Tuesday, June 9, 2026

Visakhapatnam Steel Plant accident : "आईला जपा, मन लावून शिका..."; विशाखापट्टणम दुर्घटनेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या पित्याचा काळीज पिळवटून टाकणारा शेवटचा निरोप!

Visakhapatnam Steel Plant accident  :

विशाखापट्टणम : कोणताही बाप आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी दिवसरात्र राबत असतो. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याला स्वतःपेक्षा जास्त आपल्या कुटुंबाचीच काळजी असते, हे सिद्ध करणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना विशाखापट्टणम (Vishakhapattanam) येथे समोर आली आहे. येथील 'राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड' (Vizag Steel Plant) प्रकल्पात नुकत्याच घडलेल्या एका महाभयंकर दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत १६०० अंश सेल्सिअस तापमानाच्या वितळलेल्या लोखंडाने होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या एका कामगाराचा शेवटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडिओने आणि त्या पित्याच्या शेवटच्या शब्दांनी प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत.

मृत्यूच्या दारात असतानाही कुटुंबाचीच काळजी

ही अत्यंत दुःखद घटना अपघातग्रस्त कामगाराच्या शेवटच्या क्षणांची साक्ष देते. भयंकर स्फोटानंतर अंगावर वितळलेले लोखंड सांडल्याने हा कामगार मृत्यूशी झुंज देत होता. त्याच्या शरीराचा मोठा भाग गंभीररीत्या भाजला होता आणि वेदना असह्य होत होत्या. मात्र, अशा भयानक परिस्थितीतही त्याने आपले प्राण सोडण्यापूर्वी तिथे उपस्थित असलेल्या आपल्या एका सहकाऱ्याला बोलावले आणि मोबाईलवर आपल्या कुटुंबासाठी एक शेवटचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची विनंती केली. अत्यंत क्षीण आणि वेदनेने भरलेल्या आवाजात त्याने आपल्या मोठ्या मुलाला उद्देशून आपला शेवटचा निरोप दिला. तो म्हणाला, "तुझ्या लहान भावाची काळजी घे... तुम्ही दोघांनीही मन लावून चांगला अभ्यास करा... आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या आईला जपा." हे काही मोजके पण काळजाला भिडणारे शब्द उच्चारून त्याने शांतपणे आपले डोळे मिटले आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला. या घटनेने एक कुटुंब तर उध्वस्त झालेच, पण हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचे मन हेलावून गेले आहे.

नेमके काय घडले त्या काळरात्री ?

पोलिसांनी आणि प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना सोमवारी संध्याकाळी कारखान्यातील 'स्टील मेल्ट शॉप-१' (Steel Melt Shop-1) या विभागात घडली. या ठिकाणी वितळलेल्या लोखंडाचे कास्टिंग (Casting) करण्याचे महत्त्वाचे काम सुरू होते. एका मोठ्या बकेटमध्ये वितळलेले लोखंड भरून ते क्रेनच्या साहाय्याने दुसऱ्या ठिकाणी नेले जात होते. या लोखंडाचे तापमान तब्बल १६०० अंश सेल्सिअस इतके प्रचंड होते. मात्र, हे काम सुरू असतानाच अचानक ते लोखंड खाली सांडले आणि एक अत्यंत मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे तिथे क्षणार्धात भीषण आग भडकली आणि आजूबाजूला काम करत असलेले निष्पाप कामगार अक्षरशः आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

८ कामगारांचा दुर्दैवी अंत

या जीवघेण्या दुर्घटनेत आतापर्यंत ८ कामगारांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य ६ कामगार गंभीररीत्या जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या महाभयंकर घटनेची गंभीर दखल घेत 'आरआयएनएल' (RINL) प्रशासनाने तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. कारखान्यात काम करताना सुरक्षेच्या सर्व नियमांचे (Safety Protocols) पालन केले जात होते का? क्रेन किंवा बकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? या सर्व प्रश्नांचा सखोल तपास आता संबंधित यंत्रणा करत आहेत.

केंद्राकडून भरीव मदतीची घोषणा आणि मंत्र्यांची पाहणी

या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने पीडित कुटुंबीयांना मोठा आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची सानुग्रह अनुदान (Ex-gratia) मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, नागरी उड्डाण मंत्री के. राम मोहन नायडू, विशाखापट्टणमचे खासदार एम. श्रीभरत आणि आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची आणि त्यांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' (X) खात्यावरून शोकसंवेदना व्यक्त करत म्हटले आहे की, "विशाखापट्टणम स्टील प्लांटमधील दुर्घटनेची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींना लवकर आराम मिळावा यासाठी मी प्रार्थना करतो." यासोबतच पंतप्रधानांनी 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून' (PMNRF) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा