Friday, June 19, 2026

Swiss Bank : स्विस बँकांमधील भारतीयांचा निधी घटला, वैयक्तिक खात्यांतील ठेवींमध्ये वाढ

Swiss Bank : स्विस बँकांमधील भारतीयांचा निधी घटला, वैयक्तिक खात्यांतील ठेवींमध्ये वाढ

नवी दिल्ली : स्विस बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या कथित काळ्या धनाबाबत सातत्याने चर्चा होत असताना, स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने (एसएनबी) जाहीर केलेल्या २०२५ च्या वार्षिक आकडेवारीत वेगळे चित्र समोर आले आहे. या आकडेवारीनुसार, स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिक, कंपन्या आणि वित्तीय संस्थांचा एकूण निधी २०२५ मध्ये ८ टक्क्यांहून अधिक घटून ३.२५ अब्ज स्विस फ्रँक (सुमारे ३६ हजार ७९३ कोटी रुपये) इतका राहिला आहे. मात्र, या घसरणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय ग्राहकांच्या वैयक्तिक बँक खात्यांमधील (कस्टमर डिपॉझिट) ठेवींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या ठेवी ५० टक्क्यांहून अधिक वाढून ५२४ दशलक्ष स्विस फ्रँक (सुमारे ६ हजार कोटी रुपये) इतक्या झाल्या आहेत. त्यामुळे संस्थात्मक गुंतवणूक कमी झाली असली, तरी वैयक्तिक ठेवींची वाढ लक्षणीय ठरली आहे.

एसएनबीच्या आकडेवारीनुसार, वित्तीय संस्थांमार्फत ठेवण्यात आलेल्या निधीत सर्वाधिक घट झाली आहे. या श्रेणीतील रक्कम १५ टक्क्यांनी घटून २.६ अब्ज स्विस फ्रँक इतकी राहिली. त्यामुळे स्विस बँकांमधील भारतीयांच्या एकूण निध्यात घट झाल्याचे दिसून येते. याउलट, ग्राहकांच्या थेट बँक खात्यांमधील ठेवींची वाढ ही वैध आर्थिक व्यवहार आणि पारदर्शक बँकिंग पद्धतीकडे वाढलेल्या कलाचे संकेत मानले जात आहेत. २०२५ मध्ये या खात्यांतील ठेवी सुमारे २० टक्क्यांनी वाढून ८९.७३ दशलक्ष डॉलर (सुमारे ७८० कोटी रुपये) झाल्याचीही नोंद आहे.

स्विस अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, स्विस बँकांमध्ये जमा असलेली प्रत्येक भारतीयांची रक्कम ही काळा पैसा असल्याचे मानता येत नाही. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात २०१८ पासून 'ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन' (AEOI) करार लागू आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देश संशयास्पद खात्यांची माहिती दरवर्षी एकमेकांशी शेअर करतात. त्यामुळे करचुकवेगिरी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण ठेवले जात आहे. स्विस बँकांमध्ये परदेशी ग्राहकांच्या निधीच्या बाबतीत ब्रिटन प्रथम, तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने यंदा दोन स्थानांची सुधारणा करत ४६वे स्थान मिळवले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा