Saturday, June 13, 2026

मोबाईल बंद... आयुष्य बंद?

मोबाईल बंद... आयुष्य बंद?

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ

संध्याकाळचे ६ वाजले होते. चहाचा कप डायनिंग टेबलावर ठेवून हातात मोबाईल घेतला. तीनही कामं डोक्यात होतीच. सोसायटीचे बिल भरायचे होते. म्हणजे ज्या दिवशी बिल येते त्या दिवशी भरले की बरे असते त्यानंतर मात्र लक्षात राहत नाही. दुसरे काम म्हणजे अमोलची प्रस्तावना लिहून तयार होती, फक्त एकदा डोळ्यांखालून घालून ती त्याला पाठवायची होती कारण दहा दिवसांत त्याचे पुस्तक येणार आहे, हे माझ्या मनावर कालपासून तीनदा प्रकाशकाने बिंबवले होते आणि तिसरे काम म्हणजे रविवारी म्हात्रे यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला जायचे होते व त्यांची पीडीएफ त्यांनी व्हाॅट्सअॅपवर पाठवलेली होती ती फक्त एकदा उघडून वाचून छोटेखानी भाषण तयार करायचे होते. सवयीप्रमाणे तिन्ही गोष्टी नीट आठवल्या आणि काम करायला सुरुवात करायच्या दृष्टीने उजव्या हाताच्या अंगठ्याने मोबाईलचे पॉवर बटण दाबले. ते दाबल्यावर स्क्रीनवर प्रकाश पडतो तसा प्रकाशच पडेना आणि लक्षात आलं की बटण दबत नाहीये, मी फक्त दाबायचा प्रयत्न करतीये. मग मी व्हॉल्यूमचे बटण दाबून पाहिले. काहीच फरक पडला नाही. आता करायचे तरी काय? मोबाईल चालूच होत नव्हता. बरं एकच मोबाईल त्यामुळे काय करायचे या प्रश्नाने मी हैराण झाले. चहाच्या कपाकडे पाहिले तर चहा गारढोण झाला होता. स्वतःवरच चिडले, उठले. कपातला चहा पातेल्यात टाकला आणि गॅस चालू केला. परत मोबाईलची बटणं दाबत बसले. सहज लक्षात आले की आपण लॅपटॉप चालू करून गुगलला काही प्रश्न विचारू शकतो का, बघूया काही उत्तर सापडतंय का? स्वतःवरच खूश झाले. लॅपटॉपची बॅटरी नेहमीप्रमाणे पूर्ण उतरलेली होती. मग परत ते चार्जिंगला लावले. इतक्यात मुलीने घरात प्रवेश केला, मला म्हणाली, “कसला जळका वास येतोय?” तिचा प्रश्न माझ्या डोक्यावरून गेला. मी तिला घाईघाईत म्हटले, “अगं माझा मोबाईल बंद आहे...!”

“मग काय आभाळ कोसळलंय का?” असं म्हणत ती सरळ स्वयंपाकघरात शिरली. “आई, तुझं नेहमीचच. सगळा चहा जळून गेलाय. एवढा धूर झालाय स्वयंपाकघरात. ना तुला धूर दिसतोय... ना जळका वास येतोय काय म्हणावं तरी काय?” असं म्हणत तिने गॅस बंद केला आणि चहाचे पातेले बेसिनमध्ये टाकून नळ सुरू केला. त्या कडकडीत जळक्या पातेल्यात पाणी पडताक्षणी वरपर्यंत उठलेला धूर आणि चरचर आवाज ऐकून छातीत चर्र झाले. फोन ताबडतोब दुकानात घेऊन जाण्याचा सल्ला देऊन मुलगी तिच्या रूमकडे गेली आणि दार लावल्याचा आवाज. चहाचे पातेले स्वच्छ करण्यात पंथरा-वीस मिनिटं गेली. तोपर्यंत लॅपटॉप थोडासा चार्ज झाला होता. त्याचे बटण चालू केले आणि गुगलला प्रश्न केला. गुगल आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी जणू हात जोडून उभा असतो. त्याने अनेक पर्याय दिले. पहिला पर्याय एकाच वेळेस लॅपटॉपला चार्जर जोडता जोडता व्हॉल्युमचे बटण वरच्या बाजूला दाबून ठेवायचे. थोडासा प्रयत्न केल्यावर अचानक मोबाईलमध्ये प्रकाश पडला की, गुगलला ‘थँक्स” म्हटले. इंग्रजी भाषेत काही लिहिलेले होते. ज्याचा अर्थबोध होत नव्हता तसेच कोड भाषेत काहीतरी स्क्रीनवर दिसत होते. त्यानंतर अनेक प्रयत्नांनी ती स्क्रीन तशीच राहिली. रात्रीचे ९.३० वाजले. मी... मोबाईल... आणि मोबाईल... मी... दुसरे काही सुचत नव्हते.

शेवटी मुलीला बहुधा दया आली. तिनेही थोडे फार प्रयत्न केले, पण काहीच झाले नाही. मग म्हणाली, “उद्या तू दुकानात जा. सरळ नवीन मोबाईल घेऊन टाक.” रात्री झोपायला गेले पण रात्रभर झोप आली नाही. सकाळी १०.३० वाजता मोबाईलच्या दुकानांमध्ये पोहोचले. दुकानदाराने हसून स्वागत केले कारण मी त्याची पहिलीच गिऱ्हाईक होते. सासूबाई होत्या तेव्हा ते सांगायच्या की, शनिवारी काही विकत घ्यायचे नाही. पण मोबाईल बंद पडून बारा तास उलटून गेले होते. आणखी चोवीस तास उलटून जाऊ द्यावे इतकी सहनशीलता माझ्यात नव्हती. शिवाय दुसऱ्या दिवशी रविवारी ९ वाजता मला पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पोहोचायचे होते! दुकानदार म्हणाला, “पॉवर बटन बंदच झाले आहे. त्यामुळे नवीन मोबाईल घेऊन त्याच्यामध्ये संपूर्ण डेटा टाकता येणार नाही. हा मोबाईल आधी चालू करावा लागेल, मगच डेटा नवीन मोबाईलमध्ये जाऊ शकतो!” नवीन मोबाईल कोणता घ्यायचा हे ठरवलेच नव्हते आणि मग वेळेवर तो जे म्हणेल ते ऐकत नवीन मोबाईल घ्यायचे ठरवले. बरं तो दुकानदार म्हणाला की, तुम्ही आता नवीन मोबाईल घेत असाल तरच जुना मोबाईल मी आपल्या कामापुरता चालू करू शकतो!

कालपासून मनात असलेल्या असंख्य शंका-कुशंका. कोणी हॅक तर नसेल केला मोबाईल? आपण इतकी बटणं दाबली तर मोबाईलमध्ये असलेला डेटा आपल्याकडून उडून तर गेला नसेल ना...?

