Wednesday, July 8, 2026

Nashik : पश्चिम नाशिकच्या वाहतुकीला नवी झेप; अशोक स्तंभ ते गंगापूर रोड विकासकामांना वेग

Nashik : पश्चिम नाशिकच्या वाहतुकीला नवी झेप; अशोक स्तंभ ते गंगापूर रोड विकासकामांना वेग

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर आणि शहराच्या पायाभूत सुविधांना आधुनिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेकडून महत्त्वाच्या रस्त्यांचे रूपांतर वेगाने सुरू आहे. त्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या अशोक स्तंभ–जेहान सर्कल–गंगापूर गाव या मार्गावरील विकासकामांनी आता गती घेतली असून, पश्चिम नाशिकच्या वाहतुकीला नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या गंगापूर रोडचा सुमारे ३.१९ किलोमीटर लांबीचा रस्ता आधुनिक सुविधांसह विकसित केला जात आहे. केवळ रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणच नव्हे, तर विविध भूमिगत युटिलिटी सुविधांची कामेही मोठ्या प्रमाणावर पूर्णत्वास पोहोचली आहेत.

अमृत योजनेअंतर्गत १,६७८ मीटर लांबीची सांडपाणी वाहिनी शंभर टक्के पूर्ण झाली आहे. तसेच अमृत डीपीआर-२ अंतर्गत २८० मीटर सांडपाणी वाहिनीचे कामही पूर्णत्वास गेले आहे. महानगरपालिका बाँड प्रकल्पांतर्गत प्रस्तावित एमएनजीएल गॅस पाइपलाइनची १,३२० मीटर लांबीची कामे पूर्ण झाली असून, ऑप्टिकल फायबर केबल (OFC) आणि विद्यमान विद्युत पायाभूत सुविधांचे ३,०४३ मीटरपर्यंतचे कामही यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.

याशिवाय, ३,५७२ मीटर लांबीच्या पावसाळी पाणी निचरा वाहिनीचे (स्टॉर्म वॉटर ड्रेन) काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर गंगापूर रोडवरील वाहतूक अधिक सुरळीत, सुरक्षित आणि गतिमान होणार असून नागरिकांना आधुनिक नागरी सुविधांचा लाभ मिळणार आहे.

पूर्ण झालेली प्रमुख कामे

अमृत योजनेअंतर्गत सांडपाणी वाहिनी – १,६७८ मीटर (१०० टक्के पूर्ण)

अमृत डीपीआर-२ सांडपाणी वाहिनी – २८० मीटर (१०० टक्के पूर्ण)

एमएनजीएल गॅस पाइपलाइन – १,३२० मीटर (१०० टक्के पूर्ण)

ऑप्टिकल फायबर केबल व विद्युत पायाभूत सुविधा – ३,०४३ मीटर (१०० टक्के पूर्ण)

स्टॉर्म वॉटर ड्रेन – ३,५७२ मीटर (काम प्रगतीपथावर)

"रस्ते आणि पूरक सुविधांची कामे पूर्ण झाल्यानंतर गंगापूर रोडवरील वाहतूक अधिक सुकर होईल. तसेच नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध होतील." मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा