दुर्घटनेचे गूढ कायम

बोईंगचे फ्लाइट १७१ सुमारे २६० प्रवाशांना घेऊन आकाशात झेपावले; मात्र काही क्षणांतच ते कोसळले. या भीषण दुर्घटनेत केवळ एकच प्रवासी बचावला, ही बाब अनेकांच्या दृष्टीने चमत्कारापेक्षा कमी नव्हती. सामान्यतः विमान अपघातांच्या चौकशीचा अंतिम अहवाल एका वर्षाच्या आत सादर करण्याची प्रथा असते. मात्र या दुर्घटनेच्या संदर्भात अद्याप अंतिम अहवाल प्रसिद्ध झालेला नाही.


 १२ जून २०२५ हा दिवस आठवला की त्या दिवशी घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेची आठवण आजही अंगावर शहारे आणते. अहमदाबादहून लंडनकडे निघालेले हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच कोसळले आणि २६० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमान एका महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या (हॉस्टेलच्या) इमारतीवर कोसळल्याने काही विद्यार्थीही जखमी झाले. ही दुर्घटना अत्यंत भीषण होतीच, परंतु भारताच्या नागरी विमानवाहतूक इतिहासातील सर्वांत गंभीर दुर्घटनांपैकी एक म्हणून तिची नोंद झाली. विशेषतः विमानाच्या इंजिनात नेमका कोणता बिघाड झाला होता, याबाबतही अधिकृत आणि स्पष्ट माहिती समोर आली नाही. अहवाल प्रसिद्ध होण्यास होत असलेल्या विलंबामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. त्यामुळे चौकशी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता राखून शक्य तितक्या लवकर अंतिम निष्कर्ष जाहीर करणे आवश्यक आहे. अन्यथा, या दुर्घटनेबाबत दिसते त्यापेक्षा अधिक काही दडवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जाणे स्वाभाविक ठरू शकते.



इतका मोठा अपघात यापूर्वी कधीच झाला नव्हता असे नाही; मात्र या अपघाताचे गांभीर्य क्रू सदस्यांना आणि विमान कंपनीच्या प्रशासनाला पुरेसे जाणवले नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. विमानात संपूर्ण पॉवर लॉस झाला असावा, अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु तसे असेल, तर विमानामध्ये अशा प्रकारची यंत्रणा असते की संपूर्ण वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. वैमानिकांच्या संघटनांचे मत असे आहे की अंतरीम अहवाल सादर झाल्यानंतरही अंतिम अहवाल येण्यास होत असलेला विलंब अनेक शंकांना आणि तर्कवितर्कांना जन्म देत आहे. बोईंग कंपनीच्या विश्वासार्हतेवर आणि अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. कदाचित याच कारणामुळे एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही अंतिम अहवाल प्रसिद्ध करण्यात दिरंगाई होत असावी किंवा ती जाणीवपूर्वक केली जात असावी, अशी शंका काही जण व्यक्त करतात.



यापूर्वीही भारतात अनेक विमान दुर्घटना घडल्या आहेत; ही काही पहिलीच घटना नाही. त्या दुर्घटनांबाबतचे चौकशी अहवाल तुलनेने लवकर प्रसिद्ध झाले होते. मात्र अहमदाबाद–लंडन मार्गावरील फ्लाइट १७१च्या अपघाताच्या चौकशीचा अंतिम अहवाल अद्यापही प्रसिद्ध झालेला नाही. त्यास इतका विलंब का होत आहे, हा निश्चितच सार्वजनिक चर्चेचा आणि चिंतनाचा विषय आहे.कारण या अपघाताच्या चौकशीत बोईंग या जगातील सर्वात मोठ्या विमान उत्पादक कंपनीचे भवितव्य दडलेले आहे. तसेच या क्षेत्रातील अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या प्रतिष्ठा आणि अस्तित्वाचाही हा प्रश्न आहे. जर अंतिम अहवाल समोर आला, तर अनेकांचे हितसंबंध धोक्यात येऊ शकतात आणि अनेकांना अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण होऊ शकतात. २०११ पासून सेवेत असलेल्या ड्रीमलाईनर विमानाचा हा पहिलाच मोठा अपघात होता. त्याआधी या विमानाचा सुरक्षा रेकॉर्ड जवळपास निर्दोष मानला जात होता. त्यामुळे अपघाताला एक वर्ष उलटून गेल्यानंतरही सत्य अजून पूर्णपणे समोर का आले नाही, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैमानिकांमधील कथित संभाषण. इंधन नियंत्रण स्विचेस (फ्युएल स्विचेस) संदर्भात जे काही बोलले गेले असल्याचा दावा केला जातो, त्याबाबत कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधील संभाषणाचा स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख उपलब्ध माहितीमध्ये दिसत नाही. त्यामुळे अनेक शंका कायम आहेत.



याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या अपघातासाठी वैमानिकांची चूक होती का? या प्रश्नाचे ठोस आणि निर्विवाद उत्तर अद्याप समोर आले नाही. मुळात विमान अपघात चौकशी व्यवस्थेचा उद्देश दोषारोप करणे नसून, अपघाताची खरी कारणे शोधणे आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवणे हा आहे. परंतु जर एखादी विमान कंपनी स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे चौकशी अहवाल प्रसिद्ध होण्यास अडथळा आणत असेल, तर ती अत्यंत गंभीर बाब मानली पाहिजे.



दुर्घटनेतील बळी गेलेल्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अपघाताचा कठोर, निष्पक्ष आणि पूर्णपणे पारदर्शक चौकशी अहवाल सार्वजनिक होणे काळाची गरज आहे. या प्रकरणात चार कुटुंबांनी कंपनीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या. तर वैमानिक संघटनांनीही न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली. अपघात चौकशी संस्थाने अंतिम अहवाल चौकशी पूर्ण झाल्यानंतरच प्रसिद्ध केला जाईल, असे स्पष्ट केले. नागरी उड्डयन मंत्र्यांनीही चौकशी सुरू असल्याचे सांगितले. मात्र, या सर्व घडामोडींमुळे काही माहिती दडपली जात आहे का, अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. १७१ जणांचा बळी घेणारा हा अपघात नेमका कसा घडला, हे समजून घेणे केवळ जबाबदार व्यक्ती किंवा संस्थांची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाचे नाही, तर भविष्यातील विमान सुरक्षा आणि संपूर्ण विमानवाहतूक क्षेत्राच्या प्रगतीसाठीही अत्यंत आवश्यक आहे. या अपघाताच्या कारणांबाबत सध्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा म्हणजे इंजिन कटऑफ वैमानिकांच्या कृतीमुळे झाला की तो तांत्रिक बिघाडाचा परिणाम होता. चौकशी प्रामुख्याने याच प्रश्नाभोवती फिरताना दिसते.



यापूर्वी बोईंग ड्रीमलाइनरच्या विद्युत व्यवस्थेबाबत अनेक तज्ज्ञांनी सुरक्षेसंदर्भात इशारे दिले होते. त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले का, याचाही सखोल तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे कंपनीच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळकटी मिळेल. भारत आज जगातील सर्वात मोठ्या विमानबाजारांपैकी एक बनला आहे. देशात हवाई प्रवासाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दरवर्षी सुमारे ३७६ दशलक्ष प्रवासी विमानप्रवास करतात, त्यापैकी ३०० ते ३०५ दशलक्ष प्रवासी देशांतर्गत प्रवास करणारे असतात. ‘उडान’सारख्या योजनांमुळे हवाई सेवा अधिक व्यापक होत असताना भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात इतक्या गंभीर अपघाताचा अंतिम चौकशी अहवाल दीर्घकाळ प्रलंबित राहणे हे प्रगतिशील देशाला निश्चितच शोभणारे नाही.

Comments
Add Comment

बेस्ट-एसटी संघर्ष गडद

मुंबई आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आर्थिक व प्रशासकीय तणावाखाली आहे. दोन्ही संस्थांमध्ये

सिंधुदुर्ग जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने

कोकण ही केवळ भौगोलिक ओळख नाही, तर निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम आहे. समुद्रकिनारे, किल्ले,

सामूहिक शेती गरजेची

ग्रामीण भागातील वाढते स्थलांतर, शेतीकडे होणारे दुर्लक्ष आणि ओसाड पडणाऱ्या सुपीक जमिनी ही चिंतेची बाब बनली आहे.

विदर्भात महायुतीचीच आघाडी

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील १७ जागांसाठी निवडणूक

कोणाला घाई आहे?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली

भारताचे नवे स्टील धोरण

रेल्वेपासून महामार्ग, बंदरे, मेट्रो, संरक्षण, ऊर्जा आणि गृहनिर्माणापर्यंत सर्वच पायाभूत क्षेत्रांचा पाया