Friday, June 12, 2026

Pratap Sarnaik : १ ऑगस्टपासून एसटीत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड बंधनकारक

Pratap Sarnaik : १ ऑगस्टपासून एसटीत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड बंधनकारक

 जादा पैसे उकळणाऱ्या केंद्रांचा परवाना रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवांमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि सवलतीच्या प्रवासात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ ऑगस्ट २०२६ पासून एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एनसीएमसी' (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयामुळे आता सवलतीचा प्रवास करणाऱ्यांकडे हे डिजिटल कार्ड असणे अनिवार्य आहे.

१ ऑगस्टच्या मुदतीमुळे राज्यभरात सध्या 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरणाच्या मोहिमेने मोठा वेग घेतला आहे. आजतागायत राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी या स्मार्ट कार्डसाठी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. यापैकी सुमारे २५ लाख नागरिकांची स्मार्ट कार्ड्स प्रत्यक्ष कार्यान्वित (ऍक्टिव्हेट) झाली आहेत. मात्र, उर्वरित जवळपास २६ लाख नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डे अद्याप सुरू होण्याच्या प्रक्रियेत आहेत. ही कार्डेही लवकरच प्रवाशांच्या हाती सोपवली जाणार असून, लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता आपली कार्ड घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फ करण्यात आले आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या कार्ड वितरणादरम्यान प्रवाशांची आर्थिक लूट किंवा गैरव्यवहार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, तसेच अशा केंद्रांचा वितरण परवाना तत्काळ रद्द केला जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. डिजिटल परिवर्तनाचे पाऊल

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या प्रवास सवलतींचा लाभ कोणतीही अडचण न येता मिळावा, तिकीट वाटप प्रणालीत पारदर्शकता यावी आणि एसटीचा कारभार अधिक आधुनिक व्हावा, या उद्देशाने ही 'एनसीएमसी' प्रणाली लागू केली जात आहे. एसटी महामंडळाच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी १ ऑगस्टची वाट न पाहता तातडीने आपली स्मार्ट कार्डे प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >