Sunday, June 14, 2026

Monsoon Update : मान्सूनची महाराष्ट्राला प्रतीक्षा! एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

Monsoon Update : मान्सूनची महाराष्ट्राला प्रतीक्षा! एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

Monsoon Update : राज्यात वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून सर्वांचे लक्ष आता मान्सूनकडे (Monsoon) लागले आहे. मात्र जून (June) महिन्याचा अर्धा कालावधी उलटल्यानंतरही मान्सूनची अपेक्षित प्रगती न झाल्याने चिंता वाढली आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) यापूर्वी १५ ते १६ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) व्यापेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मान्सूनची वाटचाल मंदावली असून राज्यभर पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

सध्या मान्सून तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांपर्यंतच पोहोचला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होत असलेला पाऊस हा पूर्वमोसमी स्वरूपाचा असून खरी मान्सूनची सक्रियता अद्याप दिसून आलेली नाही. पुढील चार ते पाच दिवसांतही मान्सून पुण्यासह राज्याच्या अंतर्गत भागात वेगाने पुढे सरकण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती सक्रिय होत असल्याने यंदाच्या मान्सूनवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोमुळे भारतातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, जून ते सप्टेंबर या संपूर्ण पावसाळी हंगामात एल निनोचा प्रभाव कायम राहू शकतो. विशेषतः मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले की, मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी सध्या वातावरणीय परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ पूर्वमोसमी पावसावर विश्वास ठेवून घाईघाईने पेरणी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

मान्सूनच्या उशिरामुळे शेती, जलसाठे आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत चिंता वाढत असून राज्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment