कालिया मर्दन

महाभारतातील मोतीकण-भालचंद्र ठोंबरे

भगवान श्रीकृष्ण बाल रूपात गोकुळात गोपगोपिकांसह सामान्य बालकाप्रमाणे खेळ खेळत असत. कधी राजहंसाप्रमाणे कूजन करणे, तर कधी मोराप्रमाणे नाचून आपल्या सवंगड्यांचे मनोरंजन करणे, कधी विविध पशुपक्ष्यांचे आवाज काढणे, तर कधी वाघ सिंहाच्या गर्जनेने घाबरल्यासारखे दाखवणे, तर कधी खेळून दमल्यासारखे करून एखाद्या गोपाळाच्या मांडीवर डोके ठेवून आराम करणे, तर कधी गोपगपिकांचे खेळ व कुस्त्या पाहून त्यांना प्रोत्साहित करीत असत. अशा प्रकारे योग मायेने आपले खरे स्वरूप लपवून ते सर्वसाधारण गोपगोपालांसारखे वर्तन करीत असत.

अशाप्रकारे वृंदावनात राहत असताना उन्हाळ्याच्या दिवसात बलराम घरीच असताना फक्त श्रीकृष्ण गोप गोपाळांसह यमुनेवर गाई चारावयास गेले. तहानलेल्या गाई व गोपालांनी त्या यमुनेचे पाणी पिले. मात्र ते तत्काळ मरण पावले. तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या मायेने त्यांना परत जिवंत केले.यमुनेतील त्या डोहात कालिया नावाचा एक भयंकर विषारी नाग आपल्या परिवारासह सहकुटुंब राहत होता. त्याच्या विषाने यमुनेचे पाणीही विषारी बनले होते. त्याच्या विषाच्या प्रभावाने नदीतील जलचर प्राणीच नव्हे तर सभोवतालच्या गवतावरही परिणाम झाल्याने गवत सुद्धा जळून गेले होते. त्या डोहावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शाने नदीवरून आकाशात उडणारे पशुपक्षी तसेच भोवतालच्या झाडावरील पशुपक्षीही मरून पडत असत.

पूर्वी एकदा गरुड व सापांच्या युद्धात गरुडाच्या पराक्रमाने भयभित झालेल्या सापांनी दर अमावस्येला ठरावीक झाडाखाली एक साप गरुडांसाठी भक्ष म्हणून देण्याचा नियम मान्य केला होता; परंतु कालिया आपल्या बळाच्या व जहरी विषाच्या बळाने घमेंडीत होता. तो गरुडासाठी बळी देण्याचे तर सोडाच पण त्याच्यासाठी ठेवलेला बळीही स्वतःच खात असे. यामुळे गरुडाला क्रोध येऊन त्याने कालियावर हल्ला केला. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. गरुडाच्या पंखाच्या माराने घायाळ होऊन कालिया अखेर यमुनेच्या या खोल डोहात येऊन राहू लागला.एके दिवशी तपस्वी सौरभी ऋषींनी मनाई केली असतानाही गरुडाने या डोहातून एका माशाला पकडून खाल्ले. त्यामुळे चिडलेल्या सौरभीने यापुढे जर गरुडाने या डोहातील कोणाला भक्ष्य केल्यास तो तत्काळ मरण पावेल असा शाप दिला. हे केवळ कालियालाच माहीत असल्याने तो सुरक्षिततेसाठी या डोहात येऊन राहू लागला होता.

कालियाच्या विषापासून व्रजवासी यांना मुक्त करण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णाने तीरावरील एका कदंब वृक्षावर चढून त्या डोहात उडी मारली. त्यामुळे नदीचे पाणी एवढ्या जोराने उसळले, की किनाऱ्यावरील वृक्ष सुद्धा त्या पाण्याने ओले चिंब झाले. विषारी पाण्याने ओले चिंब झाल्यामुळे त्यावरील पशुपक्ष्यांसह ते वृक्ष जळून गेले, कृष्णाने पाण्यावर जोराने दंड थोपाटले की, त्या प्रचंड आवाजाने कालिया आपल्या सहकुटुंब परिवारासह डोहाच्या तळातून वर आला. त्याचे डोळे लालभडक होते व मुखातून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. कालियाने कृष्णाला विळखा घातला. हे पाहून सर्व गोपगोपी रडत रडत व्रजभूमीकडे धावले. नंद वगैरेंनाही घरी अपशकुन होऊ लागले व कृष्ण घरी नसलेला पाहून त्यांना त्याच्या विषयीच्या शंकेने घेरले व तेही घराबाहेर पडले. रडत येत असणाऱ्या गोपगोपींची भेट झाली व ते सर्वजण डोहाकडे धावत सुटले.कालियाच्या विळख्यात निपचिप पडलेल्या कृष्णाला पाहून सर्वजण रडू लागले. तेव्हा सर्वज्ञानी बलरामने कृष्णाला “आता तुझा खेळ थांबव व सर्वांना चिंतामुक्त कर’’ असे सांगितले. बलरामाचे शब्द ऐकताच कृष्णाने स्वतःला कालियाच्या विळख्यातून सोडवले व उंच उडी मारून कालियाच्या फणावर उभे राहून व त्यावर नाचून त्याला पायाने तुडविण्यास सुरुवात केली. कालियाच्या सर्वच फणावर श्रीकृष्ण नाचून लताप्रहार करू लागले. त्यांच्या वजनाने व लत्ताप्रहारने कालिया गलीगात्र व कासावीस होऊन रक्त ओकू लागला. हे पाहून त्याच्या पत्नीने श्रीकृष्णाला आपल्या पतीला अभयदान देण्याची विनंती केली. कालियासुद्धा दीनपणे हात जोडून प्रभूची स्तुती करून म्हणाला, “हे विश्वविधात्या तुझ्याच कृपेने हे जग चालते व तुझ्याच कृपेने व इच्छेप्रमाणे व देणगीनेच सर्वांचे स्वभाव बनले आहेत. माझे क्रौर्य व क्रोध ही सुद्धा तुझीच देणगी आहे. तेव्हा आता यापुढे मी काय करावे त्याची आज्ञा करावी.तेव्हा कृष्णाने त्याला आपल्या सर्व परिवारासह नदीतून महासागरात जाण्यास सांगितले. तसेच तुझ्या डोक्यावर माझ्या पावलाचे ठसे असल्याने तुला गरुडापासून भीती राहणार नाही असेही सांगितले. हे ऐकून व श्रीकृष्णाला नमन करून कालिया आपल्या पूर्ण परिवारासह महासागराच्या दिशेने निघून गेला.

Comments
Add Comment

योगायोग काय असतो पहा!

स्मृतीपटल-अनिल रा. तोरणे यशस्वी पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो, असे अनेकदा बोलले जाते; परंतु

कृतघ्नता

मनस्विनी-पूर्णिमा शिंदे केलेल्या उपकारांची जाण न ठेवणे म्हणजे कृतघ्नता! उपकाराची फेड अपकाराने!! उपकार

२०,००,००० पुस्तकांचा संग्राहक-पद्मश्री अंके गौडा

संस्कृती-वसंत भोसले के.अनंतारामू या गुरुवर्याने उपदेश दिला होता की, “आयुष्यात कोणाकडूनही लाच स्वीकारू नका,

जगाला दिलेली चिरंतन दीक्षा

खास बात-डॉ. रामदास आव्हाड https://prahaar.in/2026/06/20/big-opportunity-construction-costs-technical-criteria-and-the-planning-master-plan/ २१ जून रोजी साजरा केला जाणारा

बाबा हा बाबाच असतो !

संवाद- निशा वर्तक जबाबदार बाप होणं सोपं नसतं...बाप कळायला बाप व्हावं लागतं...पण मी बघितलंय आणि अनुभवलंय बापाला,

‘ले के अपना भरम, चले आये...’’

नॉस्टॅल्जिया-श्रीनिवास बेलसरे पाकिस्तानी आणि आपल्या चित्रपटसृष्टीत कथानक, गाणी अनेकदा एकमेकांकडून ‘उचलली’,