठेमहांकाळ, आटपाडी यांसारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अनेक गावांची पाण्याची स्थिती बदलली आहे.



सांगली जिल्ह्यातील जतसारख्या भागातही पाणी उपलब्धतेमुळे परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. एकेकाळी दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आकाशात दाटून येणाऱ्या ढगांकडे आशेने पाहत असे; पण पाऊस न पडता ढग पुढे सरकले की त्याच्या पदरी निराशाच येत असे. आज कोकणातील शेतकऱ्याचीही काहीशी अशीच अवस्था झाली आहे. आकाशातील काळ्या ढगांकडे तो आशेने पाहतोय, मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम आंबा आणि काजू व्यवसायावरही झाला आहे. काही भागात आंब्याचे उत्पादन कमी झाले असून काही बागायतदारांना नुकसान सहन करावे लागले. मात्र काही शेतकऱ्यांना निसर्गाने साथ दिल्याने त्यांनी या संकटातून काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याची परिस्थिती पाहता अनेक ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी १९७२ मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळाची आठवण काढत आहेत. त्या काळातील संकट पुन्हा येऊ नये, अशीच सर्वांची अपेक्षा आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकरी आता एका आशेवर आहेत—केव्हा एकदा पावसाची संततधार सुरू होते आणि संपूर्ण कोकण पुन्हा हिरवाईने न्हाऊन निघते, याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.


___संतोष वायंगणकर

Comments
Add Comment

BEST Bus Strike : बस थांबल्या, प्रश्न उभे राहिले!

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट सेवेसमोर संपाचे संकट उभे ठाकले आहे. संप किती काळ चालेल हे स्पष्ट नसून, प्रशासन

India-US Relations : तणावात मैत्री

भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी-७

शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

४४ दिवसांच्या उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ‘शाळा प्रवेशोत्सव’च्या

सावनेर कॉरिडॉरसमोर आव्हानांची मालिका

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे प्रस्तावित संरक्षण, अणुऊर्जा आणि विमान उद्योग कॉरिडॉर प्रकल्पाला राज्य शासनाने

इज्जतीचा पंचनामा

युद्ध विश्रांतीच्या तयारीवर स्वाक्षरी झाल्यानंतर मूळ मसुद्यावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ट्रम्प काहीतरी कुरापत

उबाठाचा बुरुज ढासळला

मराठवाडा हा एकेकाळी ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा