Saturday, June 20, 2026

‘ले के अपना भरम, चले आये...’’

‘ले के अपना भरम, चले आये...’’

नॉस्टॅल्जिया-श्रीनिवास बेलसरे पाकिस्तानी आणि आपल्या चित्रपटसृष्टीत कथानक, गाणी अनेकदा एकमेकांकडून ‘उचलली’, खरे तर चोरली जातात. तसे १९४७ पूर्वीचा समान सांस्कृतिक/भाषिक वारसा असलेल्या देशाच्या दोन कृत्रिम तुकड्यात होणारच ना!असे सांगीतिक चोरीचे एक उदाहरण अनेकांना माहीत असते. ‘कम सप्टेंबर’(१९६१) या सिनेमातील रॉक हडसनच्या जगप्रसिद्ध ट्यूनवर बेतलेले सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातले शैलेन्द्र यांचे ‘रिमझिम रिमझिम लो बरसे मोतीके दाने’ किंवा ‘राजा’(१९९५) मधले ‘नजरे मिली, दिला धडका, मेरी धडकनने कहा...’ या सुद्धा सरळसरळ चोऱ्याच होत्या की!असेच एक उदाहरण आहे शेखर कपूरच्या १९८३ साली गाजलेल्या ‘मासूम’चे. त्याच्या कथेशी बरेच साम्य असलेला पाकिस्तानी सिनेमा त्याच वर्षी आला होता ‘कभी अलाबिदा ना कहना’ या नावाने. सध्याही पाकिस्तान टीव्हीवर ‘मासूम’सारख्या कथानकाची एक सीरियल ‘मेरी जात जर्रा-ए-बेनिशान’ सुरू आहेच. पाकिस्तानच्या ‘कैदी’(१९६२) या सिनेमात संगीतकार रशीद अत्रे यांनी नूरजहांकडून गावून घेतलेले ‘फैज अहमद फैझ’ यांचे ‘मुझसे पहलीसी मुहब्बत मेरे मेहबूब ना मांग’ हे गाणे जबरदस्त गाजले. वा. रा. कांतांच्या ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’ किंवा तत्त्वज्ञ राजकवी भा. रा. तांबे यांनी लिहिलेल्या ‘मधु मागसी माझ्या सख्यापरी...’ या गाण्याचे केवढे साम्य आहे फैझसाहेबांच्या ओळींशी!गाणे सरळ ‘आहे तसे उचलून’ वापरायचा पराक्रमही हिंदीवाल्यांनी केलेला आहेच. पाकिस्तानी सिनेमा ‘नींद’(१९५९) मध्ये नूरजहांने रशीद अत्रेंच्या संगीत दिग्दर्शनात गायलेले गाणे महेश भट यांनी त्यांच्या १९९३ साली आलेल्या ‘फिर तेरी कहानी याद आई’मध्ये जसेच्या तसे उचलले होते. अन्नू मलिक यांनी ते साधना सरगम आणि कुमार सानू यांच्याकडून गावून घेतले. सुदैवाने गीतकाराचे ‘कतील शिफाई’ हे नाव तसेच ठेवले हे नशीब!एक व्यसनाधीन सिनेदिग्दर्शक (राहुल रॉय) एका पुनर्वसन केंद्रात दाखल होतो. तिथे त्याची सिझोफ्रेनियाग्रस्त पूजा भटशी भेट होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. मात्र मध्येच पूजाचा आजार बळावल्याने तिला मनोरुग्णांच्या इस्पितळात दाखल करतात. जेव्हा पूजाला अस्वस्थ वाटते, एकटेपणाची भीती वाटू लागते, कुणीतरी आपल्याला ठार मारणार असे भास होतात तेव्हा ती काळ-वेळेचे भान विसरून राहुलकडे धावत येत असते. काय करावे ते तिला सुचत नाही. थकलेली, घाबरलेली, पूजा राहुलकडे एकमेव आधार म्हणून बघत असते. राहुललाही तिचा विरह असह्य होतो, त्यात एक दिवस रेडिओवर बातमी येते की पूजाच्या इस्पितळाला मोठी आग लागली आणि त्यात सर्व रुग्णांचा मृत्यू झाला! म्हणजे पूजाचाही मृत्यू झाला असणार असे वाटून राहुल उद्ध्वस्त होतो! त्याला त्यांची पहिली भेट... तिचे लहान मुलाइतके निरागस वागणे... त्यातून वाढत गेलेल्या प्रेमातील एकेक प्रसंग... असे सर्व आठवत राहते.एक दिवस त्याला अचानक एक फोन येतो. पलीकडची व्यक्ती म्हणते, ‘राहुल, मी पूजा बोलते आहे. मी लवकरच तुला भेटायला येणार आहे.’ चौकशीनंतर कळते की इस्पितळाला आग पूजानेच लावली होती! इस्पितळात राहायचे नसल्याने तिने वेडेपणात ते पाऊल उचललेले होते! त्यातून केवढा अनर्थ घडला हे लक्षात आल्यावर पूजा पळून जाते आणि पोलिसांची नजर चुकवत जगत असते. राहुलला येणारे फोन तिचेच असतात! प्रेमात बुडालेला राहुल तिला वाचण्यासाठी तिला जाऊन भेटतो. लोकांची नजर चुकवत जंगलातून फिरताना ते पोलिसांना सापडतात. विमनस्क पूजा कळवळून सांगते, ‘कृपाकरून मला पुन्हा इस्पितळात परत नेऊ नका. मला राहुलबरोबर राहू द्या.’ पण तिचे कुणी ऐकत नाही. शेवटी ती इन्स्पेक्टरच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेऊन स्वत:ला गोळी मारते. अगतिक राहुलला तिचा मृत्यू बघावा लागतो. महेश भट यांच्या जबरदस्त दिग्दर्शनाने कथा प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेऊन गेली. पूजा भूमिका अक्षरश: जगली. तिला जेव्हा जेव्हा सिझोफ्रेनियाचा अॅटक येतो तेव्हा अत्यंत जीवघेणे भास होताना ती राहुलला म्हणते, ‘मी एखाद्या याचकासारखी तुझ्या दारावर आले आहे रे! तू काही आला नाहीस! मग मीच आधार शोधत तुझ्या दारावर आले आहे!’ ‘तेरे दरपर सनम, चले आये, तू ना आया तो हम, चले आये.’ यातले ‘तू ना आया तो हम, चले आये’ हे शब्द अस्वस्थ करून टाकतात. किती करुण, दयनीय अवस्था! तरीही जगण्याची केवढी अगतिक धडपड! पूजा मुळात एक भावुक, हळवी मुलगी. ती राहुलच्या प्रेमात अगदी बुडाली आहे. ज्या भयंकर रोगाने ती ग्रस्त आहे त्यातून आलेल्या वेदनादायी अनुभवांनी आयुष्याला विटली आहे. अशा स्थितीत तिला जीवलगाची साथ हाच एकमेव दिलासा वाटतो! जीवनात कोणतीच इच्छा शिल्लक राहिलेली नाही. कुठे जावे तेही समजत नाही, चालताना पावले अडखळतात तरीही ती कशीबशी राहुलच्या दारात पोहोचते - ‘बिन तेरे कोई आस भी ना रही, इतने तरसेके प्यास भी ना रही. लडखडाये कदम, चले आये.. तेरे दरपर सनम चले आये...’ मनोविकारात रुग्णाचे स्थळ-काळाचे भान जाते. त्यांना एकटेपणामुळे जीवघेणे भय वाटत राहाते. रात्र तर अक्षरश: खायला उठते. अशा असह्य भीतीचा(फोबिया) अॅटक येतो तेव्हा त्या रुग्णाला सगळी जाणीवच एखाद्या नागिणीसारखी डंख मारू लागते. ‘इससे पहले के हमपे हँसती रात, बनके नागिन जो हमको, डसती रात, लेके अपना भरम चले आये... तू ना आया तो हम चले आये...’ जेव्हा ती म्हणते, ‘लेके अपना भरम’ चले आये!’ तेव्हा ‘तुझे प्रेम मला लाभले आहे हा एक भ्रमच होता’ असे तिला राहुलला सांगायचे आहे की वास्तवाचे भान हरवून टाकणाऱ्या आजारामुळे होणारे वेगवेगळे विभ्रम आपल्याला सतावताहेत अशी शंका तिला येते आहे ही संदिग्धता तशीच राहते. ते कथेलाही पोषक ठरते. गाण्यात शेवटी पुन्हा पुन्हा त्या ओळी येत राहतात तेव्हा कथेशी समरस झालेल्या रसिकांचे डोळे पाणावतात. रात्री-अपरात्री एखाद्या मुलीला आपल्या प्रियकराला भेटायला, त्याच्या आसऱ्याला, एकट्याने जाणे किती अवघड आहे ते कतील शिफाईजी आपल्याला कसे दोन ओळीत अनुभवायला लावतात पाहा - ‘दिलको धड़का लगा था, पल पलका, शोर सुन ले ना कोई पायलका, फिर भी तेरी कसम, चले आये, तेरे दरपर सनम चले आये. ‘फिर तेरी कहानी याद आयी’ ज्यांनी पाहिला आहे त्यांना सिनेमाचे नाव सार्थ करत ती हळवी कहाणी पुन्हा पुन्हा आठवतच राहणार हे नक्की!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा