Wednesday, June 10, 2026

जनसंवाद

जनसंवाद

एलआयसीमधील जनतेच्या पैशांची सुरक्षा धोक्यात?

भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासू गुंतवणूक संस्था म्हणून सर्वसामान्य जनता भारतीय जीवन विमा निगम अर्थात 'एलआयसी'कडे पाहते. सामान्य नागरिक आपल्या पाल्यांचे शिक्षण, लग्न, आरोग्य आणि वृद्धापकाळाची तरतूद म्हणून अत्यंत कष्टाचा पैसा या कंपनीत गुंतवत असतात. मात्र, अलीकडेच सोन्याची आयात-निर्यात करणाऱ्या 'राजेश एक्स्पोर्ट्स' या कंपनीत एलआयसीची मोठी भागीदारी असल्याचे समोर आले आहे. त्यातच या कंपनीत सुमारे १५ लाख कोटी रुपयांचा महसूल फुगवून दाखवल्याचा आणि आकड्यांचा मोठा घोळ असल्याचा कथित घोटाळा समोर आल्याने कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली आहे. मार्केट रेग्युलेटर 'सेबी'ने या प्रकरणी अंतरिम आदेश जारी केले असून फॉरेन्सिक ऑडिटचे निर्देश दिले आहेत. अनेक म्युच्युअल फंडांनी या कंपनीतून आपली गुंतवणूक काढून घेतलेली असताना, एलआयसीने मात्र यात डोळे झाकून गुंतवणूक का केली, असा गंभीर सवाल आता उपस्थित होत आहे. जेव्हा एखादी खासगी कंपनी अडचणीत असते, तेव्हा एलआयसीला 'तारणहार' म्हणून पुढे केले जाते का, अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. एलआयसीमधील पैसा कोणा उद्योगपतीचा नसून देशातील मध्यमवर्गीयांचा आहे. अशा पैशांची निष्काळजीपणे गुंतवणूक करणे हा जनतेशी विश्वासघात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सेबी आणि संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे अत्यंत गरजेचे आहे.- राजू जाधव, मांगूर (जि. बेळगाव)

आखातातील युद्धाचे सावट आणि वाढती महागाई

गेल्या काही महिन्यांपासून आखाती देशांमध्ये सुरू झालेले युद्ध दोन-चार दिवसांत संपेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, आता १०० दिवस उलटून गेले तरी हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रामुख्याने हे युद्ध इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात असले, तरी त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. भारतालाही या युद्धाची मोठी झळ बसत असून, परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. युद्ध थांबल्यानंतरही जागतिक घडी पूर्वपदावर येण्यास मोठा काळ जावा लागेल, अशी चिन्हे आहेत. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला असून, भारतात सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. अनेक भागांत इंधनाची टंचाई निर्माण झाल्याने साठेबाजी आणि काळ्याबाजाराला ऊत आला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी ट्रॅक्टर चालवणे आणि इतर कृषी कामे करणे कठीण झाले आहे. अनेक देशांनी मध्यस्थी करूनही युद्धबंदीचा मसुदा अंतिम टप्प्यात असला, तरी पूर्ण शांतता प्रस्थापित झालेली नाही. जागतिक व्यापार सुरळीत होण्यासाठी आणि आर्थिक कोंडी फुटण्यासाठी 'हॉर्मुझची खाडी' लवकरात लवकर खुली होऊन हे युद्ध तत्काळ थांबणे गरजेचे आहे.- अनंत बोरसे, शहापूर (जि. ठाणे)

'बेस्ट' अपघाताला नेमके जबाबदार कोण?

दादर येथील प्लाझा सिनेमाजवळ 'बेस्ट'च्या बसने क्रेन, टॅक्सी आणि इतर वाहनांना दिलेल्या भीषण धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी असून यानिमित्ताने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या रेल्वे, रस्ते किंवा हवाई मार्ग अशा कोणत्याही प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांमुळे जनतेच्या डोक्यावर सतत मृत्यूची टांगती तलवार असते, अशी भीतिदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अपघाताबाबत 'बेस्ट' प्रशासनाने दिलेले स्पष्टीकरण धक्कादायक आहे. भाडेतत्त्वावर घेतलेली ही 'ओलेक्ट्रा' कंपनीची बस ६ ते ७ वर्षे जुनी होती. अशा बसची योग्य डागडुजी न करता ती रस्त्यावर कशी आणली गेली? बसमध्ये तांत्रिक बिघाड होता असे म्हटले तरी चालकाला पूर्णपणे दोषमुक्त करता येणार नाही. चालकाने हँडब्रेक काढल्यामुळे गाडीने वेग घेतला आणि नंतर ब्रेकऐवजी चुकून एक्सलेटरवर पाय पडल्याने हा भीषण अपघात घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या अपघाताला नेमके जबाबदार कोण? प्रशासनाचा निष्काळजीपणा, तांत्रिक बिघाड की वाहनचालकाची मानवी चूक? याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या आणि पादचाऱ्यांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबवण्यासाठी दोषींवर कारवाई व्हायला हवी. - गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (पूर्व)

सोशल मीडियावरील आभासी क्रांती

न्यायालयाच्या एका सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सोशल मीडियावरील तरुणांची तुलना 'परजीवी' अशी केली होती. या विधानाचा निषेध म्हणून 'आप'चे कार्यकर्ते अभिजीत दीपके यांनी 'कॉकरोच जनता पार्टी' नावाने मोहीम सुरू केली. अवघ्या काही दिवसांत या आभासी पक्षाची सदस्यसंख्या साडेतीन लाखांवर पोहोचली. या यशाने प्रोत्साहित होऊन 'नीट' परीक्षा घोळाविरोधात जंतरमंतरवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली. सोशल मीडियावरील प्रतिसाद पाहून दोन-तीन लाख विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा अंदाज होता आणि नेत्यांनाही मोठी आशा होती. मात्र, प्रत्यक्ष आंदोलनाच्या दिवशी जंतरमंतरवर अवघे काही हजार विद्यार्थीच उपस्थित राहिले. ही घटना सोशल मीडियाच्या प्रभावातील फोलपणा उघडी करते. फेसबुक, एक्स किंवा इन्स्टाग्रामवर मिळणारे लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्सचा पाऊस म्हणजे प्रत्यक्ष वैचारिक बांधिलकी नव्हे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर आभासी क्रांती घडवणे सोपे असले, तरी ती ऊर्जा प्रत्यक्ष मैदानात आणण्यासाठी मजबूत संघटना आणि जनसंपर्काची गरज असते. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' या उक्तीप्रमाणे, आभासी विश्वातील समर्थनापेक्षा जमिनीवर उतरून संघर्ष करणाऱ्यांची ताकदच खरी असते, हे या घटनेने सिद्ध केले आहे. - अविनाश देशपांडे, पुणे

Comments
Add Comment