मोबाईलच्या आत असलेल्या डेटाबद्दल त्याने कोणतीही गॅरंटी दिली नाही. त्याने काम सुरू केल्यावर मला सांगितले की, कमीत कमी दीड-दोन तास लागतील. १२.३० तर वाजलेत होते. शनिवार असल्यामुळे दुकानात गर्दी होत होती. त्याला लॉक स्क्रीनचा नंबर द्यावाच लागला. तो देऊन दुकानाबाहेर पडले. माझ्या शाळेच्या बालमित्राचे, दुकानाच्या जवळच खानावळ होती. तिथे गेले आणि तास-दीड तास तिथे घालवला. त्याने अति आग्रहाने आणि मनापासून उत्तम जेवणाची व्यवस्था केली. इतके छान भोजन झाल्यावर घरी जाऊन गाढ झोपावे असे वाटले तरी पाय ओढत दुकानात गेले. दुकानदाराने आनंदाची बातमी दिली की, डेटा सुरक्षित आहे. मग जुन्या मोबाईलमधून नवीन मोबाईलमध्ये डेटा पाठवण्याचे (transfer) काम सुरू झाले. साधारण तास झाला तेव्हा फक्त १०% डेटा पाठवला गेला होता, त्यामुळे दुकानदार म्हणाला की, संध्याकाळच्या पाच-साडेपाचपर्यंत शंभर टक्के डेटा पाठवला जाईल. मोबाईल त्याच्या हातात देऊन घरी परतले. ५ वाजता डेटा खरोखरी पूर्ण पाठवला गेला होता. आता पाळी होती ती व्हाॅट्सअॅप डेटा पाठवण्याची. दुकानदाराने मला व्हाॅट्सअॅप लॉक विचारले ते मला काही आठवेना. मग त्याने ते माझाच मोबाईल वापरून नवीन घेतले. हे त्याला सहज शक्य झाले कारण माझे एसएमएस आणि माझे मेल हे त्याला सहज त्या फोनवर दिसत होते. मी हे सर्व पाहूनही काहीही करू शकत नव्हते कारण तो जे काम करत होता ते मला करता येणे शक्य नव्हते. साधारण ५ वाजता व्हाॅट्सअॅप डेटा पाठवायला सुरुवात केल्यावर, तर रात्रीचे ९.३० वाजले तरी वीस टक्के सुद्धा डेटा पाठवून झाला नाही. तो चिडूनच म्हणाला, “किती गोष्टी भरून ठेवल्या आहेत व्हाॅट्सअॅपमध्ये.”

मी गप्प. शेवटी दुकान बंद व्हायची वेळ झाल्यावर त्याने जुन्या मोबाईलमध्ये परत माझे सीम कार्ड टाकले आणि माझा मोबाईल माझ्या हातात देत म्हणाला, “काही झाले तरी फोन सातत्याने चार्ज करत ठेवा जेणेकरून उद्यापर्यंत तो कसाही चालू राहील आणि उद्या तुम्ही परत मोबाईल घेऊन या मी व्हाॅट्सअॅप डेटा नवीन मोबाईलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतो.”

कार्यक्रमावरून परतताना रस्त्यात मी धडाधड व्हाट्सअपवर खूप काही डिलीट केले. आणि लक्षात आले की खरंच आपण, हे उद्या वाचूया, तो व्हिडिओ दोन दिवसांनी पाहूया, त्या रीलवरून हा पदार्थ करूया, ही युट्युब लिंक जपून ठेवूया म्हणजे त्यात दाखवलेल्या सल्ल्याचा आपल्याला परत परत उपयोग करता येईल...!; हे सगळे जमवून ठेवलेले आपण कित्येक वर्षात पाहिलेलंच नसते आणि पाहणारही नसतो. यापलीकडे जाऊन आपल्या जवळच्या माणसाचे प्रेमसंवाद...? कसे शक्य आहे त्याला उडवून टाकणे...?

सकाळी नऊ वाजता मी कार्यक्रमाला गेले होते. साधारण दीड वाजता मी दुकानाच्या आत शिरत आहे. आता यानंतर नेमके किती डेटा पाठवला जाईल, किती वेळ लागेल... माहीत नाही. मला हा लेख वाचणाऱ्या सगळ्यांना हेच विचारायचं आहे की काही वर्षांपूर्वी आपल्या हातात मोबाईल नव्हते तरी आपले जगणे चालूच होते. खूपच छान चालू होते. आता असा नेमका काय बदल घडला आहे आपल्या आयुष्यात की मोबाईल बंद तर संपूर्ण आयुष्यच बंद पडल्यासारखे वाटते...? एका निर्जीव वस्तूसाठी तुमचा जो आटापटा चालतो, तेवढाच आटापिटा जर तुम्ही जिवंत व्यक्तीसाठी करू शकलात तर...? pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment