Saturday, June 20, 2026

संत निवृत्तीनाथ

संत निवृत्तीनाथ

अनुभवाच्या गावी ज्ञान हैंचि फळ अनुभवाच्या गावी ज्ञान हैंचि फळ। विज्ञान केवळ वृक्ष तया।। साधनी स्वानुभव अनुभवी अनुभव । ब्रम्हाची राणिव आम्हा घरी ।। रिकामा बरळू नसे खेळेमेळे । ब्रम्हचि कल्लोळे भोगीतसे ।। निवृत्ती सरळ निरसले अज्ञान । सर्वत्र संपन्न आत्माराम ।।

संत निवृत्तीनाथ हे योगी होते. साधनेच्या विषयात रमणारे नाथ परंपरेतील एक सिद्धपुरुष होते. साधनेचा मार्ग गूढ आणि गहन अनुभवाचा नि अनुभूतीचा. साधनेद्वारा समाधीचा अनुभव आला की अंतरंग ज्ञानसंपन्न होते. परमशांतीचा आंतरिक अनुभव येतो. योगी पुरुष या शांतीच्या अवस्थेत, आनंदलहरीत तासनतास विहरत असतो. संत निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे थोरले बंधू, ज्ञानदेवांचे मार्गदर्शक आणि गुरू ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीचे निरूपण केले तेव्हा निवृत्तीनाथांनी या निरूपणाचे साक्षीभावाने श्रवण केले. त्याचे परीक्षण केले आणि योग्य ठिकाणी मार्गदर्शन केले. ‘ज्ञान’ आयुष्यातील शक्ती आहे. या ज्ञानमार्गाद्वारे त्यांनी ज्ञानेश्वर घडविले आणि ‘ज्ञानेश्वरी’ या अलौकिक ग्रंथाचे सृजन घडवून आणले. या अभंगात निवृत्तीनाथ म्हणतात, ‘‘अध्यात्मात साधना हा अनुभवाचा प्रांत आहे.

साधनेची अंतिम परिणती म्हणजे ज्ञान. ज्ञान हे विज्ञानाच्या वृक्षावर उमलते. खरंतर ज्ञान हे विज्ञानरूपी वृक्षावरचं मधूर असं फळ आहे. साधनावस्थेत ‘स्व’चा अनुभव येतो. हा ‘स्व’ व्यापक होऊन विश्वात्मक परम शक्तीशी एकरूप होतो. पर्यायाने साधना करणाराही विश्वात्मक होतो. अनुभव आणि अनुभव घेणारा वेगळे उरतच नाहीत. दोघांमधले द्वैत संपून जाते. रोमरोमी विश्वचैतन्याचा गूढ, निळा प्रवाह दाटून येतो. निवृत्तीनाथ पुढे म्हणतात, ‘‘साधनेतला ‘स्व’चा अनुभव विशाल अनुभवाशी समरस होतो. ब्रम्हतत्वाच्या जाणिवांच्या लहरी घरात विलसतात. हे काही रिकामपणातले बाष्कळ बोलणे नाही, तर विश्वात्मक आनंदाचे कल्लोळ आम्ही अनुभवतो आहोत. आमचे अवघे अस्तित्व गुरूंच्या कृपेने ब्रम्हमय झाले आहे. या एकांततेचा अनुभव आम्ही प्रत्यक्षपणे घेत आहोत. ’’ ‘सतारीचे बोल’ या कवितेत या अनुभवाचे वर्णन करताना केशवसुत म्हणतात, ‘‘तो मज गमले विभूती माझी। स्फुरत पसरली विश्वामाजी।। ’’ गुरूंच्या आशीर्वादाने मन स्थिर झाले. अज्ञानाच्या अंधकाराचा पूर्ण विलय झाला. सर्व चराचरांत चैतन्यरूपी आत्माराम भरून राहिला आहे. याची अनुभूती आली. साधनेचा गूढ, तरळ अनुभव निवृत्तीनाथांनी सुगम भाषेत उलघडून दाखविला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा