Monday, June 15, 2026

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

समाधि साधन संजीवन नाम। शांति दया सम सर्वांभूतीं॥१॥ शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू। हरिनाम उच्चारू दिधला तेणें॥२॥ शम-दम-कळा, विज्ञान-सज्ञान। परतोनि अज्ञान न ये घरा॥३॥ ज्ञानदेवा सिद्धी-साधन अवीट। भक्ति-मार्ग नीट हरिपंथीं॥४॥

संत ज्ञानेश्वर या अभंगात म्हणतात, हरिनाम हे समाधीचे साधन आहे. संजीवन देणारे आहे, मन हरिनामाच्या रंगात रंगले की सर्वांप्रती शांती, दया या भावना मनात उमटतात. निवृत्तीरायांनी मनात शांततेची पेरणी केली आहे. ही शांतीचीही शांती आहे, म्हणजे शांतीचा खोल गाभा आहे.

निवृत्तीरायांनी शांतीबरोबर एक मंत्र दिला. हा आहे हरिनामाचा मंत्र. या मंत्राचा उच्चार केला की सारे अमंगल नाहीसे होते. या नामात मोठे सामर्थ्य आहे. त्यात ज्ञान, विज्ञान सामावलेले आहे. नामाचे अमृत लाभले की आपण ज्ञानवंत होतो, सज्ञान होतो. मग अज्ञानाचा काळोख कुठल्याही प्रकारे आपल्या घरी येत नाही. नामाचे हे साधन अवीट आहे. परमेश्र्वराची प्राप्ती साध्य करणारे आहे. या वाटेने वाटचाल केली तर हा हरिपंथ म्हणजे हरिभक्तीचा मार्ग सहजपणे आपल्याला गवसतो." संत ज्ञानेश्र्वरांनी या अभंगात नामाचे माहात्म्य वर्णन केले आहे. हरिनाम हे संजीवनी देणारे म्हणजे चैतन्याचा अनुभव देणारे आहे. परम शांतीची खोल अनुभूती देणारे आहे. "हरि" या नामाचा उच्चार म्हणजे एक मंत्र आहे. या मंत्राची शक्ती अपार आहे.

आपल्या हरिपाठाच्या अभंगातही ज्ञानदेवांनी नामाची महती वर्णन केली आहे. मुखाने हरि हरि म्हणा असे सांगताना त्यांनी हरिनामाचे सामर्थ्यही सांगितले आहे. ते म्हणतात, हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी ॥ हरिनामाचा महिमा अनेक संतांनी वर्णन केला आहे. संत नामदेव म्हणतात, नामाचा महिमा नेणेचि पै ब्रम्हा। म्हणोनिया कर्मा अनुसरला ॥ (हरिनामाचा महिमा प्रत्यक्ष सृष्ठी रचणणाऱ्या ब्रम्हालाही आकळला नाही. यामुळे तो जो एकदा निर्मतीच्याদীপ্য चक्रात अडकला तो अजूनही बाहेर पडू शकला नाही.) संत ज्ञानेश्वरांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. नाम हे समाधी आणि सिद्धी यांचे अवीट, संजीवक साधन आहे. मनाला परम शांती देणारे आहे. हे तत्त्व संत ज्ञानेश्र्वरांनी विशद केले आहे.

__- डॉ. देवीदास पोटे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा