Monday, June 15, 2026

Navnath Ban: "संजय राऊतांनी ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन गिधाड करावे" – नवनाथ बन यांचा हल्लाबोल

Navnath Ban:
मुंबई, 15 जून : भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका करत "ऑपरेशन टायगर" ऐवजी "ऑपरेशन गिधाड" करण्याचा सल्ला दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. संजय राऊत यांची प्रवृत्ती गिधाडासारखी असून ते नेहमी इतरांच्या अपयशावर आणि अडचणींवर राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचेच "ऑपरेशन गिधाड" महाराष्ट्रातील जनतेने केले असून त्यांना राजकीयदृष्ट्या मरणासन्न अवस्थेत आणले आहे, असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा कारभार फेसबुक लाईव्ह आणि आभासी माध्यमांतून चालवला गेला, असा आरोप करत बन यांनी सांगितले की, आता त्यांच्याच पक्षातील खासदार व्हर्च्युअल पद्धतीने बैठकींना उपस्थित राहून पक्ष नेतृत्वाला ठेंगा दाखवत आहेत. भविष्यात जनताही त्यांना "व्हर्च्युअली मतदान" करून घरी बसवेल, असेही ते म्हणाले.

मोहन भागवत यांच्या वक्तव्याचे समर्थन

मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या भारत-पाकिस्तान संबंधांबाबतच्या वक्तव्याचे समर्थन करत बन यांनी सांगितले की, शेजारी राष्ट्रांशी चर्चेतून प्रश्न सोडवणे आवश्यक असते. या भूमिकेवर संजय राऊत यांनी केलेली टीका ही मूर्खपणाची असल्याचे ते म्हणाले. संजय राऊत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेत असल्याचा आरोप करत त्यांनी "ऑपरेशन सिंदूर" संदर्भातील पुरावे मागण्याच्या भूमिकेवरही टीका केली. देशातील जनता भाजपासोबत असून पाकिस्तानविरोधी भूमिका घेते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

"शंभर जन्म घेतले तरी भाजपाचा एक नगरसेवकही फुटणार नाही"

नवनाथ बन यांनी पुढे दावा केला की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपाला फोडण्यासाठी विविध प्रयत्न झाले. मात्र भाजपाचे कार्यकर्ते, आमदार आणि खासदार हे राष्ट्र प्रथम या विचारसरणीवर काम करतात. त्यामुळे संजय राऊत यांनी शंभर वेळा जन्म घेतला तरी भाजपाचा एक नगरसेवकही फुटणार नाही, असा दावा त्यांनी केला. भाजपा हा विचारांवर चालणारा पक्ष असून त्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू रामचंद्र यांच्या विचारांतून मिळते, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका सोडून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची टीकाही केली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >