Thursday, June 18, 2026

Monsoon Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; कोकणात पावसाचा जोर वाढणार

Monsoon Update :  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; कोकणात पावसाचा जोर वाढणार

मुंबई : देशभरात आणि महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाल्यानंतर अचानक थबकलेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी आता पुन्हा एकदा अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या तीन दिवसांत मान्सून वाऱ्यांचा वेग वाढणार असून, २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढेल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. या बदलामुळे गेले काही दिवस उन्हाचा आणि उकाड्याचा तडाखा सहन करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने ६ जून रोजी तळकोकणात धडक दिली होती. त्यानंतर ८ जूनपर्यंत त्याने हर्णे आणि सोलापूरपर्यंत मजल मारली. मात्र, पुढील वाटचालीस पोषक वातावरण नसल्यामुळे मान्सूनची उत्तर सीमा गेल्या अनेक दिवसांपासून एकाच जागेवर स्थिर आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने मोठी ओढ दिली असून, कोकण आणि गोव्यात १ ते १७ जून दरम्यान सरासरीच्या तुलनेत तब्बल ८१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पुढील काही दिवस या भागात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता असून, २४ जूननंतरच पावसाचा जोर वाढेल. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये २१ जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. मात्र, सिंधुदुर्ग वगळता इतर भागात १९ जूनपर्यंत उष्ण आणि दमट वातावरण कायम राहील. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांत पुढील चार ते पाच दिवसांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत मान्सून वारे आता वेग घेत आहेत. १८ जूनपासून उत्तर-पश्चिम भारताच्या दिशेने वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या राज्यांना मिळणार दिलासा पुढील ४ ते ५ दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांत नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. तसेच उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्येही ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, ज्यामुळे तेथील तापमानात घट होऊन तीव्र उष्णतेपासून नागरिकांची सुटका होईल. देशभरात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकरी चिंतेत होते; मात्र आता हवामान प्रणाली पुन्हा सक्रिय झाल्याने पेरण्यांच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा