हरकी’: महिलांच्या यशाची किल्ली

दी लेडी बॉस-अर्चना सोंडे


बंगळूरुच्या गजबजलेल्या टेक्नॉलॉजी विश्वात ५ मार्च २०१५ हा दिवस तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. अनेक स्वप्ने, अनेक योजना आणि महिलांच्या करिअरला नवी दिशा देण्याचा दृढ निर्धार घेऊन ती तिच्या नव्या स्टार्टअपची वेबसाइट लॉन्च करण्यासाठी सज्ज होती. मात्र, सुरुवातीलाच अडथळा आला. ज्या ठिकाणी वेबसाइट लॉन्च करायची होती, तेथील इंटरनेट बंद पडले. दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतरही तीच परिस्थिती.शेवटी तिने कार काढली. घरी पोहोचली आणि स्वतःच्या घराच्या टेरेसवरून वाय-फायला जोडून वेबसाइट लॉन्च केली. त्या क्षणी कदाचित तिलाही कल्पना नव्हती की, घराच्या टेरेसवरून सुरू झालेला हा छोटासा प्रयत्न एक दिवस हजारो महिलांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल.
आज ‘हरकी’ (HerKey) ही कंपनी तब्बल ८ कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल करत आहे. १० हजारांहून अधिक कंपन्यांशी भागीदारी आणि लाखो महिलांपर्यंत पोहोचलेल्या या प्लॅटफॉर्मने भारतातील महिला व्यावसायिकांसाठी एक नवे विश्व निर्माण केले आहे. ही गोष्ट आहे ‘हर की’ची संस्थापिका नेहा बागरियाची. मुंबईत जन्मलेली आणि वाढलेली नेहा बागरिया ही एक हुशार विद्यार्थिनी होती. शिक्षणात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत तिने अमेरिकेतील प्रतिष्ठित व्हार्टन स्कूलमध्ये प्रवेश मिळवला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती भारतात परतली आणि कौटुंबिक व्यवसायात सहभागी झाली. मात्र, आयुष्यातील एक वैयक्तिक अनुभव तिच्या उद्योजकीय प्रवासाचा टर्निंग पॉइंट ठरला. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पुन्हा करिअरमध्ये परतणे तिच्यासाठी अत्यंत कठीण ठरत होते. प्रसूतीनंतर करिअरमध्ये पुनरागमन करताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हाच तिला जाणवले की, अशा हजारो महिला असतील ज्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शनाची गरज आहे. याच विचारातून ‘जॉब्ज फॉर हर’ या उपक्रमाचा जन्म झाला. पुढे २०२३ मध्ये त्याचे रूपांतर ‘हर की’मध्ये करण्यात आले. हरकी हे केवळ नोकऱ्या शोधण्याचे व्यासपीठ नाही. करिअरमध्ये खंड पडलेल्या महिलांना पुन्हा आत्मविश्वासाने कामाच्या क्षेत्रात परत आणणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या प्लॅटफॉर्मवर महिलांना नोकरीच्या संधींबरोबरच प्रशिक्षण, नेटवर्किंग, मार्गदर्शन, कौशल्यविकास आणि करिअर सल्लाही मिळतो. विशेष म्हणजे, महिलांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. उलट कंपन्याच महिलांना कामावर घेण्यासाठी हरकीच्या सेवांचा वापर करतात. व्यवसाय उभारण्याच्या प्रवासात नेहाला अनेकदा सामाजिक पूर्वग्रहांचा सामना करावा लागला. एका रिक्रूटरने त्यांना स्पष्टपणे सांगितले होते की, किटी पार्टी करणाऱ्या महिलांना आम्ही नोकरीवर ठेवत नाही, तर दुसऱ्या एका कंपनीच्या अधिकाऱ्याने विवाहित महिलांना नोकरी देण्याबाबत शंका व्यक्त केली होती.


 



नेहा सांगते, व्यवसायातील अडचणींपेक्षा मानसिक अडथळे मोठे होते. महिलांनी कामावर परतल्यास त्या चांगल्या आई किंवा पत्नी राहणार नाहीत, अशा समजुती मोडून काढण्यासाठी वेळ लागला. दोन मुलांची आई असलेल्या नेहा आजही कुटुंब आणि व्यवसाय यांच्यात समतोल राखते. गुगल कॅलेंडरच्या मदतीने ती प्रत्येक दिवसाचे नियोजन करते. २०२२ पर्यंत हरकी हा पूर्णपणे स्व-निधीवर चालणारा उपक्रम होता. मात्र, त्यानंतर कलारी कॅपिटल आणि ३६० वन असेट यांसारख्या गुंतवणूकदारांनी कंपनीवर विश्वास दाखवला. कंपनीने सुमारे ३२ कोटी रुपयांचा निधी उभारला आणि वाढीचा वेग आणखी वाढवला. आज हरकीकडे १०० हून अधिक कर्मचाऱ्यांची टीम आहे. ॲमेझॉन, ॲक्सेंचर, कॅपजेमिनी, डेल, मिंत्रा, पीडब्ल्यूसी आणि टीव्हीएस मोटर्स यांसारख्या नामांकित कंपन्या त्यांचे ग्राहक आहेत.नेहाच्या यशामागे तिचे पती अनुराग आणि भाऊ हर्ष यांचा मोठा वाटा आहे. अनुराग तिच्या प्रत्येक संघर्षाचा साक्षीदार आणि सहप्रवासी आहे. तर तांत्रिक क्षेत्रातील अनुभव नसताना व्यवसाय उभारण्यासाठी तिच्या भावाने देखील प्रचंड मदत केली.आज हरकी हजारो महिलांना पुन्हा करिअरमध्ये परतण्याची संधी देत आहे. एका साध्या जॉब पोर्टलपासून सुरू झालेला हा प्रवास आता महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत रूपांतरित झाला आहे. जिद्द, चिकाटी आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती अंगीकारा. तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा. यशाचा मार्ग तिथूनच सुरू होतो. असा सल्ला नेहा तरुण उद्योजकांना देते. घराच्या टेरेसवरून सुरू झालेली ही कहाणी आज हजारो महिलांच्या स्वप्नांना पंख देत आहे. आणि कदाचित, हीच खरी उद्योजकतेची ताकद आहे.

Comments
Add Comment

मन उधाण वाऱ्याचे

 मोरपीस - पूजा काळे  वेड्या मना गुंतताना

एआय आणि सायबर गुन्हेगारी

डॉ. दीपक शिकारपूर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार चलाख पद्धतीने गुन्हे करत आहेत. गुन्हेगार

kokan: येवा कोकण आपलोच आसा!

खाचखळग्यातून जाणारी वाट कडेकपारी पार करत थेट सह्याद्रीच्या पायथ्याशी जाऊन मिळते, जिथे मातीचा कण न् कण धुरळा होत

वकिली सेवा पुरवणारी ‘रेस्ट द केस’

शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधी चढू नये, असं म्हटलं जातं. कारण कोर्ट-खटला यामध्ये खूप वेळ जातो. सर्वांत

खादी ग्रामोद्योगाची सुवर्ण कामगिरी

भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्पादन,

Narendra Modi : सोने खरेदी नंतर; देश प्रथम

भारतीयांना सोन्याचे आकर्षण पूर्वीपासूनच आहे. पण मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सोन्याच्या खरेदीमुळे देशाचे परकीय