एका भुताची गोष्ट!

कथा-रमेश तांबे


एक होतं भूत. त्याला रोज रोज स्मशानात राहायचा खूप कंटाळा आला होता. तो म्हणायचा, काय हे आमचे जीवन. या इथे स्मशानात राहायचं. रोज जळणारी प्रेतं आणि रडणारी माणसं बघायची. शिवाय ना कुणाला दिसायचं, ना कुणाला मदत करायची. काय उपयोग आहे एवढ्या बुद्धीचा आणि शक्तीचा? हे काही नाही. आपण माणसं राहतात त्यांच्यासोबत राहायचं. कुठे काय चाललंय ते पाहायचं. चुकीचं घडत असेल, तर ते थांबवायचं. कुणी संकटात असेल तर त्याला मदत करायची. ठरलं तर मग! सर्वांचा निरोप घेऊन, सर्वांना टाटा करून भूत निघालं लोकांमध्ये राहायला. जुन्या जाणत्या भुतांनी त्या तरुण भुताला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते न ऐकताच निघून गेले.

मग भूत निघालं उडत उडत. कधी हसत, कधी ओरडत. मजा करत करत ते पोहोचले माणसाच्या वस्तीत. त्यानं पाहिलं एका मैदानात क्रिकेट खेळ रंगात आला होता. तेवढ्यात एकाने आकाशात उंच चेंडू मारला.भुताने तो वरच्यावरच पकडला आणि तो अलगद क्षेत्ररक्षण करणाऱ्या मुलाच्या हातात दिला. फलंदाज बाद झाला. पण हे विपरीत कसे घडले? सीमारेषेबाहेर जाणारा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात कसा आला, हे कुणालाच कळले नाही. मग एकच जल्लोष झाला आणि भूत तेथून निघाले.एका मिठाईच्या दुकानाबाहेर एक भिकारी भुताला बसलेला दिसला. पण त्याचे ताट मात्र रिकामेच होते. भुताला त्याची दया आली. त्याने लगेचच त्या गरीब माणसाचे ताट वेगवेगळ्या मिठाईने भरून टाकले. त्या गरीब माणसाचा आनंदी चेहरा बघत बघत भूत पुढे निघाले. अशा प्रकारे अनेकांना मदत करत भुताचा दिवस आनंदात चालला होता.

पुढच्या चौकात खूपच गर्दी होती. चार-पाच जणांची टोळी एका तरुणाला बेदम मारत होती. ते दृश्य अनेक जण बघत होते. पण पुढे कोणीच येईना. मग भुताने एकाला ठोसे मारायला सुरुवात केली. कुणालाच कळेना ठोसे कोण मारतंय? मग त्यांचीच आपापसात जुंपली. आपल्याला मारणारेच आपापसात मारामारी करत आहेत हे पाहून त्या तरुणाने तेथून हळूच पळ काढला.आता भुताला खूपच भूक लागली होती. मग कुठे जावे, काय खावे हा विचार करीत असतानाच त्याला समोरच केळ्याची गाडी दिसली. दोन-चार लोक केळी विकत घेत होते. मग काय भुताने सरळ केळ्यांची एक फणी उचलली आणि एक एक केळे साल काढून खाऊ लागला. केळीवाला ते विचित्र दृश्य बघून चांगलाच घाबरला. कारण केळी हवेत तरंगत होती आणि साली खाली पडत होत्या. हे पाहून तो केळीवाला घाबरून गेला आणि गाडी सोडून पळत सुटला. आजूबाजूचे केळी घेणारेही घाबरून पळत सुटले. त्यांची घाबरगुंडी बघून भूत खदखदा हसत सुटले. भरपेट केळी खाऊन भूत पुढे निघाले. पुढे जाताच भुताला एक शाळा दिसली. तिथे परीक्षा सुरू होती. मग भूत एका वर्गात शिरले. त्याने सगळीकडे नजर फिरवली. सर्व मुले मान खाली घालून पेपर लिहीत होते. भुताला वाटले आपणही परीक्षा द्यावी. आपण भूत आहोत. आपल्याला कुठलीही गोष्ट कठीण नाही. मग त्याने सरांच्या टेबलवरची एक प्रश्न पत्रिका उचलली आणि ती वाचू लागला. पण भुताला काहीचकळेना. कारण तो होता गणिताचा पेपर!आपल्याला गणित काहीच कळत नाही, या विचारांनी भूत एकदम काळजीत पडले. ही माणसांची छोटी छोटी मुलं भरभर गणितं सोडवतात अन् आपल्याला येत नाही म्हणजे काय! मग भुताने गणिताची पन्नास पुस्तकं गोळा केली. अन् वाचताना कुणाचाही त्रास नको, गडबड गोंधळ नको म्हणून परत स्मशानात गेला. शांत-निवांत अभ्यास करण्यासाठी! त्यानंतर भूत परत कधीच माणसांना दिसलं नाही. कारण ते अजूनही गणित समजून घेत बसलं आहे!
Comments
Add Comment

शहराचा विकास, माणसांची कोंडी

- संवाद; निशा वर्तक शहर वाढत आहे. उंच इमारती उभ्या राहत आहेत. रस्ते रुंद होत आहेत. मेट्रो, पूल, मॉल्स आणि आधुनिक

हम होंगे कामयाब...

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे कालच देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन देशभर आणि जगातील सर्व भारतीय वकिलातीत साजरा

बहीण-भावाचे नाते आयुष्यभर जपले!

- स्मृतीपटल; अनिल रा. तोरणे रक्षाबंधन हा सण काळानुसार बदलला असला, तरी बहीण-भावाच्या प्रेमाचे आणि अतूट नात्याचे

श्रावण मास

-  निमित्त; संध्या काटदरे बालकवींनी श्रावण मासाचे सुंदर वर्णन केले आहे - ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे

आला श्रावण...

-प्रासंगिक; मंजिरी ढेरे श्रावणात प्रत्येकाच्या मनात निळा घन बरसत असतो. परंपरारक्षणाचा संदेश देणारा हा मास

मुलांनो, विचार बदला… भविष्य बदलेल !

- आनंदी पालकत्व; डॉ. स्वाती गानू मुलांनो, आयुष्यात बदल घडवायचा असेल, तर नेहमी परिस्थिती बदलण्यापासून सुरुवात